खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यातप्राप्तीत होणाऱ्या बदलांमुळे राष्ट्रीय उत्पन्नात कसा बदल होतो, यासंबंधीचे विश्लेषण विदेशी व्यापार गुणकाच्या मदतीने केले जाते. याला निर्यात गुणक (Export Multiplier) असेही म्हणतात. निर्यातप्राप्तीतील वाढीच्या अनेक पटींनी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते; त्या वाढत्या उत्पन्नामुळे आयातीलाही प्रोत्साहन मिळते. परिणामी, निर्यातीतील वाढ राष्ट्रीय उत्पन्नात भर घालते; तर आयातीतील वाढ राष्ट्रीय उत्पन्नात गळती निर्माण करते. खुल्या अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाची वाटणी खालीलप्रमाणे होते.
सीमांत उपभोग प्रवृत्ती (mpc)+सीमांत बचत प्रवृत्ती (mps)+सीमांत आयात प्रवृत्ती (mpm)= १
येथे mpc = marginal propensity to consume (c)
mps = marginal propensity to save (s)
mpm = marginal propensity to import (m)
विदेशी व्यापार गुणकाची किंमत, गुणकाचा आकार, गुणकाची विशालता समजण्यासाठी विदेशी व्यापार गुणकाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न समतोलाच्या शर्तीपासून सुरुवात करून विदेशी व्यापार गुणकामुळे उत्पन्नात बदल होण्याची प्रक्रिया समजावून घेऊ. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाहानुसार राष्ट्रीय उत्पन्न समतोल शर्त खालीलप्रमाणे आहे.
गळती (Leakages) = भरण (Additions)………………(1)
L= A…………… (1)
उत्पन्नगळतीमध्ये बचत आणि आयात, तर उत्पन्न भरणमध्ये गुंतवणूक आणि निर्यातीचा समावेश होतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाहानुसार, राष्ट्रीय उत्पन्न समतोल शर्त खालीलप्रमाणे आहे.
बचत+आयात (Savings+Imports) = गुंतवणूक+निर्यात (Investment+Exports)……………(2)
S + M = I + X…………… (2)
समीकरण 2 मधील डावी बाजू उजव्या बाजूपेक्षा जास्त असेल, तर राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाहावरील गुंतवणूक आणि निर्यातप्राप्तीतील भरणापेक्षा कुटुंब आणि उत्पादनसंस्थेने केलेली बचत आणि विदेशी वस्तूंची खरेदीपासूनची गळती अधिक आहे. परिणामी उत्पन्नवाढीच्या प्रवाहाचे आकारमान कमी होईल. याविरुद्ध घटनेचा विचार केल्यास समीकरण 2 मधील डावी बाजू उजव्या बाजूपेक्षा कमी असेल, तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल; कारण गुंतवणूक आणि निर्यातप्राप्तीपासूनचे भरण हे बचत आणि आयातीतील गळतीपेक्षा जास्त असेल. आतापर्यंतच्या विश्लेषणावरून असे स्पष्ट होते की, राष्ट्रीय उत्पन्न समतोलापासून सुरुवात केल्यास निर्यात वाढल्यास उत्पन्न वाढते आणि निर्यात कमी झाल्यास उत्पन्न कमी होते. अशा प्रकारे उत्पन्न आणि निर्यात एकाच दिशेने बदलतात. याउलट, आयातीत वाढ झाल्यास उत्पन्न कमी होते, आयात कमी झाल्यास उत्पन्न वाढते. म्हणजे उत्पन्न व आयात आणि उत्पन्न व बचत हे विरुद्ध दिशेने बदलतात, तर उत्पन्न व गुंतवणूक एकाच दिशेने बदलतात. या संबंधातील संख्यात्मक आकार समजणे गरजेचे आहे. उदा., निर्यातीमध्ये ‘क्ष’ दशलक्ष वाढ झाली, तर उत्पन्नात किती वाढ होईल? ते पुढील समीकरणातून स्पष्ट होईल.
आतापर्यंतच्या स्पष्टीकरणानुसार राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाहातील उत्पन्न समतोलाजवळ उत्पन्नातील गळती आणि भरण समान आहेत (समीकरण 1). उत्पन्न चक्राकार प्रवाह आणि प्रस्तुत विदेशी व्यापार प्रतिमानात बचत आणि आयातीचा समावेश गळतीमध्ये होतो, तर भरणमध्ये निर्यात आणि गुंतवणुकीचा समावेश होतो. उदा., गुंतवणूक आणि निर्यात बाह्यजात स्थिर आहेत. कुटुंबाकडून देशातील वस्तू तसेच विदेशातून आयात केलेल्या वस्तूंवर खर्च केला जातो. म्हणून कुटुंबाच्या उत्पन्नातील बदलानुसार कुटुंबाची बचत बदलते. हा संबंध आपणास खालीलप्रमाणे लिहिता येईल.
S = f1 (Y)……….. (3)
M = f2 (Y)……….. (4)
येथे S म्हणजे बचत (Savings) आणि Y म्हणजे उत्पन्न (Income), तर M म्हणजे आयात (Imports). समीकरण 3 चा अर्थ, बचत हे उत्पन्नाचे फलन (f1) आहे. समीकरण 4 चा अर्थ, आयात हे उत्पन्नाचे फलन (f2) आहे.
सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे, आपल्या वाढत्या उत्पन्नापैकी काही भाग बचत करण्याची इच्छा बाळगणे.
