थापर, प्राणनाथ : (८ मे १९०६‒२३ जून १९७५). भारताचे माजी भूसेनाप्रमुख. लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात शिक्षण.
इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाल्यावर १९२६ मध्ये पहिल्या पंजाब रेजिमेंटमध्ये ते राजादिष्ट अधिकारी म्हणून नियुक्त झाले. १९३७ मध्ये क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी उच्च सैनिकी शिक्षण घेतले. दुसऱ्या जागतिक महायुद्धात ते ब्रह्मदेश, उत्तर आफ्रिका व इटली या ठिकाणी लष्करी कामगिरीवर होते. सेनाप्रमुख कार्यालयात साहाय्यक सैनिकी चिटणीस व सेनापुनर्घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. १९४७ च्या आरंभी ते १६१ व्या ब्रिगेडचे प्रमुख होते. १५ ऑगस्ट १९४७ ते १९५४ या काळात ते सैनिक-प्रचालन संचालक होते. स्थानापन्न जनरल स्टाफ प्रमुख, सैनिकी चिटणीस व सांग्रामिक संभाराचे मास्टर-जनरल म्हणून सेनाप्रमुख कार्यालयात त्यांनी कामगिरी केली. १९५४ मध्ये एका डिव्हिजनचे ते जनरल होते. १९५६ मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये शाही संरक्षण महाविद्यालयातून अत्युच्च संरक्षणशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. १९५७ ते १९६१ या काळात ते दक्षिण भूसेना भागाचे प्रमुख होते. ८ मे १९६१‒१९ नोव्हेंबर १९६२ यांदरम्यान ते भूसेनाप्रमुख होते. त्यांच्या कारकिर्दीतच चीनने भारतावर आक्रमण केले. परिणामतः थापर यांनी २० नोव्हेंबर १९६२ रोजी निवृत्ती स्वीकारली. १९६४ साली ते अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजदूत होते. दिल्लीजवळील छत्तरपूर खेड्यात ते स्वतःच्या शेतमळ्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला.