कूली, थॉमस बेंटन : (२३ जून १८७१ – १३ ऑक्टोबर १९४५) थॉमस बेंटन कूली यांचा जन्म अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील अॅन आर्बोरमध्ये झाला. थॉमस कूली यांचे प्राथमिक शिक्षण अॅन आर्बोर पब्लिक स्कूल तर स्कूल ग्रॅज्युएशन अॅन आर्बोर हायस्कूलमध्ये झाले. मिशिगन युनिव्हर्सिटीतून १८९१ मध्ये त्यांनी कला शाखेतील पदवी, तर पदव्युत्तर पदवी डॉक्टर ऑफ मेडिसिन मिळवली.
वैद्यक शाखेची पदवी मिळाल्यानंतर कूली यांनी बोस्टन सिटी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांसाठी उमेदवारी केली. ते मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये दोन वर्षे आरोग्यशास्त्र विभागात राहिले. नंतर त्यांनी जर्मनीमध्ये हॉस्पिटल आणि उच्च शिक्षणासाठी भेट दिली. बोस्टनला परतल्यावर त्यांना निवासी वैद्यकीय अधिकारी आणि संसर्गजन्य आजाराच्या विभागात काम करण्याची संधी मिळाली. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना आलर्क (रेबीज) संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचार करण्यासाठी कूली यांनी २५०० डॉलरचा निधी पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार करण्यासाठी वापरला. पिसाळलेला कुत्रा किंवा मांजर यांच्या चाव्यातून आलर्क रोगाचा प्रसार होतो. यावरील खात्रीलायक उपचार लुई पाश्चर यांनी पूर्वीच शोधून काढले होते. परंतु कूली यांच्या पाश्चर पद्धतीच्या ३८ रुग्णावर केलेल्या उपचारामुळे एकही रुग्ण आलर्क रोगाने दगावला नाही. ३८ पैकी ३६ रुग्ण कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या चाव्यामुळे आलर्कग्रस्त झाला होता.
कूली डेट्राइटमध्ये बालरोगतज्ञ म्हणून व्यवसाय करीत असता त्यांनी अर्भकासाठी दूध फंड सुरू केला. त्यामुळे बालमृत्यूंच्या संख्येत घट झाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मोठ्या संख्येने अतिसार झाल्याने अर्भक मृत्यू होत असत. त्याचेही प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. पहिल्या महायुद्धात त्यांनी अमेरिकन रेड क्रॉसमधील नोकरी सोडून फ्रान्समधील चार लाख युद्ध अनाथालयातील मुलांच्या रुग्णालयात ते गेले. पहिले महायुध्द संपल्यानंतर फ्रान्समधील बालके कूली यांच्या ऋणात आहेत असा मथळा फ्रान्समधील सर्व वृत्तपत्रात झळकला .
फ्रान्स येथून परतल्यावर मिशिगनमधील मुलांच्या रुग्णालयात बालरुग्ण विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी वीस वर्षे काम केले. बालकांमधील रक्तक्षय व रक्त आजारांचे ते तज्ञ होते. त्यांच्या पाहण्यात चार ग्रीक व इटली यातील पालकांना झालेली बालके आढळली. या चारही बालकामध्ये तीव्र ॲनिमिया आणि यकृत व प्लीहा यांची असामान्य वाढ, हाडामध्ये विकृती आणि त्यांची सर्वसाधारण वाढ खुंटलेली आढळली. कूली यांनी अशा लक्षण समूहास ‘इरिथ्रोब्लास्टिक ॲनिमिया’ असे नाव दिले. या आजाराचे नाव ‘कूलीज ॲनिमिया’ कधी झाले हे त्यांनासुद्धा समजले नाही. त्यांनी आपली निरीक्षणे अमेरिकन ‘जर्नल ऑफ डिसीझेस ऑफ चिल्ड्रन’ मध्ये प्रसिद्ध केली.
फ्रेंच शासनाने त्यांना मानाचे लीजन ऑफ ऑनर्स पदक देऊन गौरवले. त्यांना वायने स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये बालरोग विभागात प्रोफेसर करण्यात आले. वयाच्या सत्तराव्या वर्षी चिल्ड्रन हॉस्पिटल आणि वायने स्टेटमध्ये एमेरीटस चीफ असा बहुमान त्यांनी मिळवला. अत्यंत नीटनेटके, अभ्यासू असलेल्या त्यांना चार भाषा उत्तमपणे बोलता येत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना सतत निमंत्रणे येत असत. रक्तविज्ञान (Haematology) शाखेतील कसलीही विशिष्ट पदवी न घेता कमीत कमी उपकरणे वापरून त्यांनी संशोधन केले. एका डोळ्याने पाहायचा सूक्ष्मदर्शक, काच पट्ट्यावरील रक्त रंजक उपकरणे कार्ड व्यवस्थित ठेवण्यासाठी एक फाइल व रिकामी खोली ही त्यांची प्रयोगशाळा होती. या रिकाम्या खोलीत असलेल्या कोचावर अधून मधून ते डुलक्या काढत. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात रुग्णांबद्दल संशोधन चालू असे. बालरक्त उपचार व रक्तरुग्ण शास्त्राचा ते चालता बोलता इतिहास होते.
डेट्राइटमधील एका इंडियन व्हिलेजच्या शेजारी माइनच्या किनार्यावर त्यांचे उन्हाळी निवासस्थान होते. तेथेच थॉमस बेंटन कूली यांचे निधन झाले
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी