टेरी ली एर्विन (१ डिसेंबर, १९४० ते ११ मे, २०२०) : कॅलिफोर्नियाच्या नापा कौंटीमधील सेंट हेलेना येथे टेरी ली एर्विन यांचा जन्म झाला. टेरी यांचे बालपण आईच्या वडिलांकडे (आजोबांच्या) हाय सिएरा येथे गेले. त्यांच्या वडिलांबरोबर त्यांनी अधिक वेगवान चार चाकी गाड्या बनवण्याचे कौशल्य प्राप्त केले.
व्हालेजो हायस्कूलचे शिक्षण संपवून एर्विन यांनी जीवविज्ञानातील पदवी मिळवली व पदव्युत्तर शिक्षण सॅन जोस स्टेट कॉलेजमधून पूर्ण केले . अल्बर्टा विद्यापीठातील जॉर्ज बॉल यांच्याकडे जमिनीवरील भुंगेरे या विषयावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी मिळवली . या भुंगेर्यांना काराबिड (carabid) बीटल असे नाव आहे. पावसाळ्यात आपल्याकडे हिरवे-सोनेरी कवच असलेले भुंगेरे आढळतात ते या काराबिड कुळातील आहेत. या कुळात अंदाजे चाळीस हजार भुंगेर्यांचा समावेश होतो. हावर्डमध्ये फिलिप जे डार्लिंग्टन यांच्याकडे ते पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी रुजू झाले. त्याच वेळी त्यांनी युनायटेड स्टेटस नॅशनल म्युझियममध्ये कीटकशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. युनायटेड स्टेटस नॅशनल म्युझियमचे नामकरण पुढे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट असे करण्यात आले.
पनामा भागातील भुंगेर्यांचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पावर एर्विन काम करू लागले. पनामाच्या वनातील एका वृक्षाच्या पर्णमंडपी म्हणजेच पर्णछतावर कीटक नाशकाचा फवारा करीत. फवार्यानंतर एर्विन त्या वृक्षाखाली पडलेले कीटक गोळा करीत. ल्युहिया सिमानी (Luehea seemannii) जातीच्या एका वृक्षाखाली त्यांनी १,२०० जातीचे भुंगेरे गोळा केले. त्यातील १६३ जातीचे भुंगेरे फक्त या एकाच वृक्षावर सापडले. परिसरातील दुसर्या कोणत्याही वृक्षावर ते रहात नव्हते. ल्युहिया सिमानी हा दक्षिण अमेरिकेतील सदाहरित वनातील माल्व्हेसी कुळातील एक वृक्ष आहे. सदाहरित वनात वृक्षांच्या पन्नास हजार जाती आहेत. एकूण कीटकांपैकी या वनात भुंगेरे चाळीस टक्के आहेत. एर्विन यांच्या अंदाजानुसार वनात असलेल्या संधीपाद प्राण्यांची संख्या तीन कोटी असावी . त्यांच्याआधी वैज्ञानिकांनी ही संख्या फक्त दीड लाख असावी असा अंदाज केला होता.
एर्विन हे सोसायटी ऑफ सिस्टेमॅटिक बायॉलॉजिस्टचे दोन वर्षे सचीव होते. त्याच काळात झू कीज या वर्गीकरणावरील शास्त्रीय नियतकालिकाचे ते प्रमुख संपादकही होते. आपल्या अभ्यासाद्वारे त्यांनी २० प्रजाती आणि ४०० कीटक जातींची भर कीटक विज्ञानात घातली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याची नोंद म्हणून त्यांचे नाव ४७जाती, एक उपकुळ व एका उपजातीस देण्यात आले आहे.
त्यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. अखेरच्या दिवसापर्यंत स्मिथसोनियन नॅशनल म्युझियमच्या कोलिओप्टेरा (Beetle- भुंगेरे) विभागाचे संग्रहतज्ञ व संशोधक या नात्याने ते काम करीत होते.
संदर्भ :
- https://zookeys.pensoft.net/articles.php?id=5168
- https://news.mongabay.com/2020/05/legendary-entomologist-terry-erwin-passes-away-at-age-79/
समीक्षक : किशोर कुलकर्णी