एप्स्टाइन, मायकेल अँथनी : (१८ मे १९२१ ) मायकेल अँथनी एप्स्टाइन, यांचा जन्म आग्नेय इंग्लंडमधील, मिडलसेक्स या लंडनच्या उपनगरात झाला. एप्स्टाइनयांचे शालेय शिक्षण सेंट पॉल शाळेत लंडनमध्ये झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. वैद्यकीय शिक्षण, मिडलसेक्स हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजात झाले. नंतरची दोन वर्षे त्यानी रॉयल आर्मी मेडिकल कोअरमध्ये अनिवार्य सेवेसाठी दिली.

नंतर ते ब्रिस्टल विद्यापीठाच्या विकृतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यानंतरही

ते नफिल्ड डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल मेडिसिनमध्ये प्रोफेसर एमेरिटस या नात्याने कार्यमग्न राहिले. त्यांची विद्यार्थिनी डॉ. इवान बार आणि डॉ. बर्ट एकाँग या वैज्ञानिकांबरोबर ह्युमन हर्पिस व्हायरस ४ (human herpes virus – 4) उर्फ एप्स्टाइन-बार (Epstein-Barr) या विषाणूचा त्यानी शोध लावला. एप्स्टाइन यांच्या कामाचे कर्करोग क्षेत्रातील महत्व ओळखून त्यांचा ॲवार्ड फॉर डिस्टिंग्विश्ड अचिव्हमेंट हे पदक देऊन गौरव करण्यात आला.

द रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे मानद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या संस्थेचे उपाध्यक्षपद त्यांनी सहा वर्षे भूषविले. त्यांना ब्रिटिश सरकारने कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर असा किताब दिला.

एप्स्टाइन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वूल्फसन कॉलेजमध्ये पंधरा वर्षे नियामक मंडळाचे सदस्य होते. नंतर ते मानद फेलोपदी राहिले. एप्स्टाइन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक सदस्य झाले. हे सदस्यत्व त्यांनी विज्ञानाच्या समाजासाठी केलेल्या उपयोगाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी देण्यात आले होते. त्यांना ब्रिटिश सरकार तर्फे नाइटहूड व सर ही उच्च सन्माननीय उपाधी देण्यात आली. एप्स्टाइन यांना राष्ट्रीय सन्मानाचे समजले जाणारे ‘द रॉयल मेडल ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात आले. ब्रिस्टल विद्यापीठाने त्याना डी.एस्सी. ही सर्वोच्च मानद पदवी दिली.

‘द लॅन्सेट’ या अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अंकात त्यांचा एक शोधनिबंध प्रकाशित झाला. त्यात बर्किट लिम्फोमा अर्बुदकारक विषाणूची माहिती दिली होती. एप्स्टाइन यांचे दोन वैज्ञानिक सहकारी, इवान बार आणि डॉ. बर्ट एकाँग हे या लेखाचे सहलेखक होते. डॉ. एकाँग चीनी वंशाचे त्रिनिदाद येथे कार्यरत असणारे विकृतीशास्त्र तज्ज्ञ होते. त्यांचे शिक्षण स्पेन व जर्मनीत झाले होते. या त्रिकुटातील दोघांची नावे त्या ‘एप्स्टाइन-बार (Epstein-Barr)’ विषाणूला देण्यात आली.

एप्स्टाइन-बार हा माणसात कर्करोग निर्माण करणारा पहिला रोगकारक विषाणूचा शोध अपघाताने लागला. डेनिस पार्सन्स बर्किट हे दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेत वैद्यकीय सेवा देत होते. मध्य-आफ्रिकेत  त्याना बालकांमध्ये  एक प्रकारचा रक्तकर्करोग आढळला होता. या कर्करोगात  श्वेतरक्त पेशी मोठ्या प्रमाणात वाढत असत. त्यांना झालेले लसीका (लिम्फोमा) अर्बुद (ट्युमर्स) त्या काळी उपलब्ध अशा कोणत्याही औषधाने बरे होत नसत. बर्किट यांच्या लक्षात आले की दमट पावसाळी व उष्ण हवामानात रक्तकर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. हिंवताप या आजारासारखा, लसीका अर्बुदही एखाद्या कीटकांमार्फत पसरणाऱ्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होत असावा असे त्यांना वाटले.

बर्किट त्यांनी लंडन मेडिकल स्कूलमध्ये उष्ण कटिबंधीय आफ्रिकन देशांत बालकांत सर्रास आढळणारा आणि आजपर्यंत अज्ञात कर्करोग लक्षण-समूह किंवा संलक्षण (syndrome)’ या विषयावर एक व्याख्यान दिले. तेथे एप्स्टाइन श्रोते म्हणून उपस्थित होते. राउस सार्कोमा या कोंबड्यांच्या कर्करोगकारक विषाणू वर (Rous Sarcoma Virus) एप्स्टाइन यांनी काम केलेले होते. बर्किट आणि एप्स्टाइन यांच्या  अनौपचारिक चर्चेत बर्किट यांनी आफ्रिकेतील बाल्र रक्तकर्करोग्यांच्या अर्बुदाचे नमुने, एप्स्टाइन यांच्या लंडनमधील इस्पितळातील प्रयोगशाळेत पाठवावे असे ठरले. एप्स्टाइन यांनी आपले हातातील काम थांबवून मानवी कर्करोगकारक विषाणू वर संशोधन  करण्याचे ठरवले.

दोन वर्षानी बर्किटच्या आफ्रिकेतील बाल्र रक्तकर्करोग्यांच्या अर्बुदाचे नमुने प्रयोगशाळेत पोहोचले. या नमुन्यांतील काही पेशी खडतर प्रवासाने सुट्या झाल्या होत्या. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातून परीक्षणात त्यांना विषाणू आढळले.

हे विषाणू मानवात कर्करोगजनक विषाणू आहेत याची अमेरिकेतील विषाणू तज्ज्ञ, वेर्नर आणि गर्ट्रुड हेन्ले याना खात्री पटली. विषाणूंना अधिकृतपणे एप्स्टाइन-बार विषाणू असे नाव दिले गेले. कालांतराने हे समजले की एप्स्टाइन-बार विषाणूंमुळे नाक, घसा, जठर इ. अनेक इंद्रियांचे आणि भिन्न प्रकारचे कर्करोग होतात.

एप्स्टाइन यांनी मुख्यतः एप्स्टाइन-बार विषाणूबद्दल शोधनिबंध प्रकाशित केले. एप्स्टाइन-बारविषाणूमुळे बी-लसिका पेशी सतत विभाजित होत राहतात. याचा उपयोग नंतर उंदरांसारख्या सस्तनी प्राण्यापासून आणि शेवटी माणसांपासूनही विशिष्ट प्रतिद्रव्ये (monoclonal antibodies) मोठ्या प्रमाणात, कमी खर्चात मिळवण्याचे तंत्र विकसित करण्यास  झाला. एकाँग यांच्या बरोबर ‘द एप्स्टाइन-बार व्हायरस’ या शीर्षकाचे एक पुस्तकही एप्स्टाइन यानी लिहिले आहे.

एप्स्टाइन लवकरच वयाची शंभरी पूर्ण करतील.

       संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा