रेन्यो : (४ एप्रिल १४१५—५ मे १४९९). एक जपानी बौद्ध धर्मगुरू. ते जपानच्या क्योटोमधील जोडो शिन्शू या बौद्ध धर्माच्या शाखेचे मुख्य गुरू होते. शिनरॅन संप्रदायाचे अनुयायी असलेले गुरू रेन्यो हे होन्गान्जी मंदिराचे आठवे गुरू होते. जोडो शिन्शू बौद्ध हे मुख्यतः शिन्शू संप्रदायाचे पुनरुज्जीवक मानले जातात (जपानी भाषेत–चुको नो सो). रेन्यो ‘शिन्शू-इन’ म्हणूनही ओळखले जातात. ओनीन युद्धाकाळी पूर्ण जपान ग्रस्त असताना रेन्योंनी इतस्ततः विखुरलेल्या अनुयायींना एकत्र आणून होन्गान्जी मंदिराच्या छत्राखाली अस्तित्वात असलेल्या तत्त्वशाखांना पुनःश्च आकार दिला आणि समाजातील विविध थरांमधून मोठा पाठिंबा मिळविला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जोडो शिन्शू ही शाखा जपानमधील बौद्ध धर्माची एक सर्वांत मोठी व प्रभावशाली शाखा बनली. आजही त्यांनी स्थापित केलेले ध्यानप्रकार जोडो शिन्शू शाखेच्या मंदिरांमध्ये अनुनीत होतात. तसेच त्यांच्या पत्रांचे पारायणही केले जाते.
रेन्योंचे वडील–झोन्यो–हे होन्गान्जी मठाचे सातवे मुख्य गुरू होते. त्यांची आई मात्र निम्नस्तरीय असल्याने तिला रेन्यो सहा वर्षांचे असतानाच त्यांना सोडून जावे लागले. लहानपणी रेन्योंना ‘होतेमारू’ म्हणून ओळखत. पुढे त्यांचे केन्जू असे नाव पडले. सावत्र आईशी त्यांचे सतत भांडण होई. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना सोन्नोनामक गुरूंकडून शोरेन-इन मठात दीक्षा मिळाली. वडिलांकडून जोडो शिन्शू शाखेचे तत्त्वज्ञान शिकत असताना ओमी (आताचा–शिगा प्रांत) प्रांतात धर्मप्रसारकार्यात ते सहभागी झाले. १४५७ साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी ते मुख्य गुरू (मॉन्शू) बनले आणि ओमी प्रांतात धर्मप्रसाराचे कार्य पुढे अनाहत सुरू ठेवले. या वेळी त्यांचे इक्कोइक्की या क्रांतिकारी समूहाशी जटिल संबंध होते. (१) त्यांनी आपले सर्व लक्ष ओमी प्रांतात जोडो शिन्शू शाखेच्या प्रसारावर केंद्रित केले. तो प्रांत त्या वेळी बुक्कोजी आणि किन्शोकुजी या शिन्शू संप्रदायाच्या शाखांच्या प्रभावाखाली होता. परंतु कातादा समूहाकडून वेळोवेळी आर्थिक व इतर मदत मिळत गेल्यामुळे गुरू रेन्यो होन्गान्जी शाखेचा प्रसार करू शकले. कातादा मंडळी ही ओमी प्रांतातील उच्चभ्रू लोकांची प्रस्थापना होती. (२) प्रारंभीच्या कारकिर्दीत गुरू रेन्यो सातत्याने कातादा समूहास धार्मिक ग्रंथ व नेन्बुत्सू (अमिताभ गौतम बुद्धाचे नामस्मरण) यांबाबतचे शिलालेख देत असत. या शिलालेखांत दशाक्षरी नेन्बुत्सू नामस्मरण मंत्र येतो. तो असा : ‘किम् यो जिन् जीप्पो मुगेको न्योराल’ म्हणजेच ‘मी दश दिशांना उजळविणाऱ्या तेजस्वी तथागतांना शरण जातो’ (स्वैर भाषांतर).
