मुक्कात्तु रामचंद्र दास : (२ जुलै १९३७ – १ एप्रिल २००३) मुक्कात्तु रामचंद्र दास यांचा जन्म केरळ राज्यातील पट्टनामतित्थ जिल्ह्यातील , तिरुवल्ला येथे झाला . त्यांचे लहानपण एकत्र कुटुंबात गेले. जन्मगावी तिरुवल्ला येथेच हिंदू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक आणि सिरीयन ख्रिश्चन सेमिनरीत माध्यमिक शालेय शिक्षण घेतले. माध्यमिक शालेय जीवनात भेटलेल्या श्री.ईप या शिक्षकांचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला त्यांच्यामुळे दास त्याकाळची मॅट्रिक परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. चेन्गांचेरीच्या बर्चमन्स महाविद्यालयातून १९५६ दास यांनी रसायनशास्त्र, गणित, भौतिकीसह बी.एस्सी. पदवी मिळवली. रसायनशास्त्रात एम. एस्सी.करता त्यांना केरळ राज्यात थिरूवनंतपुरम येथे जावे लागले. विज्ञानाइतकीच दास यांना अभिजात इंग्रजी साहित्यात, विशेषतः काव्यात रुची होती आणि त्याच्याशी संबंधित विषयातील वाचन दांडगे होते. एम. एस्सीमध्ये राज्यात ते सर्वप्रथम आले. ते भाभा अणुसंशोधन केंद्रात प्रशिक्षणार्थी आणि टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत संशोधन सहाय्यक म्हणून दोन्हीकडे त्यांची निवड झाली होती. त्यात त्यांनी टाटा मूलभूत विज्ञान संस्थेची निवड केली. तेथे त्यांनी C13 या स्थिर समस्थानक असलेल्या क्विनॉइड संयुगांवर, इलेक्ट्रॉन आभ्राम संस्पंदनांद्वारे (Electron Spin Resonance; ESR) वर्णपटशास्त्रज्ञ बालू वेंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठातून पीएच्.डी. मिळवली. त्यांनी दास यांना पुढील अभ्यासासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जॉर्ज फ्रॅन्केल यांचे मार्गदर्शन घेण्यास सुचवले. रेणूसंरचनेचा अभ्यास करण्यात फ्रेन्केल आघाडीवर होते. कोलम्बिया विद्यापीठात ते तीन वर्षे संशोधन करीत होते. त्यांचा क्विनोनसम द्रव्यांसंबंधी (Quinoids) शोधनिबंध जर्नल ऑफ केमिकल फिजिक्समध्ये प्रसिद्ध झाला. दास यांना प्रारंभी जैविकदृष्ट्या महत्वाच्या रेणूंचे, चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एम. आर. आय.) वापरून, प्रतिमाकरण करण्यात रस होता.
आपल्या प्रयोगासाठी अल्पमोली साधने आणि पद्धती स्वतः विकसित करून दास यांनी प्रयोग केले. परिणामी क्विनाईन्स आणि हायड्रोक्विनोन्ससारख्या रेणूंची रचना, त्यांची भूमिती आणि आंतरक्रियांचे बारकावे जाणून घेण्यात यश मिळवले. दास यांनी प्रयोगांतून काही अचूक संख्यात्मक मूल्ये मिळविली. या विदेचा (data) मार्टिन कारप्लस या २०१३चे रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञाना काही तात्त्विक आडाखे बांधण्यात उपयोग झाला. कोलम्बिया विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सोल स्पिगेलमन यांच्या बरोबर दास यांचे तीन लेख नेचर नियतकालिकात प्रकाशित झाले. त्यांत पक्षी आणि उंदरांसारख्या प्राण्यांतील अर्बुद (tumor) कारक विषाणूंच्या आरएनएमधील आणि त्यांच्या पोशिंद्यांमधील डीएनएतील साम्य निर्विवादपणे दाखवून दिले. हे काम कालांतराने विरुद्ध प्रतिरेखन विकराचा (Reverse transcriptase) शोध लागण्यासाठी आधारभूत ठरले. दास यांनी टीआयएफआरमधील लहानशा रेण्वीय विषाणू प्रयोगशाळेतून केलेल्या कामात मानवी दुधात आरएनएस (RNAse) नामक विकर असते आणि त्यामुळे आरएनए विषाणूंचा शरीरात संक्रमण होण्यापासून बचाव होतो याचा शोध लावला. आरएनएसचा आणि लॅक्टोफेरीनचा संबंध काय असावा यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मानवी दुधातील लॅक्टोफेरीन रक्तातील लोहाचे प्रमाण नियंत्रित करीत असते हे त्यांनी दाखविले.
