एका देशाने एका आर्थिक वर्षात इतर देशांशी केलेल्या व्यवहारांचा लेखाजोखा किंवा जमाखर्च म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष होय. यास आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल असेही म्हणतात. एका देशातील नागरिकांनी इतर जगाशी केलेला हा व्यवहार वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा भांडवलाची देवाणघेवाण या स्वरूपात असू शकतो. असा आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार करणारे नागरिक हे व्यक्ती, व्यवसाय किंवा शासकीय संस्था असू शकतात. व्यवहारशेषामध्ये परकीयांकडून प्राप्त झालेली रक्कम ही जमेस धरली जाते, तर परकीयांना दिलेली रक्कम ही खर्चाच्या बाजूला मांडली जाते. हा जमाखर्च मांडल्यानंतर संबंधित देशाचा व्यवहारशेष हा तुटीचा (डिफिसिट) आहे की, आधिक्याचा (सर्प्लस) आहे हे समजते.

आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाची मांडणी ही जमाखर्चाच्या दुहेरी नोंद पद्धतीने केली जाते. म्हणजे, कोणताही एक व्यवहार हा एकाच वेळी जमा व खर्च अशा दोन्ही बाजूंनी मांडला जातो. उदा., देशातून केलेली एखाद्या वस्तूची निर्यात मांडायची झाली, तर विक्री केलेल्या वस्तू या जमेच्या बाजूला, तर मिळालेले परकीय चलन किंवा उत्पन्न हे खर्चाच्या बाजूला मांडले जाते.

वस्तूंची निर्यात, वाहतूक व प्रवासातून मिळालेले उत्पन्न, परदेशात गुंतवलेल्या भांडवलातून मिळालेले उत्पन्न, देशस्थ परकीयांकडून मिळालेल्या भेटी, परकीय सरकारांकडून मिळालेली अनुदाने, परदेशी नागरिकांकडून देशात केली गेलेली गुंतवणूक इत्यादी गोष्टी जमेस धरल्या जातात; तर वस्तूंची आयात, वाहतूक व प्रवासावर झालेला खर्च, परकीयांनी गुंतवलेल्या भांडवलावर दिले जाणारे व्याज किंवा नफा, परकीय नागरिकांना दिलेल्या भेटी, इतर देशांना दिलेली अनुदाने आणि देशाच्या नागरिकांनी देशाबाहेर केलेली गुंतवणूक या गोष्टी खर्चाच्या बाजूला मांडल्या जातात.

आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाची मांडणी ही जमाखर्चाच्या दुहेरी नोंद पद्धतीने होत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष हा नेहमीच समतोलात दिसतो. प्रत्यक्षात होणाऱ्या व्यवहारांवर व्यवहारशेषाची तूट किंवा आधिक्य ठरत असते. आयातदार आणि निर्यातदार यांच्यात वस्तू व सेवा यांचा व्यापार होत असला, तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील वित्तीय व्यवहार मात्र बँकांमार्फत पूर्ण होत असतो.

रचना : आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाची विभागणी चालू खाते आणि भांडवली व वित्तीय खाते या दोन खात्यांत केली जाते.

चालू खाते (करंट अकाउंट) : देशाचा वस्तू व सेवांमधील व्यापार, उत्पन्न प्रवाह आणि एकतर्फी हस्तांतरण या सर्वांचे पैशांतील मूल्य चालू खात्यावर मांडले जाते. देशातील वस्तू या व्यापाराचा तोल (बॅलन्स ऑफ ट्रेड) होय. देशातून होणारी वस्तूंची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असेल, तर व्यापारतोल धन म्हणजे आधिक्याचा असतो. याउलट, देशात होणारी वस्तूंची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असेल, तर व्यापारतोल ऋण म्हणजेच तुटीचा असतो.

अदृश्य खाते (इनव्हिजिबल अकाउंट) : चालू खात्यावरील इतर व्यवहार हे अदृश्य खात्यावर मांडले जातात. यामध्ये सेवांची आयात व निर्यात समाविष्ट असते. सेवा व्यापाराचे आधिक्य म्हणजेच सेवा निर्यात, ही सेवा आयातीपेक्षा अधिक असणे आणि सेवा व्यापाराची तूट म्हणजेच सेवा आयात, ही सेवा निर्यातीपेक्षा अधिक असणे होय. एकूण वस्तू व सेवांची निर्यात ही आयातीपेक्षा अधिक असेल, तर ती रक्कम देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) मिळविली किंवा जोडली जाते. याउलट, एकूण वस्तू व सेवांची निर्यात ही आयातीपेक्षा कमी असेल, तर ती रक्कम देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातून वजा केली जाते.