लवकरच गुरू रेन्योंच्या विचारांचा प्रभाव मिकावा प्रांतातही पसरू लागला. येथे त्या काळी सेन्जूजी हा बौद्धधर्मीय पंथ प्रचलित होता. वेळोवेळी प्रांतास भेट देऊन व तेथील सभाजनांसमोर शिन पंथाच्या वाङ्मयावरील स्वरचित टीका सादर केल्या. गुरू रेन्योंचे हे यश इरीयाकुजी मठाच्या (३) हियेई पर्वतस्थित तेन्दाई बौद्ध शाखेच्या मुख्य गुरूंच्या डोळ्यात सलु लागले. त्यांनी जोडो शिन्शू चळवळ हे पाखंड आहे; रेन्यो पाखंडी आहेत, असे घोषित करून शिन मठावर लढवय्या भिक्खुंकरवी हल्ला करविला. या हल्ल्यात मठाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला. यामागील खरा हेतू आर्थिक होता. तेन्दाई मठाला मिळणारी आर्थिक मदत रेन्योंमुळे कमी होईल, अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी होन्गान्जी मठाने आपल्या अधिपत्याखाली यावे व वार्षिक खंडणी भरावी, अशी मागणी केली. या दरम्यान गुरू रेन्योंचे मानसिक स्वास्थ्य खालावले. होन्गान्जी माथावरील हल्ल्यातून ते एका सामान्य विक्रेत्यामुळे वाचले; ज्याने हल्ल्याची पूर्वसूचना दिली व रेन्योंना मागील दाराने सुखरूप सुरक्षितस्थळी घेऊन गेला.
हल्ल्यानंतरची काही वर्षे गुरू रेन्यो असेच इतस्ततः भटकत राहिले. थोडा काळ त्यांनी कातादा समूहाचा आश्रय घेतला. नंतर मी डेरा या तेन्दाईच्या शक्तिशाली प्रतिस्पर्धी मंदिराच्या छत्राखाली ते राहिले. पुढे जपानच्या राजकीय परिस्थितीमुळे तेन्दाईस मिळणारी सरकारी आर्थिक मदत बंद झाली. जपानमध्ये ओनीन युद्ध जुंपले. पण गुरू रेन्योंनी धर्मप्रसाराचे कार्य येत्सू आणि योशिनो प्रांतात अव्याहत सुरू ठेवले. १४६९ साली त्यांच्या काण्टो भेटीत त्यांना त्यांच्या नववैचारिक शिकवणुकीला अनुसरणारे अनुयायी भेटले.
त्यांनी होन्गान्जीच्या शाखेची पुनर्स्थापना हियेई पर्वताच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशापासून दूरवर स्थित इचिझेन (सध्याचे–फुकुई प्रांत) प्रांतात केली. हा मठ योशिझाकी गावात समुद्रकिनार्याजवळ आहे. येथे जोडो शिन्शू पंथाच्या अनुयायांना एकत्रित करून गुरू रेन्योंनी मठाद्वारे प्रवचने व पत्रलेखन यांमार्फत शिकवण देण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांच्या शिष्यांनी ही पत्रे संकलित केली. अतिशय स्पष्ट, सरल-सुगम जपानी भाषा व शिन पंथीय तत्त्वांच्या सहज आकलनासाठी पत्रे प्रसिद्ध आहेत. सामुहिक साधनेस बसण्यापूर्वी आजही बौद्ध भिक्खू या पात्रांचे नित्य पठण करतात. साधनेसमयी मुख्य गुरूंसाठी असलेल्या उच्चासनावर न बसता गुरू रेन्यो कायम शिष्यांसमवेत बसत. म्हणून शिष्यांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदर निर्माण झाला.
जोडो शिन्शू पंथास समाजात अजून मानाचे स्थान मिळावे यासाठी गुरू रेन्योंनी नवीन नियमावली तयार केली. त्यास जपानी भाषेत ‘ओकीते’ असे म्हणतात. त्यांपैकी काही नियम खालीलप्रमाणे :
- इतर संप्रदायांच्या शिकवणुकीचा अवमान करू नये. (नियम २).
