पाटणकर, वसंत सीताराम : (२० जानेवारी १९५१). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि मराठीचे प्राध्यापक. जन्म खेड, जि.रत्नागिरी येथे झाला. मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले (१९७३). यावेळी त्यांना रा.भि.गुंजीकर सुवर्णपदक व अन्य पारितोषिके प्राप्त झाली. एम.ए.सुद्धा त्यांनी मुंबई विद्यापीठ येथूनच पूर्ण केले (१९७५). ज्यात त्यांना न.चिं.केळकर सुवर्णपदक व अन्य पारितोषिके प्राप्त झाली. पीएच.डी.ही पदवीही त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख या पदावरून ते २०११ मध्ये निवृत्त झाले.

संवेदनशील कवी आणि समीक्षक म्हणून सर्वपरिचित. कविता दशकाची या कविता संग्रहातून त्यांची कविता प्रसिद्ध झाली (१९८०) तसेच विजनातील कविता हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला (१९८३). इतर प्रकाशित आणि संपादित ग्रंथ पुढीलप्रमाणे : समीक्षाकविता: संकल्पना निर्मिती आणि समीक्षा (१९९५), साहित्यशास्त्र: स्वरूप आणि समस्या (२००७), कवितेचा शोध (२०११), ग्रेस यांची कविता: काही निरीक्षणे, अनेक प्रश्न (२०१४), नामदेव ढसाळ यांची कविता : जगण्याचा समग्रतेचा शोध (२०१४); संपादने – सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका (१९७९), वाङ्मयीन महत्ता (१९९०), टी.एस.एलियट आणि मराठी नवकाव्य व समीक्षा (१९९२), ग.स.भाटे : एक वाङ्मयसमीक्षक (१९९५), द.ग.गोडसे यांची कलामीमांसा, अरुण कोलटकरांची कविता : काही दृष्टीक्षेप (१९९८), स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (१९४५ ते १९६०) इत्यादी.

कविता: संकल्पना निर्मिती आणि समीक्षा या ग्रंथात कवितेच्या संकल्पनेचे, काव्यप्रकाराच्या संकल्पनेचे स्वरूप या ग्रंथात उलगडून दाखवले आहे. काव्यनिर्मितीची प्रक्रिया तिची व्यामिश्रता आणि काव्यसमीक्षा यांचा उहापोह या ग्रंथात केला आहे. साहित्यशास्त्र: स्वरूप आणि समस्या या ग्रंथात साहित्यशास्त्राची ओळख करून देण्यात आली आहे. कवितेचा शोध या ग्रंथात पाटणकर यांनी कवितेची एकसत्त्ववादी संकल्पना मोडीत काढून तिच्या विविध उपप्रकारांना आपल्या विचारव्यूहात स्थान देत कवितेची समग्रलक्ष्यी मांडणी केली. आत्मपरतेबरोबर अनात्मपरता हाही कवितेचा गुण असू शकतो, हे पाटणकर यांना जाणवले. त्यातून कवितेतील आत्मपरता आणि अनात्मपरता या भेदाला अग्रक्रम देत पाटणकर यांनी कविता या साहित्यप्रकाराची एक नवी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेच्या लयबद्धता, सांगीतिकता, अनेकार्थक्षमता, प्रयोगशीलता, वैचारिकता अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार त्यांनी या नव्या व्यवस्थेअंतर्गत केला आहे. ही व्यवस्था लावताना त्यांनी कवितेसंबंधी मराठीत झालेला विचार, संस्कृत साहित्यशास्त्र, पाश्चात्य साहित्यशास्त्र यांचा यथायोग्य आधार घेतला आहे. ग्रेस यांची कविता: काही निरीक्षणे, अनेक प्रश्न या ग्रंथात त्यांनी अर्थनिर्णय प्रक्रियेसमोर आव्हान म्हणून उभ्या राहणाऱ्या ग्रेस यांच्या कवितेच्या स्वरूपाचा वेध घेतला आहे. ग्रेस यांच्या कवितेतील आशयसूत्रे तिच्यातील अनुभवाचे स्वरूप, तिच्या रूपबंधाची उभारणी,तिच्यातून आविष्कृत होणाऱ्या विश्वाचे स्वरूप अशा विविध घटकांमधील परस्परसंबंध याची मांडणी या ग्रंथात केली आहे. ग्रेस यांच्या कवितेचा अनवटपणा स्पष्ट करत एका कवीच्या कवितेचा अभ्यास नेमका कसा करावा याची मांडणी याचा वस्तुपाठ या ग्रंथात वाचकाला मिळतो. नामदेव ढसाळ यांची कविता : जगण्याचा समग्रतेचा शोध या ग्रंथात ढसाळांच्या कवितेचे विश्लेषण केले आहे.

वसंत पाटणकर यांच्या समीक्षालेखनाचे केंद्र विशेषतः आधुनिक मराठी कविता हे आहे. त्यांच्या कविता विचाराच्या गाभ्याशी कवितेचे बिलोरी स्वरूप आणि तिची विविध केंद्रे यांची सांकल्पानिक शिस्त आढळते. यासोबतच साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र यामधील नवे नवे प्रवाह यांचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला. पूर्वकालीन समीक्षा व्यवहार लक्षात घेवून नव्या वाटा आणि नव्या दिशा शोधण्याची त्यांची भूमिका आहे. १९३० साली रा.श्री.जोग यांनी संस्कृत साहित्यशास्त्राच्या आधारे केलेल्या मांडणीनंतर संस्कृत आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रीय परंपरांतील काही महत्त्वाच्या संकल्पना-सिद्धांताचा आधार घेवून साहित्यशास्त्राशी संबंधित जवळपास सर्वच अभ्यासविषयाची मांडणी त्यांनी अनोख्या पद्धतीने केली आहे. वसंत पाटणकर यांची स्वतंत्र ग्रंथासोबत काही संपादने प्रसिद्ध आहेत. सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका या ग्रंथात निवडक एकांकिकांविषयी विवेचन केले आहे. वाङ्मयीन महत्ता या ग्रंथात वाङ्मयीन महत्ता आणि तिचे विश्लेषण केले आहे. टी.एस.एलियट आणि मराठी नवकाव्य व समीक्षा या ग्रंथामध्ये एलियटच्या वाङ्मयीन पृथगात्मतेचा विचार केला आहे, शिवाय त्याचा मराठी वाङ्मयावरील परिणाम अभ्यासला आहे. ग.स.भाटे : एक वाङ्मयसमीक्षक या ग्रंथात ग.स. भाटे यांच्या साहित्य मीमांसेचे विविध पैलू स्पष्ट केले आहेत. भाटे यांच्या साहित्यविचाराचे नेमके मर्म त्यांनी उलगडून दाखवले आहे. द.ग.गोडसे यांची कलामीमांसा या संपादित ग्रंथात गोडसे यांच्या कला मीमांसेतील सर्व महत्त्वाच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण व विश्लेषण मूल्यमापन वेवेगळ्या लेखांमधून केले आहे.

यांखेरीज त्यांनी अनेक समीक्षात्मक पुस्तके स्वतंत्रपणे व सहकार्याने संपादित केली आहेत. अरुण कोलटकरांची कविता : काही दृष्टीक्षेप या पुस्तकात अरुण कोलटकरांच्या कवितेविषयी विस्तृत स्वरुपाची चर्चा केली आहे. आधुनिकवादी कविता आणि कोलटकरांची कविता यांचा संबंध अतिशय विस्तृत पद्धतीने येथे मांडला आहे. सांकल्पानिक पातळीवरचा सहज वावर, सूक्ष्म पातळीवरील विश्लेषणाची क्षमता आणि खोलवरचा व्यासंग हे वसंत पाटणकर यांच्या समीक्षेचे महत्त्वाचे पैलू आहेत. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (१९४५ ते १९६०) या संपादित ग्रंथात १९४५ ते १९६० या कालखंडातील कवितेचे स्वरूप आणि त्या कालखंडातील निवडक कवींची कविता एकत्रितरित्या संकलित केली आहे.

राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंधही सादर केले आहेत. वसंत पाटणकर यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विजनातील कविता या संग्रहाला बा.सी.मर्ढेकर पुरस्कार (१९८६ ), महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार (१९८४-८५), साहित्य अकादेमी, नवी दिल्ली यांची नवलेखकांसाठीची प्रवासवृत्ती (१९९३), मुंबई मराठी साहित्य संघाचा साहित्यसमीक्षक पुरस्कार (२००५), कवितेचा शोध या ग्रंथाला यशवंतराव दाते स्मृती संस्था,वर्धा यांचा डॉ.भा.ल.भोळे वैचारिक ग्रंथ पुरस्कार (२०१२), कवितेच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार (२०१३) इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

अनेक प्रतिष्ठित साहित्य-स्पर्धा, साहित्य-पुरस्कार समित्यांवर परीक्षक म्हणून त्यांनी काम केले. कवी म्हणून काही कविसंमेलने, काव्यमहोत्सवात सहभाग. भारत- भवन, भोपाळ (१९९०) आणि ओरिसा साहित्य अकादमी यांच्यातर्फे आयोजित मल्टीलिंग्व पोएटस मिट या भारतीय संमेलनात सहभाग (१९९८), चिल्का लेक, भुवनेश्वर १९९८ इ .महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील काही विद्यापीठांच्या अभ्यासमंडळाचे सदस्यत्व त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा; टाकळकर,उषा आणि सहकारी, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२० ते २००३), जी.आर. भटकळ फाऊण्डेशन, मुंबई.