माधव धनंजय गाडगीळ: ( २४ मे १९४२ – ) माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म पुणे शहरात झाला. माधव यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यांचे वडील धनंजयराव ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे’ आजीव सदस्य होते. सलीम अलींसारखे ख्यातनाम पक्षीतज्ज्ञ त्यांचे मित्र होते. जे. बी. एस. हाल्डेन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गाडगीळांच्या वडिलांच्या परिचयाचे होते. त्यांचे घर पुण्यात जैवविविधता टिकवून ठेवलेल्या वेताळ टेकडीच्या परिसरात असल्याने, भटकंती करणाऱ्या माधवरावांना जीवशास्त्र या विषयात रस निर्माण झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदवी मिळवली. नंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथून सागरी जीवविज्ञानातील पदव्युत्तर पदवी मिळवली.
पीएच्.डी.च्या अभ्यासासाठी पुढे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात ते गेले. जीवशास्त्र विषयात गणितीय प्रतिमानांचा आधार असणारा प्रबंध सादर करणारे माधवराव हार्वर्डमधील पहिलेच विद्यार्थी होते. त्यांच्या या कामाचा संदर्भ पुढे अनेक संशोधक दीर्घ काळ देत राहिले. गाडगीळांना विल्यम बॉसर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली माशांच्या वर्तनाबद्दल जीवविज्ञानातील पीएच्.डी. मिळाली. त्यांच्या संशोधनासाठी हार्वर्ड कंप्युटिंग सेंटरने आय.बी.एम. शिष्यवृत्ती त्यांना दिली होती.
हार्वर्ड विद्यापीठात उपयोजित गणित संशोधन अभिछात्र पदावर त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्र व्याख्याता, स्टॅन्फर्ड विद्यापीठात मानवी जीवशास्त्राचे अतिथी प्राध्यापक व्याख्याता, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलीत सन्माननीय भारतीय अमेरिकन व्याख्याता अशी पदे भूषविली.
पुढे माधव गाडगीळ भारतात परतले. त्यांनी पुण्यात दोन वर्षे ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्समध्ये (आता आघारकर संशोधन संस्था)’ वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहिले.
भारता बाहेरील प्रतिष्ठित विद्यापीठांत अतिथी प्राध्यापक, व्याख्याता इत्यादी पदांवर संलग्न असताना १९७३ ते २००४ दरम्यान ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळूरू हे त्यांनी आपल्या कामाचे केंद्र ठेवले. तेथे आधी सहाय्यक, सहयोगी प्राध्यापक, नंतर प्राध्यापक आणि शेवटी त्यांनी तेथेच ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ ही संस्था स्थापन केली व तिचे ते अध्यक्ष होते. ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’चे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील संशोधक, शिक्षक, प्राध्यापक, धोरणकर्ते, शेतकरी, स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ते आणि अधिकारी एकत्र येऊन काम करत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही संस्थेने जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन उपक्रमांत जोडून घेतले. गाडगीळांच्या प्रभावामुळे संस्थेच्या पर्यावरण विषयक सर्व प्रकल्पांत प्राण्यांचे वर्तन देखील सातत्याने अचूक आकडेवारीत नोंदण्याचे धोरण ठेवले गेले. विज्ञानात अशा संख्यात्मक नोंदींचे विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरते. माणूस हा देखील जैवविविधतेतील एकात्म पर्यावरणीय घटक आहे. तो पर्यावरणातून वगळून चालणार नाही, अशी विचारसरणी गाडगीळांनी ठेवल्यामुळे जैवविविधता संरक्षण, संवर्धनात स्थानिक लोकांच्या विरोधाची धार बोथट झाली.
गाडगीळांना १९७६ मध्ये कर्नाटक शासनाने बांबू या नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास करण्याची विनंती केली. या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की वनसंपत्तीवर आधारित उद्योगांना मिळणाऱ्या काही सवलती अयोग्यच नाहीत तर हानिकारकही आहेत त्यामुळे त्या काढून घेतल्या गेल्या.
गाडगीळ केंद्र शासनाच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन करण्यासाठीच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्याचा आराखडा बनवून स्वतंत्र पर्यावरण विभाग साकारला. जीवावरण संवर्धनासाठी ‘निलगिरी’ टेकड्या संरक्षित क्षेत्रासाठीचा प्रकल्प आराखडा गाडगीळांनी तयार केला. भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. १९८६ ते १९९० या काळात ते भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्य राहिले. जैवविविधता परिषदेच्या सल्लागार समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पंतप्रधानांच्या पुढाकाराने वाघांचे संरक्षण, व संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापलेल्या विशेष कार्यगटाच्या पाच निष्णात सदस्यांपैकी ते एक होते.
गाडगीळ सैद्धांतिक अभ्यास व चिंतन यांना दऱ्याखोऱ्या, नद्या, वने, अशा क्षेत्रांत हिंडून प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत असत. भारतातील पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय आणि विदेशांतील उत्तर दक्षिण अमेरिका जोडणारा पनामा, उत्तर-पूर्व अमेरिकेतील न्यू इंग्लंड, ॲरिझोना, पूर्व आफ्रिका येथे गाडगीळांनी अभ्यासासाठी प्रवास केला.
सत्तावीस विज्ञान महाविद्यालये, अनेक विज्ञान संस्था आणि विभाग, स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने सहा राज्यांतील दीड लाख चौ. किमी एवढ्या विस्तृत पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात त्यांचे प्रशासकीय कौशल्यही दिसले.
गाडगीळांनी आयुष्यात अनेक पारितोषिके, पुरस्कार, सन्मान मिळवले. त्यातील काही महत्त्वाचे नागरी पुरस्कार म्हणजे भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण, आय.सी.एस.एस.आर. तर्फे विक्रम साराभाई पुरस्कार आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
द एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूटने (TERI – पूर्वीचे नाव टाटा एनर्जी रिसर्च इंस्टिट्यूट) प्रमुख म्हणून गाडगीळांना आणि त्यांच्या पश्चिम घाट परिस्थितिकी तज्ज्ञ समिती सदस्यांना ( WGEEP, गाडगीळ कमिशन) पुरस्कार दिला. तो निकोलस रोजन यांच्या स्मरणार्थ पर्यावरणाबद्दल जीवअर्थशास्त्रासंबधी चाकोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी असतो. सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार दिला. त्यासाठी झालेल्या त्यांच्या नामांकन शिफारसपत्रात गाडगीळांनी भारतात पर्यावरण क्षेत्रात केले तेवढे कार्य अन्य कोणी केलेले नाही असे नोंदले आहे.
गाडगीळांनी जीवशास्त्र, पारिस्थितीकी, उत्क्रांतीशास्त्र अशा क्षेत्रांतील अभ्यासकांसाठी २२५पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. सहा इंग्रजी पुस्तकांचे ते लेखक आहेत. सामान्यांसाठी मराठी, कानडी आणि इंग्रजी भाषांतून विपुल लिखाण आणि भाषणे केली आहेत. त्यांचे समाजोपयोगी संशोधन, मार्गदर्शन आणि विज्ञानप्रसाराचे त्यांचे कार्य अथकपणे सुरू आहे.
संदर्भ :
- Gadgil, Madhav – Ecological Governance ((Retired Professor-Harvard University)
- http://www.isecoeco.org/winners-of-teri-nicholas-georgescu-roegen-awards/
- https://www.pnas.org/content/112/24/7341
- https://tylerprize.org/laureates/past-laureates/2015-tyler-laureates/
- https://www.youtube.com/watch?v=YaUJd3fhYew
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.