एखाद्या देशातून परदेशात केल्या गेलेल्या गुंतवणुकीवर मिळालेले उत्पन्न वजा परदेशी संपत्तीसाधनांवर (असेट्स) देशात देण्यात आलेला मोबदला यातून मिळणारी निव्वळ रक्कम हीसुद्धा अदृश्य खात्यावर जमेस मांडली जाते. कर्मचाऱ्यांना दिला जाणारा निव्वळ मोबदलाही अदृश्य खात्यावर मांडला जातो. अदृश्य खात्यावर मांडल्या जाणाऱ्या एकतर्फी हस्तांतरणामध्ये वस्तू व पैशांच्या स्वरूपात होणाऱ्या निव्वळ देवाणघेवाणीचा समावेश होतो. तसेच खाजगी स्तरावर दिली जाणारी देयके आणि सरकारी पातळीवर होणारे एकतर्फी हस्तांतरण यांचाही अंतर्भाव होतो. व्यापारतोल आणि अदृश्य खात्यावरील तोल यांतून चालू खात्यावरील तूट किंवा आधिक्य मांडता येते.

भांडवली आणि वित्तीय खाते (कॅपिटल अँड फायनॅन्शीअल अकाउंट) : देशाचे सर्व आंतरराष्ट्रीय भांडवली आणि वित्तीय व्यवहार या खात्यावर मांडले जातात. संपत्तीसाधनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, खाजगी तसेच अधिकृत भांडवली आणि वित्तीय व्यवहार हे या खात्यावर समाविष्ट होतात.

खाजगी क्षेत्र व्यवहार : खाजगी क्षेत्राच्या व्यवहारांमध्ये भांडवलाची थेट गुंतवणूक, रोखे व्यवहार आणि बँकांचे दावे व दायित्वे यांचा समावेश होतो.

अधिकृत व्यवहार : संपत्तीसाधनांची अधिकृत पातळीवरील देवाणघेवाण, परकीय चलनातील अधिकृत साठा, इतर देशांची अधिकृत पातळीवरील दायित्वे ही अधिकृत भांडवली आणि वित्तीय व्यवहार म्हणून मांडली जातात.

त्रुटी व चुका (एरर अँड ओमिशन्स) : सांख्यिकीय पातळीवरील त्रुटी आणि चुका नोंदविणे आवश्यक असते. त्यामुळे जमाखर्च हा वास्तव पद्धतीने मांडला जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाची मांडणी ही जमाखर्चाच्या दुहेरी नोंद पद्धतीने केली जाते. म्हणजे, देशाची एकूण जमा ही एकूण खर्चाइतकी असावी लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाचे चालू खाते जर तूट दर्शवत असेल, तर भांडवली आणि वित्तीय व्यवहार खात्यावर आधिक्य दाखवावे लागते. याउलट, आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाचे चालू खाते जर आधिक्य दर्शवत असेल, तर भांडवली आणि वित्तीय व्यवहार खात्यावर तूट दाखवावी लागते. निव्वळ परकीय गुंतवणूक किंवा निव्वळ कर्ज यांनी ही तूट प्रत्यक्षात भरून काढली जाते.

आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष आणि राष्ट्रीय उत्पन्न यांतील परस्परसंबंध : एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा लेखाजोखा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष यांच्यातील परस्परसंबंध खालील प्रमाणे दाखवता येतो.

C = खाजगी उपभोग खर्च

G = सरकारी उपभोग खर्च

I = स्थूल देशांतर्गत गुंतवणूक

S = स्थूल बचत

X = वस्तू व सेवांची निर्यात

M = वस्तू व सेवांची आयात

NY = परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न

GDP = स्थूल देशांतर्गत उत्पादन

GNDY = स्थूल राष्ट्रीय खर्चयोग्य उत्पन्न

CAB = आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाच्या चालू खात्यावरील शिल्लक

NCT = निव्वळ चालू हस्तांतरण

NKT = निव्वळ भांडवली हस्तांतरण

NPNFA = अनुत्पादित, वित्तीयेतर संपत्तीसाधनांची निव्वळ खरेदी

NFI = निव्वळ परकीय गुंतवणूक किंवा निव्वळ कर्ज

या पार्श्वभूमीवर, GDP = C + G + I + X–M

याठिकाणी X–M = आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषातील वस्तू व सेवांच्या आयात-निर्यातीची शिल्लक, तर CAB = X – M + NY+NCT आणि GNDY = C + G + I + CAB. म्हणजेच GNDY – C – G = S; कारण S = I + CAB किंवा S – I = CAB. त्यामुळे S – I + NKT – NPNNA = CAB + NKT –NPNNA = NFI (याठिकाणी NKT – NPNNA = आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषातील भांडवली खात्याची शिल्लक).

आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषातील असमतोल दूर करण्याचे उपाय : मौद्रिक उपाय आणि मौद्रिकेतर उपाय हे आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषातील असमतोल दूर करण्याचे दोन उपाय आहेत.

(१) मौद्रिक उपाय :
(अ) चलनसंकोच : किमतीतील घट म्हणजे चलनसंकोच. बँकदर बदल, रोख्यांची खरेदीविक्री यांसारख्या मौद्रिक उपायांचा किंवा करवाढ, सार्वजनिक खर्चात घट अशा राजकोषीय उपायांचा वापर करून किमती कमी केल्या जातात. त्यामुळे देशीय वस्तू स्वस्तात उपलब्ध होऊन त्यांचा निर्यात वाढीसाठी फायदा होतो; तसेच परदेशातून होणारी आयातही कमी होते; मात्र यादरम्यान परकीय चलनाचा विनिमय दर बदलता कामा नये.
(ब) विनिमय दर अवमूल्यन : परकीय चलनाच्या तुलनेत देशी चलनाच्या मूल्यात घट होणे म्हणजे अवमूल्यन. त्यामुळे निर्यातीत वाढ होते, तर आयातीत घट होते; मात्र या दरम्यान वस्तूंच्या किमती स्थिर राहिल्या पाहिजे. विनिमय दराचे हे अवमूल्यन एकतर बाजारपेठीय पातळीवर होते किंवा धोरण म्हणूनही एखादा देश जाहीर करू करतो.
(क) परकीय चलन नियंत्रण : परदेशांशी होणाऱ्या व्यापारात वापरल्या जाणाऱ्या किंवा कमाविल्या जाणाऱ्या परकीय चलनावर प्रत्यक्ष अंकुश ठेवूनही आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र ही उपाययोजना अतिशय अल्पजीवी असून ती कायमस्वरूपी वापरता येऊ शकत नाही.
(२) मौद्रिकेतर उपाय :
(अ) आयातकर : आयातीवर लादलेल्या करांमुळे त्यांच्या किमती वाढतात. याचा परिणाम म्हणून आयातीसाठी असणारी मागणी घटते आणि आयातीला पर्यायी वस्तू उत्पादित करण्याकडे कल वाढतो.
(ब) कोटा : एखाद्या कालावधीत देशात एखाद्या वस्तूची किती प्रमाणात आयात व्हावी यावर सरकार नियंत्रण ठेवते, त्याला कोटा म्हणतात. त्याचा आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष सुधारण्यासाठी फायदा होतो.
(क) निर्यात प्रोत्साहन : निर्यातदारांना विविध स्वरूपाची प्रोत्साहने देऊन, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने किंवा मेळे यांतील त्यांचा सहभाग वाढवून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला जातो; ज्यायोगे आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल सुधारला जाईल.
(ड) आयात पर्याय : स्वयंपूर्णता साध्य करण्याच्या दृष्टीने आयातीला पर्यायी वस्तू उत्पादित करण्यासाठी एखादा देश विशेष प्रयत्न करतो आणि त्यातून आयातीवर नियंत्रण ठेवता येते.
आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषाचे महत्त्व : कोणत्याही देशाचा आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष हा त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा आणि संबंधांचा आरसा असतो. त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापनाचा तो महत्त्वाचा हिस्सा असतो. आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष देशाच्या चलनासाठी असणारी मागणी आणि पुरवठा यांची माहिती देतो. तसेच भविष्यात त्या देशाचा व्यापार व इतर व्यवहारांमधील भागीदार कोण असू शकेल याचीही दिशा दर्शवतो. मौद्रिक आणि राजकोषीय धोरणांचे निर्णय घेतानाही आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष आणि त्यातील घटकांचा विचार सरकारला करावा लागतो. एखाद्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष जर तुटीचा असेल, तर त्या देशाला परकीय मदत किंवा कर्ज यासाठी किती प्रमाणात इतरांवर अवलंबून राहावे लागणार आहे, याचाही अंदाज येतो.

संदर्भ : Salvatore, Dominick, International Economics, U. S., 2013.

समीक्षक : विनायक देशपांडे