- परंपराबाह्य शिकवणुकीला जोडो शिन्शू अंतर्गत घोषित करू नये. (नियम ५).
- प्रांतातील राजकीय अधिकाऱ्यांची बदनामी व त्यांच्याशी गैरवर्तन करू नये. (नियम ६).
- सेवाव्रत धारण केले असताना मांसाहार घेऊ नये.(नियम ९).
- जुगार खेळू नये. (नियम ११).
योशिझाकी लवकरच रेन्योंच्या प्रवचनासाठी प्रसिद्ध झाले. दूरदूरच्या ठिकाणांहून लोक त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी येत. आज हा मठ ‘योशिझाकी गोबो’ म्हणून विख्यात आहे.
रेन्योंनी कायमच त्यांचे अनुयायी व तत्कालीन राजकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील याची काळजी घेतली.
सन १४७५ साली गुरू रेन्यो क्योटो प्रांतात परतले. तोपर्यंत जोडो शिन्शू शाखा ही अतिशय प्रभावी बनली होती. गुरू रेन्योंच्या अनुयायांची संख्या इतकी वाढली होती की, त्यांना पत्रव्यवहाराद्वारे संपर्क साधावा लागत असे.
गुरू रेन्योंनी ध्यानपूर्व प्रवचनाचा एक नवीन प्रघात पाडला. त्याला ‘गोन्ग्यो’ असे म्हणतात. आजही सामूहिक प्रार्थनेत त्यांची ही पद्धत वापरली जाते. त्यांनी बहुतांश बौद्ध ग्रंथांची जपानी चित्रलिपीतून (कान्जी) ‘काताकाना’नामक सहज ध्वन्यात्मक जपानी लिपीत पुनर्रचना केली. सन १४९६ साली त्यांनी एकांतवास स्वीकारला व साधनेसाठी ते योडो नदीकिनारी एक छोटा आश्रम बांधून राहू लागले. तेथेही लोक त्यांची पवित्र वाणी ऐकण्यासाठी जमू लागले. लवकरच तेथे मठ स्थापन झाला. गुरू रेन्योंच्या मृत्युपश्चात मठ इशियामा होन्गान्जी नावाने प्रसिद्ध झाला. जपानच्या इतिहासात यास महत्त्वाचे स्थान आहे.
रेन्योंची शिकवण : गुरू रेन्योंनी आपल्या पूर्वजांचा शिनरॅन संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य केले. सांप्रदायिक शिकवण त्यांनी सूत्रबद्ध केली. ही शिकवण ‘योगेमॉन’ (Ryogemon) म्हणून ओळखली जाते. त्यांच्या मते “आम्ही सर्व अंदाधुंद धार्मिक पद्धती, उपक्रम आणि आत्मनिष्ठेचे सर्व विचार त्यागले आहेत. आता तथागताचे हृदय हेच आमचे सर्वस्व आहे, जे आम्हाला पुढच्या जन्मात वाचविणारे आहे”.
शुद्ध भूमीत आपला जन्म निश्चित आहे, हे जाणून आम्हाला परमानंद होतो. त्यानंतर जेव्हा आपण भगवान बुद्धांचे नाव उच्चारतो, तेव्हा ते कृतज्ञता आणि ॠणाची अभिव्यक्ती असते. आम्ही आमच्या संस्थापक आणि गुरू शिनरॅन यांचे ऋणी आहोत, हे आम्ही कृतज्ञतेने कबूल करतो. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या नियमांचे पालन करू (योगेमॉन मठाच्या नियमावलीचे भाषांतर). ही नियमावली आजही शाखेच्या मुख्य तत्त्वांतर्गत पठण केली जाते. हे नियम बहुतांशी पारंपरिक शिन्शू पंथाच्या शिकवणुकीप्रमाणे असले तरीही काही प्रमाणात वेगळे आहेत. जसे की, १) गुरू रेन्योंनी अन्जीन (मानसिक शांती) ही संकल्पना शिनरॅनच्या शिन्जिन (खरे स्वाधीन) या संकल्पनेसह वारंवार वापरली. २) शिंतो कामी यांच्या पूजेची मनाई रद्द करून ते भगवान बुद्धांचेच अवतार, बोधिसत्त्व आहेत, याबद्दल उद्बोधन केले. ३) पुढे कियो इताईच्या संकल्पनेवर भर दिला; ज्यायोगे भ्रष्ट झालेली व्यक्ती साधनेच्या माध्यमातून ‘अमिदा’ बुद्धंत समाविष्ट होते. ४) आत्म्यावर असलेल्या ‘अमिताभ’ बुद्धांच्या ऋणावर त्यांनी विशेष भर दिला.
लेखन : शिनरॅनच्या सूक्तांमधील सुधारणेचा एक भाग म्हणून गुरू रेन्योंनी शोशिंगे–खर्या श्रद्धेचे सूक्त–जे शिनरॅनच्या मुख्य ग्रंथात–क्योगो शिन्शोत–आहे, तिच्यावर भर दिला. हे सूक्त इतर बौद्ध सूक्तांसहित प्रताराधानेच्या काळी निशी होन्गान्जी मठांमध्ये वाचले जाते.
गुरू रेन्योंनी जोडो शीन्शू पंथासंदर्भात अनेक ग्रंथ रचले. त्यांतील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे शिन्शू शाखेच्या विखुरलेल्या समूहांतील गुरूंच्या पत्रांचे संकलन, हे आहे. संकलित पत्रे ‘गोबुन्शो’ नावाने ओळखली जातात. गुरू रेन्योंची शिकवण त्यांच्या अनुयायांनी गोईचीदाई किकीगाकु या ग्रंथात संकलित केली आहे. यात त्यांनी लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे. संकलनातून गुरू रेन्योंच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो.
रेन्योंच्या या अतुलनीय कार्यामुळे त्यांना जोडो शिन्शूचे द्वितीय प्रवर्तक मानले जाते. त्यांची प्रतिमा मठांमध्ये भगवान बुद्धांच्या डावीकडे–देवस्थानी–लावलेली आढळते. बौद्धतत्त्वांचे सरलीकरण, शिनरॅन पंथाच्या नियम व शिकवणीची सहजगम्य भाषेत पुनर्रचना, मठाच्या साधनाप्रकाराची पुनर्मांडणी, सामूहिक प्रार्थनेत बदल इत्यादी त्यांची प्रमुख कार्ये गणली जातात. रेन्योंच्या शिंतो कामी तत्त्वज्ञानाबद्दल ओढ व या साधनाप्रणालीचे पालन केल्याने विद्वानांमध्ये जोडो शिन्शू पंथास रेन्यो अपायकारक ठरले की उपायकारक याबाबत मतभेद आहेत. मात्र शिनरॅन पंथ नामशेष होण्यापासून वाचविल्याबद्दल गुरू रेन्यो सर्वत्र पूजनीय आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि धर्मावरील गाढ श्रद्धा यांमुळे ते अग्रगण्य ठरले. अतः मृत्युपश्चात त्यांना ‘इतो दाईशी‘ नावाने गौरविले गेले.
संदर्भ :
- Blum, Mark L.; Yasutomi Shin’ya, Ed. Rennyo and the Roots of Modern Japanese Buddhism, Oxford, 2006.
- Dobbins, James C. Jodo Shinshu : Shin Buddhism in Medieval Japan, Bloomington, 1989.
- Kobai, Eiken, Misunderstandings of Rennyo, 1998.
- Rogers, Minor and Ann, Rennyo : The Second Founder of Shin Buddhism : with a Translation of his Letters, Berkeley, 1991.
- Sansom, George Bailey, A History of Japan to 1334, Stanford, 1958.
- Toyohara, Bishop Daijo; Ishida, Keiwa; Bloom, Alfred, The Rennyo Shônin Reader, Kyoto, 1998.
समीक्षक : सूरज पंडित