(अंदाजे इ. स. ९२० — इ. स. १०००).

आर्यभट (दुसरे) यांच्याविषयी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांचा महासिद्धान्त हा खगोलगणितावरील ग्रंथ उपलब्ध आहे. हा ग्रंथ संस्कृत पद्यात लिहिलेला असून त्यात एकूण अठरा प्रकरणे आहेत. यांपैकी पहिली बारा प्रकरणे खगोलशास्त्रावर असून अन्य सहा प्रकरणांमध्ये भूमिती, भूगोल आणि बीजगणित हे विषय आहेत.

गणितामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांवरील मूलभूत क्रिया, त्रैराशिक, विनिमय आणि मिश्र व्यवहार, श्रेढी, संयोग यांविषयीचे प्रश्न सोडविण्याच्या पद्धती दिल्या आहेत. भूमितीमध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचे गुणधर्म आणि क्षेत्रफळ काढण्याची सूत्रे, विविध घनाकृतींची घनफळे काढण्याची सूत्रे, विटांचे बांधकाम, लाकूड कापण्याचे गणित, धान्याच्या राशीचे मोजमाप, सावलीचे गणित इत्यादी व्यावहारिक विषयांचा समावेश आहे.

प्रथम घाताची अनिश्चित समीकरणे सोडविण्याचे विस्ताराने दिलेले नियम तसेच पाच दशांश स्थळांपर्यंत अचूक किंमती देणारे ज्या (साईन; sine) कोष्टक ही त्यांची उल्लेखनीय गणिती कामगिरी आहे.

कळीचे शब्द :  #भारतीयप्राचीनगणितज्ज्ञ #खगोलशास्त्र #महासिद्धान्त #भूमिती #भूगोल #बीजगणित.

संदर्भ :

समीक्षक – विवेक पाटकर