हर्सीनाइट हे स्पिनेल गटातील लोहयुक्त खनिज आहे. चेक रिपब्लिकच्या बोहीमिया जंगलाचे लॅटिन नाव सिल्वा हर्सीनिया  हे आहे. या जंगलात ते सर्वप्रथम सापडल्याने एफ्. एक्स्. एम्. झिप यांनी त्याला हर्सीनाइट हे नाव दिले (१८३९). त्याला लोह स्पिनेल असेही म्हणतात. स्फटिक घनीय असून त्याचे उत्कृष्ट अष्टफलकीय स्फटिकसुद्धा आढळतात. ते अस्फटिकी, कणीय व घन रूपातही आढळते. पाटन अस्पष्ट; कठिनता ७.५; विशिष्ट गुरुत्व ३.५; चमक काचेसारखी; भंजन खडबबरीदेडित; रंग काळा, हिरवट-निळा, पिवळा वा तपकिरी; कस गडद हिरवा. रासायनिक संघटन FeAl2O4. (FeO. Al2O3).

हर्सीनाइट हे लोहसंपन्न मृदाखडकांच्या उच्च प्रतीच्या रूपांतरणात तयार होतात. अतिउच्च तापमानाला तयार होणाऱ्या अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अगदी कमी असणाऱ्या) आणि मुख्यतः लोहयुक्त व मॅग्नेशियमयुक्त सिलिकेटी खनिजांनी (उदा., ऑलिव्हीन, पायरोक्सीन) बनलेल्या अग्निज खडकांतही ते तयार होते. एमरी, कुरुविंदाबरोबर तसेच अँडॅलुसाइट, सिलिमनाइट व गार्नेट या खनिजांबरोबरही हर्सीनाइट आढळते.

अमेरिका, चेकोस्लोव्हाकिया, दक्षिण आफ्रिका, चीन, म्यानमार व ऑस्ट्रेलिया या देशांत आणि भारतातील आंध्र प्रदेशात कँब्रियन पूर्व खडकांमध्ये हर्सीनाइट आढळते. कठिणता अधिक असल्याने अपघर्षक म्हणून एमरी उद्योगात तसेच गौण रत्न म्हणून त्यांचा उपयोग केला जातो.

संदर्भ :

  • https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=6969614

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर