फिराक गोरखपुरी : (२८ ऑगस्ट १८९६-३ मार्च १९८२). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार लाभलेले एक श्रेष्ठ उर्दू कवी. फिराक गोरखपुरी यांचे मुल नाव रघुपती सहाय ‘फिराक’ असे होते. उर्दू भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक. ते कवी, लेखक आणि समीक्षक म्हणून परिचित होते. ‘ फिराक’ यांचा जन्म उत्तरप्रदेशातील गोरखपूर इथे कायस्थ कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मुन्शी गोरखप्रसाद होते. ते प्रख्यात वकील होते. तसेच चांगले शायर होते. फिराक यांना शायरी वारसाहक्काने मिळाली असे म्हंटले तर ते चुकीचे होणार नाही. वडिलांनी तज्ञ शिक्षक नेमून फिराक यांच्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. त्यांपैकी एक शिक्षक फिराक यांना तुलसीदासांचे रामचरित मानस  वाचून दाखवीत असत. बालपणीच्या अनेक स्मृती फिराक यांच्या ‘जुग्‍नू’, ‘हिंदोला’, ‘परछायियाँ ’ आणि ‘आधी रात’ यांसारख्या काव्यांत व्यक्त झाल्या आहेत. १९१३ मध्ये गोरखपूरच्या सरकारी ज्युबिली हायस्कूलमधून मॅट्रीक झाल्यावर त्यांनी अलाहाबादच्या म्यूर सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश केला व बी.ए. झाले.

फिराक यांनी शायरी, गझल, नज्म इत्यादी काव्य प्रकार समर्थपणे हाताळले. त्यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली होती. त्यावेळी ते पदवी परीक्षेत उत्तर प्रदेशात चौथ्या नंबरने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर ते उपजिल्हाधिकारी म्हणून निवडले गेले होते. १९२० मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतेली. त्यावेळी त्यांनी दीड वर्षाचा तुरुंगवास देखील भोगला होता. या तुरुंगवासाच्या काळात निगार  हे उर्दू मासिकपत्र त्यांच्या वाचनात आले आणि त्यामधील ‘फानी’ या कवीच्या काव्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे लखनौचा तुरूंगवासही त्यांना घडला (१९२१). तुरुंगातून बाहेर आल्यावर जवाहरलाल नेहरू यांनी त्याना अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यालयात अप्पर सचिव म्हणून नेमले. नेहरू युरोपात गेल्यावर त्यांनी ते पद सोडले होते. त्यांनी अलाहाबाद विश्वविद्यालयात इंग्रजी या विषयाचे अध्यापक म्हणून कार्य केले (१९३०-४८). त्याना उर्दू, हिंदी,आणि इंग्रजी या भाषा अवगत होत्या.

त्यांचा विवाह २९ जून १९१४ ला प्रसिद्ध जमीनदार विन्देश्वरी प्रसाद यांच्या कन्येशी झाला होता. पण ‘फिराक’ हे सौंदर्यप्रिय व्यक्ती होते. कुरूपता त्यांना कोणत्याही स्वरूपात मान्य नव्हती. या कारणानेच त्यांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त झाले असावे. फिराक यांनी पत्नीला आपल्या आयुष्यातून दुर करून एकट्याने जीवन व्यतीत केले. या लग्‍नामुळे फिराक यांची जीवनविषयक सारी स्वप्‍ने भंग पावली. त्यातच त्यांना एका प्रेमभंगाच्या आघातालाही तोंड द्यावे लागले. दीर्घ आजारानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती तर कमालीची ओढगस्तीची होती. या साऱ्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि काव्यावर खोलवर परिणाम झाला. निसर्ग, बालजीवन, स्त्रीत्व, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन हे सगळे फिराक यांच्या कवितांचे विषय बनत गेले. मानवाची गाठ, संस्कृतीची कहाणी, इतिहासातील महान क्रांत्या, याही त्यांच्या कवितांचे विषय बनल्या. इतिहासातील शक्ती त्यांच्या प्रतिभेला आपल्याकडे आकर्षित करू लागली होती. काव्यरचना करणे म्हणजे व्यक्तिगत सुखदु:खाची सूची करणे नव्हे, तर मानवी सुखदु:खाची व्याख्या करणे होय असे त्यांचे मत होते. आपल्या जोडीदाराचा शोध त्यांनी रूप  या रुबायाँ मधून घेतला असे दिसते.

इंग्रजीतील वर्ड्‌स्वर्थ आणि उर्दूतील मीर, मुसहफी व गालिब या स्वच्छंदतावादी कवींच्या प्रभावाखाली असतानाच १९१६ मध्ये फिराक यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. फिराक यांनी एकंदर ३२ पुस्तके लिहिली. त्यात १८ उर्दू काव्यसंग्रह, ५ हिंदी गद्य-पद्य पुस्तके, ७ इंग्रजी पुस्तके आणि २ अनुवाद यांचा समावेश आहे. काव्यसंग्रहरूहे काईनात (१९४५), रूप (१९५७), गुल ए नग्‍मा (१९५९), शुल-ए-साझ, गजलिस्तान (१९६५), शब्‍नमिस्तान (१९६५), शिरीस्तान (१९६६) पीछली रात ( संपादित, १९६९), चिरागाँ (१९६६) व गुल्बांग (१९६७); समीक्षणात्मक ग्रंथअंदाजे (१९४४), उर्दूकी इष्किया शायरी (१९४५), हाशिये (१९४७) इत्यादी. याशिवाय टागोरांच्या गीतांजलीचे व एकशेएक कवितांचे त्यांनी उर्दूत भाषांतर  केले आहे.

