वाघ, विठ्ठल : (१ जानेवारी,१९४५). महाराष्ट्रातील अग्रगण्य साहित्यिक. लोककवी, कादंबरीकार, कोशकार आणि चित्रकार ही त्यांची प्रमुख ओळख. यांचा जन्म हिंगणी (ता. तेल्हारा,जि. अकोला. महाराष्ट्र) या गावी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. बालपण गावीच गेल्यामुळे कृषी आणि ग्राम संस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले. ग्रामसंस्कृती, जात्यावरील गाणी आणि लोककथा या त्यांच्या साहित्यिक अनुभवविश्वावर प्रभाव टाकणाऱ्या प्रारंभिक बाबी होत. श्री शिवाजी विद्यालय व महाविद्यालय, अकोट येथे पाचवी ते पदवीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. पुढे इंदूर विद्यापीठातून एम. ए. मराठी (१९६९), संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधून ‘पारंपरिक वर्‍हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास’ या विषयावर संशोधन करून आचार्य पदवी (१९८९) त्यांनी प्राप्त केली. श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे मराठीचे प्राध्यापक (१९६९-१९९७ ) व प्राचार्य म्हणून (१९९७-२००४ ) त्यांनी कार्य केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी योगदान दिले. मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती या संस्थेवर अध्यक्ष म्हणून, मराठी पाठ्‍यपुस्‍तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पश्‍चिम क्षेत्रीय सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साक्षरता व सांस्कृतिक मंडळ या मंडळांवर सदस्य म्हणून, तर महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव, महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव या कार्यक्रमावर परीक्षक म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

विठ्ठल वाघ यांची साहित्य संपदा : कवितासंग्रहसाय (१९७५), वैदर्भी (१९९०), काया मातीत मातीत (१९९१), कपाशीची चंद्रफुले (२०००), पाऊसपाणी (२००१), गावशिव (२००१), पंढरीच्या वाटेवर (२००१), वृषभसूक्त (२००२), मातीचा झरतो डोळा (२०१३), मायबाप (२०१९); कादंबरी –  डेबू (१९९९), डेबूजी; कोशसाहित्य – वर्‍हाडी म्हणी आणि लोकधर्म, (१९९७, वर्‍हाडी म्हणींचे संकलन व संशोधन), वर्‍हाडी इतिहास व बोली, (२००७), पारंपरिक वर्‍हाडी म्हणी (२००७), वर्‍हाडी म्हणीतील वाङ्मयीन सौंदर्य (२००७), म्हणी काञ्चन (२००८), बोलीभाषा प्रकल्पा अंतर्गत वर्‍हाडी शब्दकोश, म्हणी कोश व वाक्प्रचार कोश असे तीन कोश सिद्ध ; नाट्यअंधारयात्रा इत्यादी. बोली या द्वैमासिकाचे संपादन त्यांनी केले आहे. देवकीनंदन गोपाला (१९७८-७९) या चित्रपटाकरिता पटकथा, संवाद, गीत, व सह-दिग्दर्शन कार्य. अरे संसार संसार चित्रपटासाठी गीतलेखन व राघू मैना (१९८१) या चित्रपटासाठी गीत व सह-दिग्दर्शनकार्य, सुरवंता, मोल (२०१८), झरी (२०१८), वेगळी वाट (२०१९) या चित्रपटासाठी गीत लेखन. गोट्या (१९९०) व काज या दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी पटकथा, संवादलेखन केले आहे.

विठ्ठल वाघ यांच्या कवितेचा आशय ग्राम आणि ग्रामीण जीवन हा आहे. आशय आणि अभिव्यक्तीतील एकजीवपणा हे त्यांच्या कवितेचे प्रकट वैशिष्ट्य होय. ग्रामीण जीवनातील जनसामान्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या भाषेचा, त्यांच्याच जीवनातील प्रतिमा, प्रतिकांचा वापर त्यांनी त्यांच्या काव्याभिव्यक्तीत केला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी हे ग्रामघटक कायम अठराविश्व दारिद्र्याशी झुंजत जीवन जगत असतात. विठ्ठल वाघांच्या कवितेत शेती मातीशी निगडीत असणाऱ्या अशा लोकजीवनाचे चित्र प्राधान्याने प्रकटले आहे. माती, गावशीव, कपाशी, पाऊसपाणी, बैल या त्यांच्या काव्यातील शीर्षक प्रतिमा त्यांचे ग्रामीण आणि कृषक अनुभवविश्व अधोरेखित करतात. ‘काया मातीत मातीत’ ही त्यांची महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली कविता होय. त्यांच्या पाऊसपाणी या कवितासंग्रहात पावसाची असंख्य रूपे त्यांनी रेखाटली आहेत. पावसाच्या थेंबाथेंबाला आसुसलेले ग्रामीण समूहमन या काव्यसंग्रहात तेथील कृषीजीवन, लोकाचार, निसर्ग आणि जीवनधर्मासह अभिव्यक्त होते. पावसाला विविध उपमा देवून पावसाचे सर्वव्यापित्व या संग्रहात प्रकट झाले आहे. कपाशीची चंद्रफुले हा सौंदर्य आणि वास्तवता यातील हळुवारता टिपणारा काव्यसंग्रह होय. मानवी जीवनाविषयी काही मुलभूत सुभाषिते कपाशीच्या निमित्ताने या काव्यसंग्रहात मांडली गेली आहेत. माणसाच्या आदिम असण्यापासून त्याच्या आजच्या सुखी समृद्ध अस्तित्वासाठी कापूस एक गतिमान घटक असल्याचे मिथक या काव्यसंग्रहात दिसते. ग्रामीण परिवेश अधिक स्पष्ट करणाऱ्या प्रतिमा यातील काव्यात आढळतात. महाराष्ट्राच्या कृषीजीवनातील हापूस,कापूस आणि ऊस या तीन घटकांपैकी कापसाविषयी मुलभूत असे काव्यात्म चिंतन या काव्यसंग्रहात केले आहे. पंढरीच्या वाटेवर या त्यांच्या काव्यसंग्रहात वारकरी संप्रदाय आणि त्याभोवती वावरणारे भक्तिमय लोकमन पुन्हा कृषीजीवनाच्या संदर्भात रेखाटलेले आहे. लोकसाहित्य आणि संतसाहित्य यांच्यातील अनुबंधही यातील काव्यात दिसून येतो. ग्रामसंस्कृतीतील शृंगार भावना निष्पाप आणि निर्व्याजपणे त्यांच्या काव्यातून आली आहे. ओवी आणि अभंग या छंदाचा वापर केल्यामुळे त्यांच्या कवितेला एक उपजत नादमयता आणि गेयता लाभली आहे. लोककाव्यातील हाल, बहिणाबाई चौधरी अशा महानुभावांशी त्यांच्या काव्याचा अनुबंध जोडला जातो.

डेबू आणि डेबूजी या त्यांच्या कादंबऱ्या संत गाडगे बाबा यांच्या जीवनचरित्राचा वऱ्हाडी बोली भाषेतून वेध घेतात. संत गाडगे बाबा यांचे बालपण, त्यांना संत आणि बाबा ही महापदे प्राप्त होणे आणि कीर्तनाद्वारे समाजजागृतीचा त्यांचा जीवनालेख या दोन्ही कादंबऱ्यांतून चित्तवेधकपणे अवतरला आहे. त्यांच्या कादंबरीलेखनाचे विशेष म्हणजे त्यांनी लीळाचरित्रगोविंदप्रभू चरित्रामधील भाषा व शैलीशी जवळीक साधली आहे. लोकवाङ्मयाचा अचूक वापर त्यांनी यांत केला आहे. एकाच अर्थाचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यामुळे यांतील आशयाला ठामपणा तर लेखनाला नाद आणि वेग प्राप्त झाला आहे. म्हणींवरील संशोधनासाठी संत गाडगे बाबांच्या शेंडगाव या जन्मगावापासून ते बहिणाबाईच्या असोदा या गावापर्यंत त्यांनी पायी काव्ययात्रा केली आहे. यावेळी त्यांनी म्हणी व लोकसाहित्‍याचे संकलन करीत काव्‍यगायनातून समाज प्रबोधनही केले.

