राजश्री काळे नगरकर : (१- १- १९७०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलावती, चित्रपट अभिनेत्री. राजश्री दत्तात्रय काळे नगरकर या लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावती तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नृत्यात विशेष आवड असल्याने त्यांनी कोल्हापूरला जाऊन गुरुकुल पद्धतीने बाबासाहेब मिरजकर यांच्याकडून कथ्थक आणि भरतनाट्यमचे तसेच लावणीचे शास्त्रशुद्ध नृत्य प्रशिक्षण घेतले. खेळाच्या, बागडण्याच्या वयातच त्या बाबासाहेबांच्या गुरुकुलात दाखल झाल्या. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी रियाज असा त्यांचा दिनक्रम असे. कथ्थक नृत्याचे शास्त्रीय प्रशिक्षण त्यांना लावणी नृत्यासाठी पुरक ठरले. बाबासाहेब मिरजकरांच्या कडक शिस्तीत घडलेल्या राजश्री काळे नगरकर या त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ लागल्या. न्यू हनुमान थिएटरचे मालक मधुकर शेठ निराळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुंबईत कार्यक्रम सादर करू लागल्या. त्यांना अन्य कलावंतांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रख्यात तालवाद्य सम्राट पांडुरंग घोटकर यांच्याकडून त्यांनी मुजरा नृत्याचे शिक्षण घेतले तर पंढरपूरचे लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांच्याकडून त्यांनी लावणीतील अदाकारीचे शिक्षण घेतले. सत्याभामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकर, गुलाबबाई संगमनेरकर, गोविंदराव निकम आदी या क्षेत्रातील कलावंतांचा फार मोठा प्रभाव राजश्री काळे नगरकर यांच्यावर होता. राजश्री काळे नगरकर यांना नाट्यदर्पण संस्थेचा महिंद्रा नटराज पुरस्कार प्रथमतः प्राप्त झाला.

तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद यांच्याहस्ते त्यांना मुंबईतील नेहरू सेंटर येथे तो पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अभिजन रसिकांचा लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. यानंतर ‘कालनिर्णय सन्मान संध्या ‘ या कार्यक्रमात त्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आपली कला सादर केली. शिवाजी पार्क दादर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्पात बंधूंसोबत लावणी सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम पुरस्कार प्राप्त करण्याचा विक्रम त्यांनी केला. दिल्ली येथील महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवात फिकी भवन येथे लावणी दर्शन घडविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. कला मीरा नगरकर हे त्यांच्या मूळ संचाचे नाव होते. आपल्या भगिनी नलिनी, मीनाबाई, आरती, सुरेखा यांची साथ त्यांना सातत्याने लावणी दर्शनात लाभली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालकपद त्यांनी दोन वेळा भूषविले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत पदव्युत्तर पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी लावणीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे आयोजित होणाऱ्या लोकोत्सव, लावणी महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली तसेच एन. सी. पी. ए. मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित लावणी महोत्सवात त्यांनी कला सादरीकरण केले. महिंद्र नटराज पुरस्कार, सगनभाऊ पुरस्कार पंडित जसराज पुरस्कार, अ. भा. नाट्य परिषद पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तमाशा कलावतीच्या आयुष्यावर आधारित बरखा सातारकर  या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेसाठी प्रथम पदार्पण उत्कृष्ट भूमिका पुरस्कार (अभिनेत्री रंजना स्मृती )२००१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट महोत्सवात राजश्री काळे नगरकर यांना प्राप्त झाला. उस्ताद झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित जसराज अशा दिग्गज कलावंतांसमोर लावणी सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. राजश्री – आरती काळे नगरकर या भगिनींनी पारंपरिक लावणीच्या क्षेत्रात केवळ राज्य अथवा देश पातळीवरच लौकिक संपादन केला असे नव्हे तर परदेशातही लावणीची विजयी पताका फडकावली. रशिया, इंडोनेशिया, जपान,न्यूझीलंड आदी देशात त्यांनी आय. सी. सी. आर मार्फत लावणी नृत्य सादर केले तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसाठी केवळ लावणीच्याचं नव्हे तर लोकनृत्याच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या. तालवाद्य सम्राट पांडुरंग घोटकर, कृष्णा मुसळे, गायिका कीर्ती बने, सुधीर डावळकर आदींचे सहकार्य त्यांना विविध परदेश दौऱ्यात झाले. लावणी नृत्य केवळ शृंगारिक नसून भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी, ओडिसी सारखे ते अभिजात नृत्य असल्याचे मत राजश्री काळे नगरकर यांनी आपल्या कलादर्शनाने रसिकांच्या मनात बिंबवले. ‘ स्नेह तुझा केला ‘, ‘पंच कल्याणी घोडा अबलख ‘, ‘आशुक माशूक नार नाशिकची ‘, ‘अस्तमान दोन घटिका’ या पारंपरिक लावण्या राजश्री काळे नगरकर यांनी आपल्या नृत्य अदाकारी दर्शनाने लोकप्रिय केल्या.

संदर्भ :

  • खांडगे, शैला, अंतरींचें धावे, मुंबई, २०२०.