आदिवासी जमातींमधील कुटुंब, घराणे, कुळ, वंश अथवा जमातींचे प्रतिकात्मक चिन्ह असलेला, त्यांच्या पूर्वजांची ओळख जपणारा किंवा त्यांच्या भूतकाळाशी नाळ जोडणारा एखादा प्राणी, पक्षी, झाड, फूल, पान किंवा एखादी वस्तू म्हणजेच टोटेम किंवा कुलचिन्ह होय. कुलचिन्हवाद हे आदिवासी, भटक्या-विमुक्त टोळ्या, गोपालक, थोडीफार शेती करणारे अशी पारंपारिक अर्थव्यवस्था असणाऱ्या लोकसमूहांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कुलचिन्हवाद म्हणजे निसर्गाच्या अनुभूतीतून व्यक्त होणारे, त्यांना जगण्याचा अनोखा दृष्टीकोन देणारे अविष्कार असेही म्हटले जाते.
कुल आणि कुटुंब या दोहोंची उभारणी रक्ताच्या संबंधावर असली, तरी दत्तक घेऊन त्यांच्या संख्येत वा नातेवाईकांत भर टाकता येते. कुलामध्ये केवळ पित्याकडील किंवा केवळ मातेकडील नातेवाईकांचा विचार केला जातो, हा दोहोंमधील महत्त्वाचा भेद आहे. कुटुंबामध्ये माता व पिता या दोहोंकडील नातेवाईकांचा समावेश होतो. कुटुंब ही अस्थिर संघटना असून कुल ही त्या मानाने अधिक विशाल व स्थिर संघटना आहे. कुलात दूरच्या नातेवाईकालासुद्धा ‘भाऊ’ म्हणून संबोधिले जाते आणि आपल्या भावाप्रमाणेच सहकार्य देण्यात येते. मातृकुल पद्धतीत मुलाचा आपल्या पित्याशी सामाजिक संबंध येणार नाही आणि पितृकुल पद्धतीत त्याचा आपल्या मातेशी सामाजिक संबंध असणार नाही. कुटुंबात मात्र तसे कधीच घडत नाही; कारण तेथे माता आणि पिता या दोहोंचा समावेश असतो. कुटुंबातील मुलांनी आईचे नाव घेतले नाही, तरी ती आईकडे दुर्लक्ष करित नाहीत. त्याप्रमाणे प्राचीन कुलपद्धतीतही माता व पिता यांपैकी कोणाचाही मुलगा अनादर करित नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करित नाही. कुल याप्रमाणे कुटुंबाला शह देत नाही. कुल हा कुटुंबापेक्षा अधिक विस्तृत गट असून त्यातील व्यक्तींचे संबंध अतिशय गुंतागुंतीचे असतात आणि एक व्यक्ती अनेकांशी बद्ध असते.
‘टोटेम’ या शब्दाची व्युत्पत्ती ओजिबावा जमातीतील ‘ऑटोटेमान’ (एखाद्याच्या भावंडांपासूनचे नातेवाईक) या शब्दापासून झालेली आहे. इ. स. १७९१ मध्ये एका व्यापाऱ्याने टोटेम हा इंग्रजी शब्द प्रथम गैरसमजुतीतून वापरला. ओजीबावा जमातीतील लोक सरंक्षक देवेतेप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी काही विशिष्ट प्राण्यांच्या कातडीची झूल करून अंगावर चढवीत असत. अठराव्या शतकाच्या अखेरीस असे सिद्ध झाले की, या जमातीतील लोक त्यांच्या जवळपास वावरणाऱ्या विशिष्ट प्राण्यांच्या भितीपोटी अथवा मैत्रीसंबंध दर्शविण्यासाठी त्यांचे पूजन करतात. या बाबतीतला पहिला अभ्यासपूर्ण लेख मेथॉडिस्ट मिशनरी पीटर जोन्स यांनी प्रसिद्ध केला. त्यातील संदर्भानुसार निसर्गातील परमोच्च शक्तीने या जमातीतील लोकांना टोटेम बहाल केले. यातील करारानुसार हे कुलचिन्ह धारण करणाऱ्या व्यक्ती या एकाच कुळातील असून त्यांच्यात विवाहसंबंध निषिद्ध असतात.
एखाद्या समाजात रक्ताची नाती एकत्र येऊन जो गट तयार होतो किंवा एक कुल, घराणे, विशिष्ट आडनावे यांमध्ये एखाद्या प्राण्याला, पक्ष्याला किंवा वृक्षाला आपले दैवत मानले जाते, पूजनीय ठरविले जाते, त्याला कुलचिन्ह असे म्हणतात. त्यामुळे त्या प्राण्याला किंवा वृक्षाला आपोआपच संरक्षण मिळते. अशा प्रकारचा पर्यावरण जतनाचा दृष्टीकोनसुद्धा या कुलचिन्ह परंपरेत दिसतो. भारतातील काही आदिवासी जमातींमध्ये ही कुलचिन्ह परंपरा आहे. अशीच पद्धत ऑस्ट्रेलिया, आफ्रिका येथील जमातींतही पाहायला मिळते.
आदिवासी जमातीत निसर्गाच्या प्रती असलेला पूज्यभाव संकल्पना, चिन्हे, प्रतिमा यांच्या स्वरूपात विविध देव-देवतांना संकल्पून दर्शविला जातो. निसर्गाच्या अद्भुतरम्य शक्तीबद्दल असणारी त्यांची श्रद्धा व त्यातून व्यक्त होणारी भक्ती ही त्यांच्या पूजनाचा आधार असतो. त्यांच्या संकल्पनेनुसार निसर्गातली ही परमोच्च शक्ती (दयाळू, विनाशकारी, परोपकारी किंवा दुष्ट) राना-वनातून, नदी-तलावांतून, डोंगर-दऱ्यांतून वास करित असते. या शक्तीची पूजा मृतपात्री, मातीच्या विवध आकृत्या, त्रिशुळाच्या आकाराच्या वस्तू, मातीचे दिवे, कोरकुंमधील मेघनाद यांसारख्या साधनांद्वारे केली जाते. त्यांच्यातील मान्यतेनुसार भटकणारे आत्मे किंवा त्यांच्या पूर्वजांचे आत्मे, भूत-पिशाच, अगणित संरक्षक देवता. उदा., पिकांचे रक्षण करणाऱ्या, गुरांना घराचा मार्ग दाखवणाऱ्या, तुटलेले सांधे जोडणाऱ्या, साथीच्या रोगांपासून गावकऱ्यांचे रक्षण करणाऱ्या अशा असंख्य प्रकारच्या शक्ती निसर्गात नांदत असतात. टोटेमिझम हा आदिवासी जमातींची निसर्गाच्या प्रति असलेली आंतरिक जवळीक आणि त्याबाबतीतली त्यांची परमोच्च श्रद्धा व्यक्त करण्याचा एक अनोखा व विलक्षण मार्ग आहे. एकाच कुलातील लोकांचा पूर्वज एकच असतो. हा पूर्वज मनुष्य, मानवसदृश्य पशु, वृक्ष किंवा एखादी अचेतन वा जड वस्तू असू शकेल.
कुलचिन्हवाद समजून घेण्यासाठी जॉन फर्ग्युसन मॅकलेनन; एडवर्ड बेर्नेट टायलर; जेम्स जॉर्ज फ्रेझर; अलेक्झांडर गोल्डनवायझर; एमील द्युरकेम; फ्रँट्स बोॲस; ए. आर. रेडक्लिफ-ब्राऊन; क्लोद लेव्ही-स्राऊस अशा अनेक विद्वानांनी विविध सिद्धांत मांडले. ए. पी. एल्कीन या मानवशास्त्रज्ञांनी इ. स. १९३८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या दी ऑस्ट्रेलियन ॲबॉरिजिन्स हाऊ टू अंडरस्टँड देम या पुस्तकात कुलचिन्हवादाचे आठ प्रकार आणि सहा कार्ये सुचविली आहेत. कुलचिन्हवादाचे मुख्यत्वे ‘गट-कुलचिन्हवाद’ आणि ‘व्यक्तिगत कुलचिन्हवाद’ असे दोन प्रकार पाडले गेले आहेत. त्याच प्रमाणे त्यांचे स्वरूप व्यक्तिगत, लिंगानुरूप, मोईटी (समाजाचे दोन भाग कल्पून-सामान्यतः स्त्रिया व पुरुष-त्यातील एक भाग), विभाग, उपविभाग, कुल, स्थानीय व एकाधिक अशा प्रमाणे आहे. त्यांची कार्ये सामाजिक, पांथिक, संकल्पना, स्वप्ने, वर्गीकरणानुसार, साहाय्यक अशा भागात वर्गीली आहेत.
भारतीय कुलचिन्हवादामध्ये उपरोक्त सर्व प्रकार कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. प्रत्येक कुलाची सूर्य, चंद्र, प्राणी, पक्षी, वृक्ष (उदाहरणार्थ आंबा, पिंपळ), एखादा दगड इत्यादींपैकी एक खूण असते. सदर खूणांना आदिवासी आपले पूर्वज म्हणून मानले आहेत. ज्या आदिवासींचे कुलचिन्ह एखादे झाड असते, ते लोक त्या झाडाचे फळ भक्षण करित नाहीत किंवा त्याच्या लाकडाचा ज्वलनासाठी उपयोग करित नाहीत. कुलप्रतीकांची पूजा व भक्ती केल्याने आपली भरभराट होऊन संकटापासून आपले निवारण होते, अशी धार्मिक समजूत आदिवासींमध्ये आहे. आदिवासीमधील मनुष्याची ओळख सांगणारे त्याचे नाव, त्यांची आडनावे कुलचिन्हांवरून पडतात. त्यांची कुलचिन्हे ही नैसर्गिक घटकांशी संबंधित असतात. कुलचिन्हे ही एखाद्या आदिवासी घराण्याची वंशपरंपरा सांगणारी एखादी प्रतिकात्मक गोष्ट होय. कधी ते झाड, प्राणी, पक्षी, धरती, तर कधी एखादे औजार किंवा हत्यारही असते. याशिवाय प्राणिज, पक्षीज गोष्टीही या संग्रहात येतात. उदा., अंडे, विविध पक्ष्यांची पिसे इत्यादी. एखाद्या कुटुंबाचे कुलचिन्ह ज्या वृक्ष, प्राणी व पक्षी यांच्यावरून असतात, त्या कुटुंबांकडून त्या वृक्ष, प्राणी व पक्षाला आपोआपच संरक्षण दिले जाते. उदा., कोरकू जमातीची ‘अखंदी’ (प्रकाशमान सृष्टी किंवा पित धरणी), ‘अलकोम’ (अंडे-निर्मितीचे प्रतिक), ‘कसदा’ (धरती), ‘सिला’ (खेकडा- जो अत्यंत विपरित परिस्थितीतसुद्धा टिकून राहतो), ‘भूसुम’ (बेल वृक्ष) इत्यादी निसर्गाची प्रतीके असून ती पुजली जातात.
