हे एक चिकण माती प्रकारातील मृद्-खनिज आहे. जांभा आणि बॉक्साइट खडकांतूनसुद्धा हे खनिज इतर मृद्-खनिजांसोबत आढळते. हॅलॉयसाइट हे खनिज भूवैज्ञानिक ओमेलियस द हॅलॉय (१७०७ – ७९) यांना बेल्जियममध्ये सर्वांत आधी आढळले. त्यांच्या नावावरून १८२६ मध्ये या खनिजाला हॅलॉयसाइट हे नाव देण्यात आले. हे खनिज वरवर पाहता अस्फटिकी असून त्याची संरचना चादरीसारखी स्तरित असते. पण त्याच्या या संरचनेमुळे यांच्या मातीच्या प्रकारात पाणी धारण क्षमतेत चांगली वाढ होताना दिसते. यांच्यातील पाण्याच्या प्रमाणात मातीची धनभारित विद्युतकण विनिमय क्षमता (Cation exchange capacity) अवलंबून असते. हे खनिज द्वितीयक पद्धतीने तयार होताना त्याचे अतिसूक्ष्म कण तयार होतात आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे प्रकाशकीय गुणधर्म स्पष्टपणे दिसत नाहीत. मात्र, त्याची सममिती एकनताक्ष दिसत असल्याने द्वि-अक्षीय आहे. रंग पांढरा किंवा त्याच्या पिवळसर, लालसर, तपकिरी वा हिरवट छटा आढळतात. कस पांढरा; विशिष्ट गुरुत्व २–२.२; कठिनता १-२; चमक मंद व मातकट; अपारदर्शक; भंजन उपशंखाभ. रासायनिक संघटन Al4Si2O5(OH)4.2H2O.

सामान्यत: पाण्याच्या सान्निध्यात, उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय हवामानात या आणि याच्या सारख्या इतर चिकणमाती खनिजांच्या निर्मितीस जास्त अनुकूलता असते. हॅलॉयसाइटची निर्मिती ही नैसर्गिक चक्रानुसार होणार्‍या झीज आणि धूप या प्रक्रीयांद्वारे, मुख्यत: कोणत्याही खडकांतील फेल्स्पार खनिजांपासून (हायड्रोथर्मल) उष्णजलीय बदलांमुळे होते आणि बहुतेकदा हे कार्बोनेट खडकांजवळ आढळते. फेल्स्पारांचा उत्तापजलीय विद्राव (Hot water dissolution) होऊन भूपृष्ठाची झीज होताना हॅलॉयसाइट तयार होते.

पोलंडमधील लेग्निकाजवळील डिनिनो हे जगातील सर्वांत मोठे हॅलोसाइट साठा आहे. यामध्ये अंदाजे १० दशलक्ष टन साहित्य साठा आहे. बेल्जियम, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व यूरोपातील इतर काही देशांत ते आढळते. उच्च क्षमतेचे सिमेंट व उच्च दर्जाच्या चिनी मातीच्या वस्तू बनविण्यासाठी त्याचा वापर होतो. भारतामध्ये काही ठिकाणी विलगावस्थेत याचे अल्प प्रमाणात साठे आढळतात.

हॅलॉयसाइट हे वायू किंवा द्रवपदार्थ यांना स्वत:कडे आकर्षित करून घेण्याची शक्ती असणारा एक कार्यक्षम विनिमक असल्याने ते पेट्रोलियम क्रॅकिंग उत्प्रेरक म्हणून वापरले जाते. तसेच विविध नॅनो घटकांमध्ये नैसर्गिक किंवा सुधारित स्वरूपात, नियंत्रित आकार देण्यासाठी फिलर म्हणून वापरतात.

संदर्भ :

  • https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=57573250

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर