‘जगाच्या अंतापर्यंत जा आणि संपूर्ण सृष्टीला माझा संदेश द्या’ (बायबल, मार्क १६:१५) येशू ख्रिस्ताने दिलेली ही आज्ञा त्याच्या बारा प्रेषितांनी शिरसावंद्य मानली. त्याचे दोन प्रेषित–थॉमस व बार्थोलोमिओ (बार्थोलोम्यू)–हे भारताकडे निघाले. हे सारे घडले २००० वर्षांपूर्वी. प्रेषित बार्थोलोमिओ हा भारताच्या दिशेने येत असताना वाटेत अरेबिया, अफगाणिस्तान, बलुचिस्तान हे देश पायाखाली तुडवत तुडवत तो खैबर खिंडीतून पंजाबात उतरला. इ. स. ६७ साली तो उत्तर कोकणातील कल्याण बंदरात उतरला व आपले प्रेषितीय कार्य त्याने तेथे सुरू केले.

त्या काळी कल्याण व सोपारा (शूर्पारक) ही पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरे होती. त्या दोन्ही बंदरांवर यहुदी व्यापाऱ्यांच्या वसाहती होत्या. बार्थोलोमिओ हा स्वत: यहुदी होता म्हणून या भूमीमध्ये वास्तव्य करणाऱ्या एकेकाळच्या त्याच्याच वंशकुळातील बांधवांना व इतर स्थानिकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा द्यायला त्याने सुरुवात केली. त्याने बाप्तिस्मा दिल्यामुळे ख्रिस्ती धर्मीयांचा जो समूह निर्माण झाला, त्याला ‘कल्याणी ख्रिस्ती समाज’ असे नामाभिधान मिळाले.

येशूचा दुसरा प्रेषित थॉमस हा इ. स. ५२ मध्ये दक्षिणेकडे मलबार किनारपट्टीवर मुझेरी या बंदरात आला. त्या बंदरात अगोदरपासूनच यहुदी लोकांचे वास्तव्य होते. त्यांच्या तिथल्या वसाहतींमुळे तो तिथे आकर्षित झाला होता. ‘ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, तेथील सश्रद्ध रहिवासी निवडा व त्याच्या घरी तुम्ही आश्रय घ्या’ (बायबल, मत्तय १०:११); ‘जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या संगतीस आहे’ येशूने दिलेल्या ह्या ठाम आश्वासनाची शिदोरी पाठीशी घेऊन केरळ व तमिळनाडू विभागाकडे थॉमस आला होता. भारतात त्याने क्रॅंगनूर (कोंडागलूर), पलायूर, क्विलॉन, कोरोमंडल व मलबार आदी भागांत ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. येशू मेलेल्यातून उठला, तेव्हा त्याने प्रेषितांना दर्शन दिले. थॉमस स्वत: तिथे हजर नसल्यामुळे त्याने या घटनेविषयी संशय व्यक्त केला होता म्हणून त्याला ‘संशयग्रस्त थॉमस’ (Doubting Thomas) ही काहीशी उपरोधिक उपाधी मिळाली असली, तरी त्याने दक्षिण भारतात येशूची श्रद्धा पसरविण्यात उल्लेखनीय यश मिळविले.

मद्रास (चेन्नई) शहराजवळ ‘लिटल माऊंट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका टेकडीवर स्थानिक रहिवाशांनी थॉमसच्या पाठीत तीक्ष्ण भाल्यांनी भोसकून त्याला ठार केले. त्या टेकाडावरून त्याचे प्रेत मैलापूर या लोकवस्तीच्या भागात आणण्यात आले व तेथे त्याचा दफनविधी उरकण्यात आला. इ. स. पाचव्या शतकात रोमन सम्राट अलेक्झांडर याच्या आज्ञेवरून या प्रेषिताच्या शरीराचे अवशेष मैलापूर येथील त्या कबरीतून पर्शियातील एडिसा येथे हलविण्यात आले. ते अवशेष आजतागायत तेथे चांदीच्या शवपेटीत ठेवण्यात आले आहेत. या संताप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी मैलापूर येथील ‘सानथॉमे’ या महामंदिरास लक्षावधी यात्रेकरू भेट देतात व संत थॉमस ह्याच्या (रिक्त) थडग्याचे दर्शन घेतात. प्रतिवर्षी ३ जुलै रोजी या प्रेषिताची पुण्यतिथी जगभर साजरी केली जाते. इसवी सन १९७२ मध्ये त्याच्या १९ व्या पुण्य शताब्दीवर्षाच्या निमित्ताने भारत सरकारने एक खास टपाल तिकीट प्रकाशित करून त्याच्या कार्याचा सन्मान केला. ख्रिस्ती भाविक थॉमस याला ‘भारताचा प्रेषित’ या प्रशंसनीय नावाने संबोधतात.

