सातारकर, रोशनबाई :  (१९४१ – २१ सप्टेंबर २००५). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी. त्यांचा जन्म भोर संस्थान पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामबाग येथे एका शेतात झाला. रोशनबाईंना घरात सारे आत्या म्हणत असायचे. रोशनबाईंना तारा -गजरा- फुलचंद आणि सुंदर या चार बहिणी. या सार्‍या मिळून वडिलांबरोबर कसरतीचे खेळ करायचा. पुढे रोशनबाईंचे वडील मारुतराव यांना कसरतीचे खेळ झेपत नसल्यामुळे त्यांनी सर्कस सोडली. मात्र कुटुंबासमोर चरिताचा मोठा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार करून सर्वांच्या मते पिढीजात नाच गाण्याचा व्यवसाय करायचे ठरले. रोशनबाईंच्या बहिणी वर्णाने जरी सावळ्या असल्या तरी रूपाने रेखीव होत्या. तसेच सगळ्यांकडे आवाजातील सौंदर्य होते.

त्यामुळे रोशनबाई लहान असतानाच त्यांच्या पार्टीचा जन्म झाला. ‘तारा- गजरा- फुलचंद- सुंदर आणि संगीत पार्टी ‘ या नावाने नाच गाण्याच्या कलेमुळे या कुटुंबाला चांगले दिवस आले. प्रत्येकाला पोटभर अन्न मिळू लागले. पण काळाला बघवले नाही. एका वर्षाच्या अंतराने चारही बहिणीचे निधन झाले. रोशनबाईचे कुटुंब पुन्हा एकदा उघडे पडले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तेवढयातच रोशनबाईचे वडील बंधू भक्कमशेठ हे अंगापिंडाने मजबूत व त्या वेळचे प्रसिद्ध पैलवान होते. त्यांनी पुढाकार घेत रोशनबाईंना प्रेरणा दिली. रोशनबाई पायात चाळ बांधून फडावर उभ्या राहिल्या. रोशनबाईंच्या वडील बंधूनी जुन्याजाणत्या तमासगीरांकडून पारंपरिक लावण्या आत्मसात करून त्या सगळ्या लावण्या रोशनबाईंकडून घोटवून घेतल्या. शाहीर सगनभाऊ, शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या बैठकीच्या व फडाच्या अस्सल लावण्यांचा जणू खजिनाच त्यांच्याकडे होता. त्यासाठी रोशनबाईनी अथक मेहनत घेऊन, पारंपरिक लावण्यांचा बाज रसिकांना देण्यासाठी कायम प्रयत्न केले.

रोशनबाईंच्या आवाजाने त्याकाळी रसिकांच्या मनावर गारूड केले होते. तेव्हा त्यांचा आवाज ऐकण्यासाठी फेटेवाले आणि शेलेवाले पुन्हा पुन्हा तमाशाच्या थीएटरात गर्दी करायचे. रोशनबाई जातील तिथे दिलफेक आवाजाने रसिकांची वाहवा मिळवायच्या. नाशिक, नगर, पुणे, मुंबई, मनमाड, चाळीसगाव अशा विविध ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी वारंवार रसिकांच्या प्रेमाखातर रोशनबाईंना जावे लागायचे. परंतु रसिकांनी केलेल्या फर्माईशीला रोशनबाई कधीच कमी पडत नसायच्या. त्या गायन आणि अभियानात निष्णात तर होत्याच, परंतु मुद्राभिनय हा त्यांचा हातखंडा होता. कोणतीही लावणी सादर करताना त्यांची प्रत्येक हालचाल म्हणजे एक वेगळा ठसा आणि रसिकांसाठी आगळा अनुभव असे. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीने या लोकप्रिय लावणी सम्राज्ञीला दीर्घकाळ प्रतिसाद दिला. त्यांना गळ्यातील सुराने मानाचे स्थान मिळाले. लावणीचे प्रत्येक खेळ करताना परंपरेचा प्रवाह नेहमी खळाळता ठेवण्यात रोशनबाईंचा हात होता. प्रत्येक खेळाचे, बारीचे रंग, प्रसंग वेगवेगळे असतात. त्याचे अर्थकारणही वेगळे असते. फडाचा मोठा पसारा असतानाही केवळ रसिक मायबापाचे मनोरंजन करून लोकरंगभूमीचे अधिष्ठान कायम ठेवावे लागते, यावर त्यांचा भर असायचा.

त्यासाठी लावणीचा आत्मा कधीही विकला जाणार नाही इतक्या जबाबदारीचे भान रोशनबाईंनी कायम जपले होते. ‘माझ्या नवऱ्यानं सोडलीया दारू.. ‘, ‘ मला बाई जायाचे नांदायला…’, ‘उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा…’, ‘ पैठणचा शालू आज मला आना गडे पतिराज…’, ‘मला मुंबईला न्हेलं गं बया…’ ‘राया मी रंभा की उर्वशी…’, ‘साजणी जडली तुम्हावर पिरती…’, ‘ मधाची माशी चावली गं…’ अशा लोकप्रिय लावण्यांमधून रोशनबाईंनी मराठी रसिकांची मने कायम नटवली. लावणी सादर करताना मैफलीतला मुरका, नऊवारीतील डोईवरचा पदर, संगतीचे ताल, स्वर आणि कडक ढोलकीची सोबत अशा अनेकविध छटा व्यक्त करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते.

संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली ‘ नेहमीच राया, तुमची घाई ‘ ही लावणी रोशन सातारकर यांनी अशी गायली की संपूर्ण महाराष्ट्राने या लावण्यवतीला डोक्यावर घेतले. १९७५ च्या सुमारास ही लावणी खूपच गाजली. लयदार ठेका, उत्तम आवाज, अचूक ताल आणि उपजत स्वरज्ञान ही रोशनबाईंच्या लावणी गायनाची वैशिष्ट्ये होत.

संदर्भ :