हिंक्ले, डी. व्ही. : (१९४४ – ११ जानेवारी, २०१९) हिंक्ले यांनी लंडनमधील इम्पिरिअल महाविद्यालयातून डेव्हिड आर. कॉक्स यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पदवी मिळवली. हिंक्ले व कॉक्स यांनी मिळून संख्याशास्त्रीय अनुमान यावर पाठ्यपुस्तक लिहिले ज्यामध्ये असामान्य रुंदी आणि संकल्पनात्मक गोष्टी यांचा विचार केला होता. हिंक्ले यांनी ब्रॅडले यांच्यासमवेत सशर्त संभव फलाचे महत्तीकरण (maximizing the conditional likelihood function) आणि अवलोकित फिशर माहितीचा वापर (using the observed Fisher information) या विषयांवर कळीचे संशोधन प्रसिद्ध केले.
हिंक्ले हे संगणकीय संख्याशास्त्रातील बूटस्ट्रॅप पद्धत या विषयात जागतिक स्तरावर प्रसिद्ध असे तज्ञ होते. बूटस्ट्रॅप तंत्रात आधारसामग्रीतून छोटे नमुने परत परत घेऊन त्यांचे सांखिकी विश्लेषण केले जाते. त्यासाठी आधारसामग्रीतून हजारो नमुने (resamples) यादृच्छिक पद्धतीने वारंवार काढून त्यांचा मध्य व मध्यक काढले जातात. ते मध्य व मध्यक त्यांच्या नमूनाफल वितरणासाठी चांगले आकलक असतात या वस्तुस्थितीवर बूटस्ट्रॅप पद्धत आधारलेली आहे. संगणकामुळे या पद्धतीला आवश्यक बळ मिळाले. त्यामुळे बूटस्ट्रॅप तंत्राने संगणकशक्तीचा वापर करून समष्टीच्या प्रचालांबाबत अचूक अनुमान करण्यास सहाय्य मिळते. म्हणजेच त्यांचे प्रमाण दोष आकलक (estimated standard error) कमी करण्यास हातभार लागतो. ॲन्थनी डेव्हिसन यांच्यासह हिंक्ले यांनी बूटस्ट्रॅप वर पाठ्यपुस्तक लिहिले असून ते अतिशय लोकप्रिय आहे. या प्रकारे हिंक्ले यांनी गणनीय संख्याशास्त्र (computational statistics) या शाखेतही योगदान केले.
हिंक्ले यांनी अमेरिकेतली मिनिसोटा विद्यापीठ आणि टेक्सास येथील ऑस्टीन विद्यापीठातील उपयोजित संख्याशास्त्र व सैद्धान्तिक संख्याशास्त्र या विभागात तसेच इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून काम केले. मृत्युसमयी ते सांताबार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागात सन्मानीय प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
हिंक्ले यांच्या नावावर ११३शोधनिबंध आहेत. हिंक्ले यांची सहलिखित प्रसिद्ध पुस्तके : Theoretical Statistics,आणि Bootstrap Method and its Applications, या पुस्तकात संगणकाच्या आधाराने खूप प्रकारच्या प्रश्नांमध्ये विश्वसनीय प्रमाणदोष (reliable standard errors), विश्वास अंतराळ (confidence intervals) आणि अनिश्चिततेची इतर मापने (measures of uncertainty) कशी मिळवता येतील यांच्या विविध पध्दती सोदाहरण दिल्या आहेत.
१९८४ मध्ये हिंक्ले यांना संख्याशास्त्रातील अतिशय मानाचे असे कॉप्स अध्यक्षांचे पारितोषिक मिळाले.
संदर्भ :
- www.pstat.ucsb.edu/faculty%20pages/Hinkley.htm
- https://projecteuclid.org/euclid.ss/1063994969
- https://www.amazon.com/D.-V.-Hinkley/e/B00IFDNRR2
समीक्षक : विवेक पाटकर