सीमांत आयात प्रवृत्ती म्हणजे, आपल्या वाढत्या उत्पन्नापैकी काही भाग आयात वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा बाळगणे.
मनुष्याच्या वर्तनासंबंधी दोन गृहीते मांडली जातात. उत्पन्न वाढल्यानंतर कुटुंबाकडून खर्च करताना जे वर्तन होते, ती गृहीते खालीलप्रमाणे आहेत :
Δ S = s Δ Y………. (5)
Δ M= m Δ Y………. (6)
समीकरण 5 नुसार Δ S म्हणजे, बचतीतील बदल. हा बदलत्या उत्पन्नाच्या (ΔY) काही स्थिर भागाबरोबर ( s अपूर्णांक/भाग) आहे.
समीकरण 6 नुसार, आयातीतील बदल हा उत्पन्नातील बदलाचा (ΔY) काही स्थिरभाग (m अपूर्णांक/भाग) आयात वस्तूंवर खर्च केला जातो.
उत्पन्न चक्राकार प्रवाहात समतोल उत्पन्नस्थितीपासून सुरुवात करताना समीकरण 2 [S + M = I + X………. (2)] ची शर्त पूर्ण होणे आवश्यक असते. गुंतवणूक आणि निर्यातीतील काही स्वायत्त बदलांमुळे ते (I + X) नवीन स्थायी पातळी गाठतात. या बदलामुळे जोपर्यंत गळती (S + M) आणि (I + X) भरण यांमधील बदल समान होणार नाही, तोपर्यंत उत्पन्नात बदल होत राहतात.
ΔS + ΔM = ΔI + ΔX……… (7)
येथे बचतीतील बदल (ΔS) आणि आयातीतील बदल (ΔM) हे गुंतवणुकीतील बदल (ΔI) आणि निर्यातीतील बदल (ΔX) यांच्याबरोबर होतील. यावरून असे लक्षात येते की, आपण समतोल उत्पन्नापासून सुरुवात करून उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातील भरण आकारमानात बदल केल्यास, उत्पन्नात बदल होतो. नव्या उत्पन्नपातळीशी गळती आणि भरण समान होतात.
समीकरण 5 आणि 6 हे समीकरण 7 मध्ये घातल्यास, पुढीलप्रमाणे समीकरण मिळते.
sΔY + mΔY = ΔI + ΔX
वरील समीकरणास कुशलतेने हाताळल्यास, गुणकसंबंध दाखविता येतो.
ΔY (s+m) = ΔI + ΔX
1
ΔX = —— (ΔI + ΔX)………. (8)
S + m
गुंतवणूक अथवा निर्यातीत बदल झाल्यास उत्पन्नात बदल होतो. हा उत्पन्नातील बदल गुंतवणूक अथवा निर्यातीतील बदलाच्या गुणक (k) पटीत बदलेल. k हा गुणक सीमांत बचत (s) प्रवृत्ती आणि सीमांत आयात (m) प्रवृत्तीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. उदा., वाढलेल्या उत्पन्नापैकी, १० टक्के बचत केली आणि १५ टक्के आयात वस्तूंवर खर्च केला, तर सीमांत बचत प्रवृत्ती (mps) म्हणजे s = 0.1 आणि सीमांत आयात प्रवृत्ती (mpm) म्हणजे m = 0.15 राहील. आणि गुणक खालीलप्रमाणे कार्य करतो :
1 1
k = ——— = ——– = 4
0.1 + 0.15 0.25
अशा प्रकारे गुंतवणूक अथवा निर्यातीतील बदलामुळे उत्पन्नात चार पट बदल होईल.
गुणक गळतीरकमेवर ठरतो. गळती ही अशी रक्कम आहे, जी उत्पन्नप्रवाहाच्या बाहेर जाते. उत्पन्नप्रवाहाबाहेर जाणारी रक्कम ही उत्पन्नाशी संबंधित आहे. गळती हे उत्पन्नाचे फलन आहे.
L = f(Y)………… (9)
उत्पन्नातील बदलानुसार (ΔY) त्यातील एक स्थिरभाग/अपूर्णांक (I) उत्पन्नप्रवाहात येत नाही; कारण त्या भागाची बचत होते अथवा त्या भागाचा आयात वस्तूंवर खर्च होतो अथवा इतर कोणत्याही प्रकाराने तो उत्पन्नप्रवाहाबरोबर जातो.
ΔL = IΔY………… (10)
समीकरण 1 नुसार उत्पन्न समतोल परिस्थितीत गळती ही भरणबरोबर असते.
L= A…………… (1)
यावरून असे लक्षात येते की, उत्पन्न समतोलापाशी भरणमधील कोणताही बदल गळतीतील बदलाएवढाच असावा.
ΔL = ΔA…………… (11)
समीकरण 10 समीकरण 1 मध्ये घातल्यास खालील समीकरण मिळते.
∂ ΔY = ΔA
समीकरणाच्या दोनही बाजूंना I ने भागल्यास समीकरण 12 मिळते.
1
ΔY = —— ΔA…………… (12)
∂
समीकरण 12 हा गुणकाचा सर्वसामान्य प्रकार आहे. यावरून असे म्हणता येईल की, गुणक आणि सीमांत गळतीप्रवृत्तीचे प्रमाण व्यस्त असते.
समीक्षक – राजस परजुरे