गावाच्या बाहेर, वेशीवर वाघोबाचे (वाघदेव) मंदिर असते. गावातील काही आदिवासी आपल्या मुले, गोधन, कोंबड्या, बकऱ्या यांच्या सुरक्षिततेसाठी या देवाचे पूजन करतात. महादेव कोळी लोक ‘वरसु (वरस) बाई’ देवीची पूजा करतात. ‘वरसु’ नावाची वनस्पती त्यांच्यात मुख्य असून काहींचे वरसु हे झाड कुलचिन्ह आहे. त्यामुळे ते लोक त्या झाडाची कधीच कत्तल किंवा ते जाळत नाहीत. असे केले, तर देवीचा कोप होऊन लकवा मारतो अशीही काहींची श्रद्धा आहे. अनेक आदिवासी जमातींचे कुलचिन्हे विविध झाडे आहेत. त्या झाडांच्या लागवडी, देखभालीकडे लक्ष पुरविले जातात. त्यामुळे अजूनही या प्रथा जिवंत असून त्याचे काटेकोरपणे पालन होते. त्यामुळेच वनसंरक्षण आणि वनसंवर्धनासही मदत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील गोंड जमातीमधील ‘ठाकूर देव’ म्हणजे धान्य, पीक, सुखसमृद्धी देणारा देव होय. तो गावाच्या वेशीवर, शेताच्या बांधावर, एखाद्या झाडाखाली, आभाळाचे छत पांघरलेला असतो. पेरणीपूर्वी ही जमात आपल्याकडील बियाणे जमिनीला अर्पण करतात आणि सुख समृद्धी व भरघोस पीक येण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतात. भविष्य दाखविणारा देव असेही या देवाला श्रद्धेपोटी मानले जाते. तसेच ‘गड्माता’ म्हणजे मातीपासून बनविलेल्या घोड्याच्या छोट्या प्रतिमा होय. ही गावाची रक्षणकर्ती देवता आहे. गोंड व परधान जमातींत प्रत्येक लग्नाच्या वेळी सालईच्या झाडाचा मुंडारा (लग्नखांब) उभारतात. तो मुंडारा घराण्याचे कुलचिन्ह असतो. मुंडारा उभारताना नवदाम्पत्याने त्या झाडाची फांदी जमिनीत रोवायची आणि ते झाड वाढवायची जबाबदारीही अंगावर घ्यायची अशी पद्धत असते. या वृक्षावर ‘पेरसापेन’ नावाच्या देवतेचा वास असतो, अशी यांची समजूत आहे. म्हणूनच वृक्ष तोडण्यापूर्वी या देवतेचे पहिले पूजन केले जाते.
आदिवासी जंगलाचे राजे असून त्यांचे अस्तित्व जंगलातील साधन संपत्तीवर अवलंबून आहे. पिढ्यांपिढ्यांच्या वास्तव्यामुळे आजुबाजूची नैसर्गिक परिसंस्था आणि आदिवासी यांच्यात एक साहचर्याचा नातेसंबंध दिसतो. कुलचिन्हांसारख्या शिस्तबद्ध नियंत्रणाद्वारे हा नातेसंबंध अधिकाधिक स्पष्ट व दृढ झालेला दिसून येतो. आदिवासींचे कुलचिन्हे ही विविध वृक्ष, प्राणी, पक्षी असल्यामुळे ते निसर्ग पूजक आहेत. आदिवासींची आडणावेसुद्धा कुलचिन्हांवरून असतात. अनेक आदिवासी लोक विशेषत: स्त्रीया आपल्या शरीरावर कुलचिन्हे गोंदवून घेतात. त्यामुळे आदिवासींमध्ये कुलचिन्हाला अनन्य महत्त्व आहे, हे लक्षात येते.
संदर्भ :
- जोशी, बी. आर.; कुलकर्णी, पी. के.; कुलकर्णी, शौनक, समाजशास्त्र मानवशास्त्र : संज्ञा सिद्धांतांचा कोश, पुणे, २००८.
- मेहेंदळे, य. श्री., सामाजिक मानवशास्त्र, पुणे, १९६९.
- Deogaonkar, S., The Korku Tribels, New Delhi, 1990.
- The New Encyclopedia Britannica, Vol. 26, Chicago, 2003.
- Russell, R. V., Rai Bahadur, Hiralal, The Tribes and Castes of Central Province of India, Volume 3, London, 1916.
- Sing. K. S., People in India, 2004.
समीक्षक : शौनक कुलकर्णी