घोटकर, पांडुरंग : (२१ मे १९४७). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तालवाद्य वादक. विशेषतः ढोलकी सम्राट म्हणून प्रसिद्ध ते आहेत. त्यांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा हे आहे. पारंपरिक गोंधळी कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंग घोटकर यांना त्यांचे वडील अण्णा घोटकर यांच्याकडून संबळ या गोंधळातील पारंपरिक तालवाद्याचे शिक्षण प्राप्त झाले. ते अंबा, भवानी, रेणुका अशा शक्तिदेवतांचा गोंधळ सादर करू लागले. उत्तर हिंदुस्थानात ‘नाल’ नावाने परिचित असलेली ढोलकी वाजविण्यास त्यांनी प्रारंभ केला. लावणी सादरीकरणाच्या वेळच्या ढोलकीच्या बाजाचे शिक्षण तीन वर्षे पांडुरंग घोटकर यांनी लक्ष्मणराव काटे या ढोलकीपटूकडून घेतले. त्यानंतर आमिर हुसेन खाँ साहेब यांच्याकडून तीन वर्षे त्यांनी तबला वादनाचे शिक्षण घेतले. जी. एल. सामंत यांच्याकडूनही दहा वर्षे तबला वादनाचे शिक्षण त्यांनी घेतले. पुण्याचे बाळासाहेब गोखले हे प्रख्यात कथ्थक नर्तक होते त्यांच्यासोबत तबल्याची साथ करण्याचा योग पांडुरंग घोटकर यांना आला. लावणी नृत्याआधी मुजरा या भागाचे कौशल्य पांडुरंग घोटकर यांनी विकसित केले आणि ते महाराष्ट्रातील अनेक मान्यवर लावणी नर्तिकांचे गुरु ठरले. नृत्य, अदाकारी आणि गायन यांचा त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. या लावणीची बलस्थाने पांडुरंग घोटकर यांनी हेरली. कथ्थकचा पदन्यास त्यासाठी होणारे तबल्यातील बोलांचे उपयोजन आणि लावणीतील पदन्यास आणि त्यासाठी वापरण्यात येणारे विविध ताल यांचा तौलनिक अभ्यास, विविध चलनांचा अभ्यास पांडुरंग घोटकर यांनी केला.
मथुरा-द्वारका संगीतबारी फडात ढोलकी, तबला वाजविण्यास त्यांनी प्रारंभ केला. १९६१ पासून अनेक कार्यक्रमांमधून त्यांच्या ढोलकी वादनाची प्रशंसा होऊ लागली. १९६१ साली वयाच्या १४ व्या वर्षी नांदेड येथील तमाशा महोत्सवात त्यांना ढोलकी वादनासाठी गौरविण्यात आले. प्रथमच त्यांना विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळाली. १९६४ साली नेफा आघाडीवरील जवानांचे मनोरंजन करण्यासाठी सरकारतर्फे राधाबाई बुधगावकर , कमलाबाई जळगावकर, संजीवनी बिडकर या संगीतबाऱ्यांचे फड पाठविण्यात आले त्यांना ढोलकीची साथ पांडुरंग घोटकर यांनी केली होती. या संचांसोबत एक महिना त्यांनी ढोलकीवादनाद्वारे नेफा आघाडीवरील जवानांचे रंजन केले होते. १९६९ पासून जसराज थिएटर निर्मित वगसम्राट दादू इंदूरीकर यांच्या गाढवाचं लग्न या वगनाट्यात ढोलकीवादनाचे काम त्यांनी केले.
दिल्लीसह महाराष्ट्रातील अनेक भागात गाढवाचं लग्न चे शेकडो प्रयोग झाले. एक नार चार बेजार, आतून कीर्तन वरुन तमाशा, बाईचा चटका गमावला पटका , उदे ग अंबे उदे, राजकारण गेलं चुलीत अशा लोकनाट्यांमधून ढोलकी वादनाचे कौशल्य पांडुरंग घोटकर यांनी दाखविले. या विविध लोकनाट्यांमधून केवळ ढोलकीच नव्हे तर तबला, पखवाज, संबळ, दिमडी आदी तालवाद्यांचे कसब त्यांनी दाखविले. मधु कांबीकर यांच्या मधु-रत्ना कांबीकर या संगीतबारीत अनेक वर्षे ढोलकी वादनाचे काम पांडुरंग घोटकर यांनी केले. मधु कांबीकर यांनी २ जून १९७२ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांसमोर राजभवन येथे त्यांचे कलादर्शन घडविले त्यावेळी ढोलकीची साथ त्यांनी केली.
१९७२ – ७३ मध्ये बीड येथे नवरंग थिएटरच्या स्थापनेत पांडुरंग घोटकर यांनी मोलाची भूमिका बजावली. कुठलेही आर्थिक पाठबळ, लावणीचे शास्त्रशुद्ध शिक्षण नसलेल्या सामाजिक दृष्टया दुर्बल असलेल्या या क्षेत्रातील लावणी कलावंतांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. पुणे आकाशवाणी केंद्रावर अप्पासाहेब इनामदार यांनी सादर केलेल्या ‘ फुलोरा ‘ या लोककलेच्या कार्यक्रमात ढोलकी वादनाचे काम त्यांनी केले. कराडच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात अप्पासाहेब इनामदार यांनी सादर केलेल्या थांबा थोडं दामटा घोडं या लोकनाट्यात ढोलकी वादनाने पांडुरंग घोटकर यांनी छाप पाडली. १९७५ -७६ मध्ये अनेक संमेलने तसेच कला महोत्सवात त्यांनी आपली वादनकला दाखविली. पंचमवेद थिएटरने सादर केलेल्या विच्छा माझी पुरी करा लोकनाट्यात त्यांनी ढोलकी वादन केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे १९७६ मध्ये ताजमहाल हॉटेलात विदेशी पर्यटकांसाठी पंचतारांकित लावणीचा कार्यक्रम मधु कांबीकर यांनी सादर केला. या कार्यक्रमात ढोलकीची साथ घोटकर यांनी दिली. राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद, पंतप्रधान इंदिरा गांधी, पद्मविभूषण झाकीर हुसेन, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा आदी मान्यवरांसमोर आपली कला सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. गोवा राज्याच्या निर्मितीच्या वर्धापनदिनी १९७९ साली आयोजित महोत्सवात लावणी नृत्याची संरचना तसेच त्यात ढोलकी वादनाचे कौशल्य पांडुरंग घोटकर यांनी दाखविले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित अहमदनगर, जेजुरी, जुन्नर, बार्शी, सांगली, सोलापूर आदी ठिकाणी तमाशा प्रशिक्षण शिबिरात तालवाद्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. १९८१ साली जपानमधील टोकियो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवात न्यू हनुमान थिएटर चे कलावंत म्हणून पांडुरंग घोटकर यांची निवड झाली. टोकियोत त्यांनी संबळ, ढोलकी, डफ, दिमडी आदी तालवाद्यांचे दर्शन घडविले. मुंबई दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात ज्येष्ठ संगीत समीक्षक अशोक रानडे यांनी पांडुरंग घोटकर यांची मुलाखत १९८२ साली घेतली. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या मुंबई दूरदर्शन वरील विशेष कार्यक्रमात त्यांनी तालवाद्यांचे दर्शन १९८३ साली घडविले. यमुनाबाई वाईकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम १९८४ रोजी ग्रंथालीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यमुनाबाईंनी सादर केलेल्या तुम्ही माझे सावकार, अस्तमान दोन घटिका, जाईल झोक सांभाळ तोल अशा लावण्यांना तबला, ढोलकीची साथसंगत त्यांनी केली.
महाराष्ट्र महोत्सव, लोकोत्सव, मुंबई फेस्टिव्हल, मुंबई लावणी महोत्सव, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित होणारा राज्य लावणी महोत्सव अशा अनेक महोत्सवातून पांडुरंग घोटकर यांनी आपले कलादर्शन घडविले. तमाशाच्या विविध शिबिरांमधून २०० च्या वर विद्यार्थी घडविले. राजश्री – आरती नगरकर, छाया – माया खुटेगावकर, रेश्मा वर्षा परितेकर, मधू कांबीकर या संचाबरोबर न्यूझीलंड, जपान, इंडोनेशिया,रशिया, फिजी, चीन, दुबई, मॉरिशस आदी देशांमध्ये तालवाद्यांचे कौशल्य पांडुरंग घोटकर यांनी दाखविले. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार त्यांना २००२ मध्ये प्राप्त झाला आहे. अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमधून ढोलकीचे दर्शन त्यांनी घडविले आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत सन २००४ पासून निमंत्रित व्याख्याते म्हणून ते पदव्युत्तर पदविकेेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तालवाद्यांचे प्रशिक्षण देत आहेत. कृष्णा मुसळे हे त्यांचे चिरंजीव महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकीपटू असून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ढोलकीचे प्रशिक्षक आहेत. पांडुरंग घोटकर देवगिरी कॉलेज औरंगाबाद येथे लोककला विभागाचे प्रशिक्षक आहेत. महाराष्ट्रातील संबळ, ढोलकी, दिमडी, डफ, तबला आदी तालवाद्यांना सैद्धान्तिक सादरीकरणाची बैठक प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य पांडुरंग घोटकर यांनी केले आहे.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.