आफ्रिकेतील झँबीझी नदीवरील एक जगप्रसिद्ध व निसर्गसुंदर धबधबा. हा धबधबा उत्तरेकडील झँबिया आणि दक्षिणेकडील झिंबाब्वे या दोन देशांच्या सीमेवर आहे. याचे भौगोलिक स्थान हे १७° ५५’ २८” द. अक्षांशावर आणि २५° ५१’ २४” पू. रेखांशावर आहे. धबधब्याची रुंदी १,७०८ मी. आणि उंची १०८ मी आहे. या धबधब्यावरून प्रतिसेकंद १,०८८ घ. मी. इतके पाणी वाहते. रुंदी आणि उंचीचा विचार करता उत्तर अमेरिकेतील जगप्रसिद्ध नायगारा धबधब्यापेक्षा व्हिक्टोरिया धबधबा दुपटीने मोठा आहे.
झँबीझी नदीचे सर्वाधिक रुंद (१,७०८ मी.) पात्र असलेल्या ठिकाणीच हा धबधबा असून तो संपूर्ण पात्रावरच विस्तारलेला आहे. धबधब्याच्या तोंडाशी अनेक छोटीछोटी बेटे, खळगे आणि भूशिरे आहेत. त्यामुळे अनेक मुखांनी हा धबधबा खाली कोसळतो. खाली कोसळताना पाण्याच्या गरजण्याचा प्रचंड आवाज येतो. तसेच तेथे धुक्याचे व पाण्याच्या तुषारांचे लोट निर्माण होताना दिसतात. त्यामुळेच तेथील कलोलो-लोझी लोकांनी या धबधब्याला ‘दी स्मोक दॅट थंडर्स’ हे नाव दिले. सततच्या पाण्याच्या तुषारांमुळे येथे कायम इंद्रधनुष्याची छ्बी पाहायला मिळते. त्यामुळे याला इंद्रधनुष्याचे ठिकाण (दी प्लेस ऑफ रेनबो) या नावानेही ओळखले जाते. जेव्हा नदीचे पाणी कमी होते, तेव्हा धबधब्याची पूर्वेकडील मुखे कोरडी पडलेली असतात.
व्हिक्टोरिया धबधब्याचे पाणी मूळ खुल्या पात्रात कोसळत नाही, तर वेगवेगळ्या रुंदीच्या (२५ ते ७५ मी.) भगदाडांत कोसळते. पाणी जेथे कोसळते, त्याच्या पुढे दोन्ही काठांवर बेसाल्ट खडकातील सरळ तटांसारखे उंच कडे निर्माण झालेले आहेत. त्यामुळेच तेथे भगदाडे पडली आहेत. धबधब्यापुढील पाण्याचा निर्गममार्ग फारच अरुंद आहे. उभ्या कड्यांच्या अटकावामुळे धबधब्याचे संपूर्ण पाणी केवळ ६५ मी. रुंदीच्या आणि १२० मी. लांबीच्या घळईतून (निदरीतून) बाहेर पडते. त्या घळईच्या मुखाशी ‘बॉइलिंग पॉइंट’ नावाचा खोल खड्डा असून पुराच्या वेळी त्यात नदीचे पाणी वेगाने घुसळले जाऊन तेथे मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण होतो. बॉइलिंग पॉइंटच्या पुढेही नदी वेड्यावाकड्या वळणांच्या निदरीतूनच पुढे वाहत जाते. तेथेच या घळईवर व्हिक्टोरिया फॉल्स (झँबीझी) ब्रिज हा पूलमार्ग काढला आहे. त्यावरून झँबिया-झिंबाब्वे यांना जोडणारा लोहमार्ग, मोटारमार्ग आणि पादचारी मार्ग गेलेला आहे. त्यापुढेही बेसाल्ट खडकाच्या पठारी प्रदेशातून वाहताना नदीने सुमारे १०० किमी. लांबीची आणि १२० ते २४० मी. खोलीची बटोका निदरी निर्माण केली आहे.
व्हिक्टोरिया धबधब्याच्या वरील भागात झँबीझी नदी बेसाल्ट खडकातील रुंद, सपाट आणि उथळ पात्रातून वाहत असते. तेथील पात्रात अनेक वनाच्छादित बेटे आढळतात. जसजसे धबधब्याच्या दिशेने जाऊ तसतशी बेटांची संख्या वाढत जाते. तसेच धबधब्याच्या वरच्या भागातील नदीखोऱ्यात केवळ सर्व दिशांना शेकडो किमी.पर्यंत पसरलेले सपाट पठार आढळते.
ब्रिटिश समन्वेषक डेव्हिड लिव्हिंग्स्टन या पहिल्या यूरोपीय व्यक्तीने १६ नोव्हेंबर १८५५ रोजी हा धबधबा पाहिला. डेव्हिड यांनी ग्रेट ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांच्या सन्मानार्थ या धबधब्याला व्हिक्टोरिया हे नाव दिले. धबधब्याच्या वरील पात्रात जी दोन प्रमुख बेटे आहेत, त्यांपैकी झँबियाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या बेटाला डेव्हिडच्या नावावरून ‘लिव्हिंग्स्टन बेट’ हे नाव दिले आहे.
व्हिक्टोरिया धबधब्याच्या परिसरात ‘व्हिक्टोरिया फॉल्स नॅशनल पार्क’ (झिंबाब्वे) आणि मोसी-ओअ-तुन्य नॅशनल पार्क’ (झँबिया) ही दोन राष्ट्रीय उद्द्याने आहेत. त्यांत खेळाच्या, हौशी शिकारीच्या व मनोरंजनाच्या सुविधा आहेत. परिसरात दाट अरण्ये असून त्यांत असंख्य वन्यप्राणी आढळतात. दरवर्षी जगभरातील असंख्य पर्यटक हा धबधबा आणि त्याचा परिसर पाहण्यासाठी येत असतात. १९८९ मध्ये व्हिक्टोरिया धबधबा आणि त्याच्या परिसरातील उद्यानांचा जागतिक वारसास्थळांत समावेश करण्यात आला आहे.
समीक्षक : वसंत चौधरी