विठ्ठल वाघ यांना पारंपरिक वैदर्भीय चित्रशैलीचा वारसा लाभला आहे. हा वारसा त्यांनी जसाच्या तसा न स्वीकारता त्यात आपल्या अंगभूत प्रतिभेचा वापर करून एक वेगळीच ‘वाघली’ चित्रशैली निर्माण केली आहे. रस्त्यावर पडलेल्या तारा, नट, खिळे, चैन, बिया असे जे हातात सापडेल त्यापासून त्यांची चित्रशिल्पे आकार घेतात. हातातील फुटलेल्या बांगडीला विदर्भात ‘बिल्लोर’ म्हणतात. भिंतीवर मोर, पालखी, दिंडी, बैल, दमणी यांची शिल्पचित्रे या बिल्लोरांचा वापर करून ते काढतात. त्यांचे सर्व साहित्य, चित्रे हे मूळ आशयासोबतच वर्‍हाडी लोकसंस्कृती व्यक्त करतात. त्यांचे  व्यक्तिमत्त्व त्यांच्या सर्वच कलांमध्ये अगदी स्पष्ट दिसून येत असल्यामुळे वाघांची काव्यशैली, वाघांची गायनशैली व वाघांची चित्रशैली या स्वतंत्र नावाने या शैली सर्वदूर ओळखल्या जातात.

अमेरिका व कॅनडा अशा दोन देशात काव्यगायनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक साहित्य संमेलनातून आणि कवी संमेलनातून रसिकांना मंत्रमुग्ध व प्रभावित करणारे पहाडी आवाजातील काव्यगायन ते करतात. केवळ कविता लिहून न थांबता शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्‍यासाठी बारतांडा, पळगाव ते नागपूर अशा शेतकरी दिंड्यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्‍यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे.

त्यांच्या साहित्य कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (वर्‍हाडी म्हणी आणि लोकधर्म), केशवसूत पुरस्‍कार (पाऊसपाणी) महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी लोटू पाटील पुरस्कार (अंधारयात्रा, १९८९ ), महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव, उत्कृष्ट पटकथा पुरस्कार (देवकीनंदन गोपाला, १९७८-७९ ), उत्कृष्ट गीत पुरस्कार (१९८०-८१), प्रियदर्शिनी अकादमी काव्य पुरस्कार, मुंबई (१९९१), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे (१९९१), रा. ना. चव्हाण पुरस्कार, सोलापूर, कृषीभूषण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार,  गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार, स्वामी विवेकानंद काव्य पुरस्कार, पुणे (२००४), पुणे ग्रंथालय संघ पुरस्कार, पुणे (२००७),महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाङ्मयीन योगदानाबद्दल पुरस्कार, कविवर्य दामोदर अच्युत कारे गोमंतदेवी पुरस्कार, गोमंत विद्या निकेतन (२०१७ ), दमाणी पटेल प्रतिष्ठान कर्मयोगी पुरस्कार, सोलापूर (२०१९) असे विविध पुरस्कार त्यांना लाभले आहेत. ४५ वे विदर्भ साहित्‍य संमेलन, कारंजा, नववे कामगार साहित्‍य संमेलन, अकोला, म.सा.प. पुणे, विभागीय साहित्‍य संमेलन, बार्शी, कर्नाटकातील मराठी साहित्‍य संमेलन अशा विविध साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषविलेली आहेत.

संदर्भ :

  • काकडे, श्रीकृष्ण, काळे, रावसाहेब (संपा.), समकालीन ग्रामीण साहित्य (डॉ. विठ्ठल वाघ गौरव ग्रंथ), अकोला, २०१०.
  • काळे, रावसाहेब (संपा.), साहित्य पंढरीचा वारकरी, लोणी, अकोला,२०२०.
  • वाकोडे, मधुकर (संपा.), काया मातीत मातीत, पुणे,२००७.