सुब्रह्मण्यम चंद्रशेखर : (१९ ऑक्टोबर १९१० – २१ ऑगस्ट १९९५) चंद्रशेखर सुब्रह्मण्यम यांचा जन्म आता पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोर शहरात झाला. पुढच्या काळात त्यांचे कुटुंब चेन्नई येथे स्थलांतरित झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण चेन्नई येथील हिंदू हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण अतिशय नावाजलेल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात झाले. १९२९ मध्ये त्यांनी पहिला शोधलेख लिहिला. १९३० साली चंद्रशेखर यांनी भौतिकशास्त्र विषयात बी. एस्सी. पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांना केंब्रिज विद्यापीठात शिकण्यासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. भारतातून इंग्लंडला प्रवास काळात त्यांनी श्वेत बटू ताऱ्याबाबत महत्त्वाचे संशोधन केले. ते केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. केंब्रिज येथील पहिल्या वर्षात चंद्रशेखर यांनी आर. एच. फाउलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढच्या वर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ माक्स बोर्न यांनी चंद्रशेखर यांना संशोधनासाठी निमंत्रण दिले. त्यानुसार त्यांनी गटिंजेन येथील बोर्न संस्थेत काम केले. तिसऱ्या वर्षात प्रसिद्ध शास्त्रज्ञ पी. ए. एम. डिरॅक यांनी चंद्रशेखर यांना कोपनहेगन येथील सैद्धांतिक भौतिकशास्त्र संस्थेत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी तिसऱ्या वर्षाचा काळ कोपेनहेगेन येथे व्यतीत केला. १९३३ मध्ये चंद्रशेखर यांना केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच्. डी. ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉक्टरेटसाठी फाउलर आणि आर्थर एडिंगटन यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांची ट्रिनिटी कॉलेज येथे प्राईझ फेलोशिपसाठी निवड झाली. ही निवड ४ वर्षांसाठी होती. पुढच्या काळात म्हणजे १९४१ मध्ये त्यांची शिकागो विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून निवड झाली. अवघ्या दोन वर्षांनी त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली तेव्हा ते केवळ ३३ वर्षांचे होते. नंतरच्या काळात त्यांना अनेक विद्यापीठांकडून मानाची पदे देऊ करण्यात आली; परंतु त्यांनी ती नाकारली आणि ते शिकागो विद्यापीठातच कार्यरत राहिले. १९५३ साली चंद्रशेखर यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी मेरीलँड येथील बॅलास्टिक संशोधन प्रयोगशाळेत काम केले. प्रसिद्ध अशा मॅनहटन प्रकल्पात काम करण्यासाठीही त्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
चंद्रशेखर यांचे सर्वात गाजलेले संशोधन श्वेत बटू ताऱ्यांबाबत होते. श्वेत बटू ताऱ्याचे सर्वाधिक वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट एवढे असते हे त्यांनी सैद्धांतिक पद्धतीने दाखवून दिले होते. हीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने सांगायची झाल्यास एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान या मर्यादेच्या आत असेल तर त्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे श्वेत बटूमध्ये रूपांतर होते. या मर्यादेला ‘चंद्रशेखर मर्यादा’ असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. ज्या ताऱ्याचे वस्तुमान या मर्यादेपेक्षा अधिक असेल त्याचे रूपांतर न्यूट्रान ताऱ्यामध्ये किंवा कृष्णविवरामध्ये होते. म्हणजेच एखाद्या ताऱ्याचे त्याच्या मृत्यूनंतर न्यूट्रान ताऱ्यात रूपांतर होण्यासाठी त्याचे कमीतकमी वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट असले पाहिजे हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. केंब्रिज विद्यापीठात काम करीत असताना त्यांनी श्वेत बटू ताऱ्यांच्या रचनेचे एक सैद्धांतिक प्रारूप तयार केले. त्यात त्यांनी त्या ताऱ्यांमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनांच्या वस्तुमानात त्यांच्या प्रचंड गतीमुळे होणारा बदलही विचारात घेतला होता. ताऱ्यांच्या गतिशास्त्रात त्यावेळी उपलब्ध असलेल्या प्रारूपांमध्ये त्यांनी सुधारणा केली. आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरत असलेल्या ताऱ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि ‘गतिज घर्षण’ ही नवीन संकल्पना मांडली. या घर्षणामुळे ताऱ्यांचा वेग कमी होतो तसेच तारका-पुंज निर्मितीस मदत होते असे त्यांनी प्रतिपादन केले. याशिवाय त्यांनी इतरही शाखांमध्ये काम केले. उदा., ताऱ्यांची रचना, रेणूंची ब्राउनिअन गती, हायड्रोजन आयनचा पुंज-सिद्धांत, व्यापक सापेक्षता सिद्धांत, कृष्णविवरांबाबतची गणिती समीकरणे आणि एकमेकांवर आदळणाऱ्या गुरुत्वीय लहरी.
चंद्रशेखर यांनी एकूण ४५ विद्यार्थ्यांना पीएच्. डी. साठी मार्गदर्शन केले. त्यांचे दोन विद्यार्थ्यांना संग दाओ ली (Tsung-Dao Lee) आणि चेन निंग यंग (Chen-Ning Yang) यांना पुढच्या काळात भौतिकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाले. चंद्रशेखर यांनी सुमारे ३८० शोधलेख आणि ११ पुस्तके लिहिली आहेत.
चंद्रशेखर १९५२ ते १९७१ या काळातॲस्ट्रोफिजिकल जर्नल या प्रतिष्ठित शोधनियतकालिकाचे संपादक होते. १९९० ते १९९५ या काळात न्यूटनच्या प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका या प्रसिद्ध ग्रंथाचा त्यांनी विशेष अभ्यास केला आणि १९९५ मध्ये न्यूटन्स प्रिन्सिपिया फॉर द कॉमन रीडर नावाचा ग्रंथ प्रकाशित केला.
‘ताऱ्यांच्या रचनेशी निगडित प्रक्रिया आणि ताऱ्यांची उत्क्रांती’ या विषयावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल १९८३ मध्ये चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय त्यांना प्राप्त झालेले काही सन्मान असे: रॉयल सोसायटीचे फेलो, रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक, अमेरिकन कला आणि विज्ञान अकादमीचे रम्फर्ड पारितोषिक, अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पदक, भारत सरकारकडून पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय फेलो, रॉयल सोसायटीचे कॉप्ले पदक.
अमेरिकेच्या नासा या संस्थेने अंतराळात सोडलेल्या ४ भव्य वेधशाळांपैकी एक वेधशाळा क्ष-तरंग ग्रहण करणारी आहे. या वेधशाळेला चंद्रशेखर यांचे नाव देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. ही वेधशाळा ‘चंद्रा एक्स रे टेलिस्कोप’ या नावाने ओळखली जाते. ही वेधशाळा २३ जुलै १९९९ या दिवशी अंतराळात सोडण्यात आली असून ती आजही (ऑक्टोबर २०२०) कार्यरत आहे. भौतिकशास्त्राची चुंबकीय द्रवगतिशास्त्र (Magneto hydrodynamics) नावाची एक शाखा आहे. या विषयातील एका स्थिरांकाला चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच एका लघुग्रहाला ‘१९५८चंद्रशेखर’ असे नाव दिले गेले आहे. बंगळुरू येथील भारतीय खगोलभौतिकी संस्थेने हिमालयात हॅन्ले येथे उभारलेली एक दुर्बीण ‘हिमालयन चंद्रा टेलिस्कोप’ या नावाने ओळखली जाते.
समीक्षक : हेमचंद्र प्रधान