वेगवेगळ्या वंशाच्या मानवसमूहांतील मानवी दुधात आरएनएस विकराचे प्रमाण भिन्न असते हे सिद्ध केले. अधिक अभ्यासानंतर वर्णपटशास्त्रज्ञ त्यांना असे आढळले की दुधातील आरएनएसचे प्रमाण शून्य वा फार कमी असेल तर स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. जवळच्या नातलगांची आपसात लग्ने झाली तर संततीच्या दुधातील आरएनएसचे प्रमाण शून्य वा फार कमी असते असे त्यांना आढळले.
नेचर आणि जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या विज्ञान नियतकालिकांत त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला. त्यामधून त्यांना डेट्रॉईटमधील स्तनांच्या कर्करोगावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मिशिगन कॅन्सर फाउंडेशनमधील रेण्वीय जीवशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुष्पमित्र भार्गव हे प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत आले असताना योगायोगाने त्यांना भेटले. हैदराबादला सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेच्या स्थापनेपासून तिची धुरा वाहण्यास समर्थ योग्य व्यक्तीच्या ते शोधात होते. दास यांनी हे आव्हान टीआयएफआरचे संचालक, डॉ. बी. व्ही. श्रीकांतन यांना कल्पना देऊन स्वीकारले. डॉ. होमी भाभा यांनी किती काळजीपूर्वक मेहेनतीने टीआयएफआरची मुंबईतील इमारत साकार केली ते दास यांनी जवळून पाहिले होते. त्या निरीक्षणाचा सीसीएमबी संस्थेची इमारत उभारण्यात झाला. तेथे त्यांच्या संशोधक गटाने कर्करोग अर्बुदकारक जनुके (Oncogenes), कर्करोग अर्बुद दमनकारी जनुके (tumor suppressor genes) आणि यकृतशोथ सी (Hepatitis C) विषाणूंवर काम केले. तसेच आरएनएस आणि अर्बुदकारक जनुकांवरील काम पुढे नेले.
काही काळाने दास यांना केरळ राज्य सरकारने राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी (आरजीसीबी) या संस्थेची थिरूवनंतपुरम येथे मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आणि ती प्रस्थापित करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानी आरजीसीबीचे संस्थापक संचालक पद सात वर्षे भूषविले. केरळ राज्य सरकारच्या विज्ञान सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली. आरजीसीबीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली प्राणी आणि माणसे यांच्या रोगांवर मात करण्यासाठी प्रयत्न केले गेले. तसेच क्षय आणि यकृतशोथ (Hepatitis) यांचे अचूक, त्वरित रोगनिदान आणि त्यांच्याविरुद्ध प्रभावी लसी निर्माण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
दास यांना हरी ओम आश्रम अलेंबिक पुरस्कार, आयसीएमआरचा वक्तृत्वासाठीचा सँडोझ पुरस्कार, श्रीनिवासय्या भारतीय जैवरसायन शास्त्रज्ञ पुरस्कार, रॅनबॅक्सी संशोधन पुरस्कार, फिक्की पुरस्कार, बंगळूरुच्या इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे मानद सदस्यत्व आणि दास यांच्या सन्मानार्थ ठेवलेली वार्षिक व्याख्याने, कॅन्सर इन्स्टिट्यूट सोसायटी ऑफ सेल बायॉलॉजीचे अध्यक्ष, असे डझनावारी गौरव प्राप्त झाले आहेत.
संदर्भ :
- https://fellows.ias.ac.in/profile/v/FL1985017
- https://www.nature.com/articles/262802a0
- http://www.insaindia.res.in/detail/N92-1097
- https://rgcb.res.in/profile.php
समीक्षक : मोहन मद्वाण्णा