भारतीय साहित्याच्या अभिवृद्धीमध्ये त्यांनी उर्दू काव्यातील स्वराला आणि संस्कारांना नवीन रूप दिले. त्यांचे हे व्यक्तिगत योगदान आहे. त्यांची काव्यभाषा ही कोशातील भाषा नसून, जनसमुहाद्वारे बोलली जाणारी जिवंत भाषा आहे. त्यात शैलीची चमक, संवेदनशीलता आणि संतुलन हे गुण आढळतात, जे उर्दू काव्याच्या दीर्घ इतिहासात विरळ आहेत. फिराक यांच्या काव्यातील अंत:प्रेरित सरळपणा, अलौकिकातेला स्पर्श करतो. अर्थ आणि लय यांनी समृद्ध अशा त्यांच्या कवितेमध्ये भारतीय संस्कृतीच्या बहुरंगी छटा आणि पुनर्जागृत भारताच्या नवमतवादाच्या ह्रदयाचे स्पंदन प्रतिबिंबित झालेले आहे असे मत त्यांच्या कवितेबद्दल व्यक्त केले जाते. जीवनाचा, काव्यात्मक आणि कलात्मक अनुभव प्राप्त करणे आणि तो दुसऱ्यापर्यंत पोहचवणे हेच साहित्याचे  एकमात्र लक्ष असते अशी त्यांची काव्यात्म भूमिका आहे. उर्दू शायरीतील तृप्ती जाणून घेऊन फिराक यांनी एक नवी सौंदर्य आणि प्रेम यांची दुनिया वसवली. ज्यातील व्यक्तिगत भावनांचे सुंदर वर्णन व्यक्तिगत असूनही समूहाशी नाते जोडणारे आहे.

इंग्रजी व हिंदी साहित्याचा प्रगाढ व्यासंग आणि तल्लख कल्पनाशक्तीची अभिजात देणगी, यांमुळे फिराक यांनी प्रेम आणि जीवन यांसंबंधी एक नवी दृष्टी आपल्या काव्यातून प्रकट केली आहे. उर्दू कवितेच्या रूढ पारंपरिक कल्पना बदलून त्यांनी प्रेयसी ही प्रियकरासाठी झुरते आहे, रडते आहे आणि प्रियकर हा धीरोदात्तपणे, काहीसा ताठरपणे उभा आहे असे चित्रण केले. सौंदर्याकडे सौंदर्य म्हणून पहावे,‘मेहरबाँ ’ अगर ‘नामेहरबाँ ’ अशी उपाधी त्याच्या मागे लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मशाल  या आपल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी काम, प्रेम व वैश्विक प्रश्न यांची चर्चा केली आहे. फारच थोड्या कवींना साधेल अशा निडरपणाने त्यांनी प्रेम आणि जीवन यांच्यातील संघर्षाचे व विसंगतीचे चित्रण केले. फिराक यांच्या काव्याचा आणखी एक विशेष असा, की ते भारतीय परंपरेच्या मनोभूमीत खोलवर रूजले आहे आणि त्याच भूमीचा रंगगंध घेऊन ते तरारले आहे. त्यांच्या रूप (१९५७) या रूबा या संग्रहात हा विशेष उत्कटतेने जाणवतो. याच संग्रहाच्या प्रस्तावनेत, उर्दू कवींनी संस्कृत आणि हिंदी काव्यातील प्रतिमांचा अभ्यास करण्याच्या व त्यांतून प्रेरणा घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी स्वतः या दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्‍न केल्याचेही रूप  संग्रहातील ‘शृंगार रसकी रुबाइयाँ ’ या रचनेवरून दिसून येते. शिवशंकराने केलेले तांडवनृत्य आणि विषप्राशन यासारख्या भारतीय पुराणकथेचे अनेक संदर्भ त्यांनी वापरले आहेत. ‘कोमलपदगामिनी’, ‘करुणरस’ असे संस्कृत शब्दही त्यांनी योजले आहेत. त्यांच्या एका अत्यंत गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या शेरात त्यांनी मानवी जीवन हे रामाच्या नशिबी आलेल्या वनवासासारखे आहे, असे वर्णन केले आहे. ऐंद्रिय संवेदनांची प्रत्ययकारी चित्रे रेखाटताना चित्रमय आणि गतिमान प्रतिमांचा केलेला कलात्मक उपयोग, हा फिराक यांच्या शैलीचा आणखी एक विशेष. ‘जगमगाना’, ‘सरसराना’, ‘थरथराना’ अशा ध्वन्यनुकारी क्रियापदांची योजना करण्याची त्यांना हौस दिसते.

फिराक यांना  ज्ञानपीठ पुरस्कार (१९६९), साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०), सोविएत लँड पुरस्कार (१९६८) इत्यादी महत्वाचे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. १९७० मध्ये त्यांना साहित्य अकादमीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. त्यांच्या यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण (१९६८) नेही सन्मानित केले आहे .

वयाच्या ८६ व्या वर्षी  त्यांचे दु:खद निधन झाले.

संदर्भ :

  • http://kavitakosh.org