केरोलिन्स्का इन्स्टिट्यूट : (स्थापना – सन १८१०) केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटची मूळ संस्था कोंग्ल. केरोलिन्स्का मेडिको चिरूगिस्का इन्स्टिट्यूट या नावाने ओळखली जायची. संस्थेचे ब्रीदवाक्य स्वीडिश भाषेत Attförbättramänniskorshälsa असून इंग्रजी भाषांतर To improve human health असे होते. सर्वांसाठी आरोग्य असा या ब्रीदवाक्याचा मराठी अर्थ होतो .
केरोलिन्स्का इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत महत्त्वाच्या वैद्यकीय विद्यापीठापैकी एक आहे. या विद्यापीठाचे ध्येय सजीवाची माहिती मिळवणे आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी सतत प्रयत्न करणे. एक विद्यापीठ म्हणून ही संस्था सर्वांत मोठी वैद्यकीय संशोधन करण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम आणि कार्यक्रम राबवते. केरोलिन्स्का इन्स्टिट्यूट शरीरक्रिया विज्ञान / वैद्यक शाखेतील नोबेल पुरस्काराची निवड करते.
सन १८१० साली किंग कार्ल XIII (तेरावा) यांनी सैन्यासाठी कुशल शल्यतज्ञ तयार करण्याच्या हेतूने केरोलिन्स्का इंस्टिट्यूटची स्थापना केली. आज या संस्थेचे रूपांतर सर्वांत आधुनिक अशा वैद्यकीय विद्यापीठात झालेले आहे. वैद्यकीय उद्योगाबरोबर असलेले संबंध, उत्तम पायाभूत सुविधा आणि स्थिर आर्थिक पाठबळ असल्याने केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण व संशोधन होते.
केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये एका छ्ताखाली अनेक वैद्यकीय शाखेचे विस्तृत शिक्षण मिळण्याची सोय आहे. यातील काही अभ्यासक्रम वैद्यकीय निदान किंवा आरोग्य सेवेबद्दल चालवले जातात. शिक्षणासाठी केरोलिन्स्का इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि जवळ असलेली स्टॉकहोममधील इतर रुग्णालये यांचा मोठा सहभाग आहे. सुमारे सहा हजार विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण एका किंवा अनेक विषयामध्ये घेत असतात. केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील शिक्षक शिकवण्याबरोबरच संशोधनामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना अद्ययावत माहिती एकाच वेळी मिळत राहते. महत्वाकांक्षी विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक एकत्र आले म्हणजे माहिती व कल्पना यांची उत्तम देवाण घेवाण हे येथील वैशिष्ट्ये आहे. थोड्या कालखंडासाठी येथील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाना भेटी देतात.
येथे सध्या ६२९० विद्यार्थी पूर्ण वेळाचे शिक्षण घेत आहेत. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेनंतर व्यावसायिक शिक्षण घेता येते.
केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी जैव औद्योगिकी, जैव औषधी, वैश्विक आरोग्य, आरोग्य अर्थशास्त्र, रेण्वीयतंत्र जैवविज्ञान, पोषण विज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि विषविज्ञान अशा वेगळ्या विषयावरसुद्धा संशोधन तसेच पदवी व पदव्युत्तर पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.
वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही शाखेतील मूलभूत संशोधन, स्वामित्व अधिकार संशोधन व परिचारिकासेवा संशोधन देणारी ही एकमेव संस्था आहे. याशिवाय स्वतंत्र कर्करोग, रुधिरशास्त्र (Haematology), पेशी विज्ञान, रेण्वीय आणि रचनात्मक जीवविज्ञान (structural biology), श्वसन, अभिसरण, मूळ पेशी विज्ञान , जीवविकास शास्त्र (developmental biology), पुनर्जनन औषध विज्ञान, पुनर्निर्मिती औषध विज्ञान (reparative medicine), संप्रेरके आणि चयापचय विज्ञान, संसर्गजन्य आजार, सार्वजनिक आरोग्य, आरोग्य विज्ञान, प्रतिक्षमता विज्ञान, परजीवी संसर्ग, दाह, सूक्ष्मजीव विज्ञान, आणि चेताविज्ञान यांच्या स्वतंत्र संशोधन शाखा येथे आहेत.
संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक ६६७ कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे आठ कोटी अमेरिकन डॉलर आहे. तर संस्थेकडे व्यक्ती व संस्थांनी देणगीतून दिलेल्या देणगीचा जो राखीव निधी आहे तो २०१० साली ५७.६१ कोटी यूरो एवढा होता .
केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटचे एक वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे २००१ सालापासून असलेला नोबेल असेंब्ली नावाचा उपविभाग. नोबेल असेंब्ली फिजिऑलॉजी अँड मेडिसिन हा विभाग शरीरक्रियाविज्ञान आणि वैद्यक शाखेतील नोबेल पुरस्काराची निवड करतो. या उपविभागात केरोलिंन्स्का इन्स्टिट्यूटमधील पन्नास वैद्यकीय विभागातील प्राध्यापकांचा समावेश आहे. इन्स्टिट्यूटचा प्राध्यापकवर्ग या प्राध्यापकांची निवड करतो. ही निवड समिती इन्स्टिट्यूटचा भाग नसून खाजगी संस्थेचा त्यास दर्जा दिलेला आहे. यांचे मुख्य काम निर्देशित केलेल्या संशोधनाची गुणवत्ता ठरवणे. यातील पाच सदस्य आलेल्या नावामधून योग्य संशोधनाची निवड करतात. नोबेल समिती फक्त नावाची शिफारस करते. नोबेल असेम्ब्लीचा निर्णय अखेरचा असतो.
फिजिऑलॉजी किंवा वैद्यक नोबेल पुरस्काराच्या २००१ पासूनच्या इतिहासात केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटचा पूर्ण अध्यापकवर्ग नोबेल पुरस्कार पात्र व्यक्तीच्या निवडीत सहभागी होतो. स्वतंत्र नोबेल असेम्ब्लीची स्थापना करण्यामागे असलेला हेतू म्हणजे केरोलिन्स्का इन्स्टिट्यूट ही शासकीय संस्था आहे. सर्व शासकीय नियम या संस्थेस लागू होतात. स्वीडनमध्ये शासकीय संस्थेला कायद्यानुसार आवश्यक माहिती पुरवावी लागते. त्यामुळे शासकीय संस्थेऐवजी खाजगी संस्थेचा दर्जा मिळाल्याने माहिती गोपनीयता व आलेली लेखी माहिती, सभेचे इतिवृत्त पन्नास वर्षे सुरक्षित ठेवावा लागतो. एखादी व्यक्ती खाजगी संस्थेविरुद्ध व्यवस्थापन समितीकडे तक्रार करण्याची शक्यता त्यामुळे दूर झाली .
आणखी दोन नोबेल पुरस्कार देणार्या स्वीडनमधील संस्था म्हणजे रॉयल स्वीडिश अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि स्वीडिश अॅकॅडेमी या कायदेशीरपणे खाजगी संस्था आहेत (अर्थात त्या स्वीडनच्या राजाश्रयाखाली आहेत). त्यांच्यासाठी नोबेल फाउण्डेशनने पुरस्कृत केलेल्या नियमांनुसार काम करावे लागते
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी