ब्रह्मपुत्रा नदीपात्राच्या व नामचा बारवा शिखराच्या पूर्वेस काही अंतरापर्यंत पर्वतरांगा व टेकड्यांचा प्रदेश आहे. भारताच्या अगदी ईशान्य भागात या रांगा दक्षिणेकडे वळलेल्या दिसतात. पुढे त्यांचा विस्तार भारत-म्यानमार सरहद्दीवरून दक्षिणेकडे गेलेला आहे. म्यानमारमधून पुढे मलेशियाच्या द्वीपकल्पापर्यंत आणि त्यानंतर इंडोनेशिया बेटांवरील पर्वतश्रेण्यांच्या स्वरूपात त्यांचा विस्तार आढळतो. या सर्व पर्वतरांगा व टेकड्या वेगवेगळ्या प्रादेशिक व स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. ब्रह्मपुत्रेच्या पूर्वेकडील आणि पुढे दक्षिणेकडील या पर्वतरांगा मुख्य हिमालय पर्वतात समाविष्ट होत नसल्या, तरी त्या हिमालयाच्याच विस्तारित व संबंधित रांगा मानल्या जातात. प्राकृतिक दृष्ट्या ईशान्येकडील हा विभाग पूर्णपणे पर्वतीय नसून त्यामध्ये कमी उंचीच्या टेकड्या, पठारे तसेच मैदानेही आहेत.

तृतीयक कालखंडातील वलीकरण प्रक्रियेबरोबरच या पर्वतीय प्रदेशाचे उत्थापन झालेले आहे. ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश पूर्वांचल, मेघालय पठार आणि आसामचे खोरे अशा तीन प्राकृतिक उपविभागांत विभागला जातो. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय या राज्यांत वेगवेगळ्या रांगा व टेकड्या आढळतात. या संपूर्ण भागाला पूर्वांचल (पूर्वेकडील पर्वत) असे संबोधले जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे मिशमी, पातकई, नागा, मणिपूर, मिझो किंवा लुशाई या नावांनी या टेकड्या ओळखल्या जात असून त्या भारत-म्यानमार सरहद्दीवर पसरल्या आहेत. या सर्व टेकड्या कमानदार स्वरूपात असून त्यांची बहिर्वक्र बाजू भारताकडे आहे. या टेकड्या घनदाट वनांनी वेढलेल्या आहेत. या प्रदेशात झूम ही भटकी शेती केली जाते. मेघालय पठार हा आज जरी ईशान्येकडील पर्वतरांगांचाच एक भाग मानला जात असला, तरी प्रत्यक्षात हा द्वीपकल्पीय भारताच्या संपुंजित खंडाचाच एक विस्तारित भाग असावा असे मानले जाते.

पुरातन काळात या द्वीपकल्पाच्या पूर्वेला एक मोठा खोलगट भाग होता, तो गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या संचयनकार्यामुळे भरून आला. मध्यजीव महाकल्पात आणि तृतीयक महाकल्पाच्या सुरुवातीच्या काळात सागरी अतिक्रमणामुळे या पुरातन भूमीच्या काही भागाचे निमज्जन झाले. तदनंतर टेथीसच्या जागेवर ज्याप्रमाणे हिमालयाची निर्मिती झाली, त्याचप्रमाणे येथेही सागरतळाचा भाग हळूहळू उंचावत जाऊन मेघालय पठाराची निर्मिती झाली. दक्षिणेकडील सुरमा नदीखोऱ्याकडून पाहिले असता या पठाराचा मध्य आणि पूर्व भाग टेबललँडसारखा दिसतो. या पठाराच्या कडा अगदी तीव्र स्वरूपाच्या आणि कड्याप्रमाणे आहेत. या पठारी भागावरून मैदानी प्रदेशाकडे वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहमार्गात अनेक धबधबे निर्माण झालेले आहेत. तसेच नद्यांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. या पठारी भागावरच गारो, खासी व जैंतिया या टेकड्या पसरल्या आहेत. खासी टेकडीत असलेले चेरापुंजी पठार हे भारतातील संरचनात्मक मंचाचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असून येथील चेरापुंजी व मॉसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे मेघालयाची पर्वतीय भूमी सतत मेघाच्छादित राहते. यावरूनच या प्रदेशाला मेघालय (मेघांचे आलय) हे नाव पडले आहे. आसाम खोऱ्याला तर उत्तरेकडून आणि दक्षिणेकडूनही उंच पर्वतरांगांनी वेढलेले आहे.

समीक्षक : नामदेव गाडे