स्टीव्हन जे गूल्ड : (१० सप्टेंबर, १९४१ ते  २० मे, २००२) स्टीव्हन जे गूल्ड यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे वडील लेनर्ड उच्चशिक्षण घेऊ शकले नाहीत. परंतु आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे असे त्याना वाटे. स्टीव्हन केवळ पाच वर्षाचा असताना ते त्याला अमेरिकन निसर्गविज्ञान संग्रहालय दाखवायला घेऊन गेले. तेथे टिरॅनोसॉरस रेक्स (Tyrannosaurus rex) या अतिप्राचीन, महाकाय डायनोसॉरचे अवशेष पाहून छोटा स्टीव्हन जणू मंत्रमुग्ध झाला.

स्टीव्हन यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सरकारी शाळांमध्ये झाले. ओहायो राज्यातील अँटिऑक महाविद्यालयातून त्यांनी भूगर्भशास्त्रात पदवी मिळविली आणि कोलंबिया विद्यापीठातून जीवाश्मविज्ञानात पीएच्.डी. मिळवली. त्यांचा प्रबंध गोगलगायीच्या जीवाववेषावर होता .  अध्यापनासाठी  ते हार्वर्ड विद्यापीठात गेले आणि नंतरचे पूर्ण आयुष्य हार्वर्ड मध्येच काम करत राहिले.

गूल्ड आणि एल्ड्रेज या जोडगोळीने त्यांच्या संशोधनातून असा निष्कर्ष काढला की सामान्यत: सजीवांच्या शरीरांत संथ गतीने बदल होत असले तरी क्वचित ते अतिवेगाने, अचानक घडतात. हे एक प्रकारचे उत्क्रांतीतील धक्का तंत्रच म्हणता येईल. अशा दोन्ही प्रकारच्या – फार संथ गतीने दीर्घकाळ आणि तीव्र वेगाने थोडा काळ होणाऱ्या बदलांच्या एकत्रीकरणामुळे नव्या सजीव-जाती अस्तित्वात येतात. हे बदल सावकाश आणि वेगाने आणि एकापाठोपाठ होतात. या प्रकारास त्यांनी ‘punctuated equilibrium (विरामचिन्हांकीत समतोल) असे नाव दिले. याचे गणितीय प्रारूप प्रसिद्ध झाले आहे.

जीव-भूगर्भ-उत्क्रांतीशास्त्र यातील विद्वान अभ्यासकांसाठी आठशेपेक्षा जास्त संशोधनात्मक लेख आणि वीस पुस्तके त्यानी लिहिली. नॅचरल हिस्टरी या मासिकासाठी सत्तावीस वर्षांच्या दीर्घ कालावधीत त्यांनी  दरमहा एक, असे तीनशे  निबंध लिहिले. या निबंधमालेचे शीर्षक होते, This view of life आणि ते शब्द घेतले होते डार्विनच्या जगप्रसिद्ध  The Origin of Species पुस्तकाच्या अंतिम परिच्छेदाच्या There is grandeur in this view of life… या ओळीतून. त्यांच्या वैचारिक निबंधांच्या संकलनातून नऊ पुस्तके प्रकाशित केली . त्यांना नॅशनल सायन्स फाउन्डेशनचा लेखन पुरस्कार मिळाला. उत्क्रांतीक्षेत्रातील योगदानासाठी गूल्डना लंडनच्या लिनियन सोसायटीचे डार्विन –वॉलेस पदक मिळाले. अतिउच्च दर्जाची कल्पकता आणि सृजनशीलता दाखवणाऱ्या व्यक्तींसाठीच्या मॅकआर्थर फेलोशिपने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना साहित्यिक कामगिरीबद्दल सेंट लुई साहित्य पुरस्कार देण्यात  आला.      

अमेरिकेतील अर्कान्सास राज्याने जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या जोडीला आणि तेवढेच तास निर्मितीवादही (creationism) शालेय अभ्यासक्रमात शिकविला जावा, असा ठराव  केला होता. या ठरावास  आव्हान देणार्‍या याचिकेमध्ये स्टीव्हन यांनी  भूगर्भशास्त्र, जीवाश्मशास्त्र आणि उत्क्रांतीशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून साक्ष दिली . स्टीव्हन गूल्ड यांच्या न्यायालयातील तर्कशुद्ध, सडेतोड युक्तिवादामुळे राज्य सरकारला कायदा मागे घ्यावा लागला. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला की निर्मितीवाद वैज्ञानिक पुराव्यांच्या कसोटीवर टिकू शकत नाही. तो अवैज्ञानिक आहे. त्यामुळे उत्क्रांतीच्या जोडीने त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. अमेरिकेतील एका राज्यासाठी दिला गेलेला हा विज्ञानाभिमुख निर्णय कालांतराने संपूर्ण अमेरिकेत आणि इतर देशांनाही  मार्गदर्शक ठरला. स्टीव्हन गूल्ड यांच्या विद्वतेचा हा सर्व मानवसमाजाला तत्काळ मिळालेला फायदा होय.

त्यांचा फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा