क्षयरोगासारख्या एकेकाळी दुर्धर समजल्या जाणाऱ्‍या आजारावर रिफॅम्पीसीन हे अतिशय प्रभावी प्रतिजैविक १९५७ पासून उपलब्ध आहे. क्षयरोगाच्या जीवाणूंचा नाश करून क्षयरोगाच्या संसर्गातून रुग्णाला मुक्त करण्यामध्ये रिफॅम्पीसीनची महत्त्वाची भूमिका असते. हे औषध नेहमी आयसोनियाझाइड, पायराझिनामाइड आणि इथॅम्ब्युटॉल हायड्रोक्लोराइड या इतर तीन प्रतिजैविकांबरोबर एकत्रित रीत्या दिले जाते. तसे न दिल्यास क्षयरोगाचे जीवाणू औषधांचा प्रतिकार करतात, संसर्ग लवकर बरा होत नाही आणि औषधांना दाद न देणारा क्षयरोग (MDR TB) होऊ शकतो.

रिफॅम्पीसीन

उपयुक्तता : रिफॅम्पीसीन हे मेंदूसह शरीराच्या कोणत्याही अवयवाला होणाऱ्या क्षयरोगाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपयोगी आहे. रिफॅम्पीसीन कुष्ठरोगाच्या उपचारासाठी संयोजन चिकित्सेच्या रूपात देखील वापरले जाते. हे मेनिंगोकॉकल संक्रमणाला रोखण्यासाठी देखील उपयोगी पडते. इतर उपयोगांमध्ये, हाडाचा संसर्ग, कृत्रिम सांधे संक्रमण संसर्ग आणि हृदयाच्या कृत्रिम झडपेचा संसर्ग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये देखील हे प्रतिजैविक उपयोगी आहे.

औषधाची मात्रा : रिफॅम्पीसीन शक्यतो जेवण करण्यापूर्वी कमीतकमी ३० मिनिटे आधी किंवा जेवणानंतर एक तास झाल्यावर द्यावे कारण अन्नाबरोबर घेतल्यास त्याचे शोषण कमी होते.  प्रौढ आणि लहान मुले: दररोज १० मिग्रॅ. / किलो (जास्तीत जास्त ६०० मिग्रॅ.) ही त्याची योग्य मात्रा आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या शिफारशीनुसार क्षयरोगाच्या सर्व ६ – आणि ८ -महिन्यांच्या उपचार पद्धतीमध्ये रिफॅम्पीसीनचा समावेश असतो.

वैद्यकीय सल्ल्याशिवाय रिफॅम्पीसीन या औषधाचे सेवन करू नये.

साठवण : रिफॅम्पीसीन कॅप्सूल हवाबंद पाकिटामध्ये ठेवतात. प्रखर प्रकाशापासून कॅप्सूल दूर ठेवणे आवश्यक आहे.

रिफम्पीसीनचे दुष्परिणाम :‍ रिफॅम्पीसीनचे खूप जास्त प्रमाणात दुष्परिणाम सहसा होत नाहीत. पुरळ, थंडी व ताप उलटीसारखे होणे, यकृताची व्याधी (हिपॅटिटिस) असे त्रास क्वचित उद्भवू शकतात. ज्या रुग्णांना यकृताचे आजार आधीपासून आहेत किंवा इतर औषधोपचार (जे यकृतावर परिणाम करतात) चालू आहेत, किंवा जास्त मात्रेमध्ये रिफॅम्पीसीन घेतले जात असेल, तर यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतो.

दारुचे सेवन करणाऱ्‍या रुग्णांनाही रिफॅम्पीसीनमुळे यकृताचा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

क्षयरोगाची इतर प्रतिजैविके : आयसोनियाझाइड, पायराझिनामाइड ही सुद्धा यकृताचा आजार वाढवू शकतात. क्षयरोग उपचार सुरू करण्याआधी यकृताच्या चाचण्या करणे, विशेषकरून वृद्ध, यकृताचे आजार असणारे रुग्ण, यांच्यामध्ये अतिशय गरजेचे आहे.

रुग्णांना पुढील संभाव्य दुष्परिणांमाची कल्पना डॉक्टरांनी (वैद्यांनी) द्यावी : (१) लालसर रंगाचे मूत्र किंवा विष्ठा, लाळ (लालसर) होणे. प्रतिजैविकाचा विसर्ग होताना असा रंग होतो, रुग्णांनी घाबरू नये. (२) रक्तपेशींची संख्या कमी होणे. (३) काही औषधांचा प्रभाव, रिफॅम्पीसीन बरोबर घेतल्यास कमी होतो – जसे गर्भनिरोधक गोळ्या, मधुमहाची औषधे, रक्त पातळ करणारे काही औषधे. रिफॅम्पीसीन चालू असताना इतर औषधे डॉक्टरांच्या सल्‍ल्याशिवाय घेऊ नये.

 पहा : क्षयरोग.

संदर्भ :

  1. Goodman L, Gilman A, Brunton L, Hilal-Dandan R, Knollmann B. Goodman & Gilman’s the pharmacological basis of therapeutics New York [etc.]: McGraw Hill Education; 2018.
  2. Katzung B. Basic & Clinical Pharmacology, 14e. New York, N.Y.: McGraw-Hill Education LLC.; 2018
  3. https://apps.who.int/medicinedocs/es/d/Js5511e/2.3.html#Js5511e.2.3 [cited 30th September 2019].
  4. Rifampin label [Internet]. Accessdata.fda.gov. 2010. https://www.accessdata.fda.gov/drugsatfda_docs/label/2010/050420s073,050627s012lbl.pdf [cited 2 October 2019].