कॉन्स्टॅंटिनोपलजवळ असलेल्या नायसिया या नगरीत तत्कालिन ३१४ ख्रिस्ती बिशपांची आंतरराष्ट्रीय स्वरूपाची धर्मपरिषद २० मे ३२५ रोजी भरली होती. दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या त्या परिषदेमध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत ‘कल्याणी ख्रिस्ती समाजा’चा–म्हणजे उत्तर कोकणातील ख्रिस्ती समाजसमूहाचा–उल्लेख केला गेला आहे. याच ‘कल्याण विभागा’ला प्राचीन इतिहासकार ‘इंडिया फेलिक्स’ या नावाने संबोधित आले आहेत.

दोन हजार वर्षांपूर्वी केवळ प्रेषित काळातच नव्हे, तर प्रेषितोत्तर काळातही या विभागात ख्रिस्ती धर्माचे अनुयायी होते. आफ्रिकेच्या उत्तर टोकाशी असलेल्या अलेक्झांड्रिया येथे स्थापन झालेल्या ‘ईश परिज्ञान विद्यापीठा’च्या प्रमुखपदी असलेले धर्मपंडित पांतेनस हे इ. स. १८०–९० या दरम्यान कल्याण येथे आले असताना येशूचा सुवार्तिक संत मत्तय याची अरेमाईक लिपीत लिहिलेली येशूच्या ‘शुभवर्तमाना’ची एक प्रत येथील ख्रिस्ती समाज वापरत असल्याचे त्यांना आढळून आले.

इ. स. ५२० ते ५२५ या दरम्यान कॉस्मस नावाचा एक ईजिप्शियन प्रवाशी भारताला अनेकदा भेटी देऊन गेला. सोपारा व कल्याण येथे दखल घेण्यासारख्या ख्रिस्ती लोकांच्या वसाहती असल्याची नोंद त्याने आपल्या प्रवासवर्णनांत केली आहे. इतकेच नव्हे, तर कल्याण येथे एका बिशपचे वास्तव्य होते, असेही त्याने नमूद केले आहे. यावरून या विभागात बिशपांची नियुक्ती होण्याइतपत ख्रिस्ती लोकांची साजेशी संख्या होती, असे अनुमान निघते.

इ. स. १३२० या वर्षी काही धर्मप्रचारक यूरोपमधून चीनकडे निघाले असता त्यांच्या जलप्रवासात व्यत्यय येऊन त्यांना ठाणे येथे उतरणे भाग पडले. ठाणे येथे ज्या कुटुंबात त्यांनी आसरा घेतला होता, त्या घरात काही कौटुंबिक धुसफूस निर्माण झाली. साक्षीदार म्हणून इटलीमधील तोलेंटिनो गावचे फा. थॉमस, पादुआ गावचे फा. जिआकॉमो ऊर्फ जेम्स, सिओना गावचे ब्रदर पीटर व पर्शिया येथील टिप्लिस गावचे ब्रदर डिमॅट्रिअस या चार इटालियन व्रतस्थांना मुसलमान काझीपुढे हजर करण्यात आले. साक्षीस समोर आलेले परदेशी नागरिक हे ख्रिस्ती मिशनरी आहेत हे काझीच्या लक्षात आले व त्यांपैकी एकाच्या तोंडून मुसलमान धर्माविषयी जे अपमानकारक वक्तव्य बाहेर पडले, त्याचा आधार घेऊन त्या चौघांना ठाणे मुक्कामी कंठस्नान घालण्यात आले. दरम्यान, जॉर्देनस नावाचा त्यांचाच फ्रेंच सहप्रवासी धर्मगुरू–जो पुढे सोपाऱ्यापर्यंत गेला होता–त्याच्या कानांवर ही दु:खद बातमी येताच त्याने त्यांची प्रेते त्वरित ठाणे येथून सोपारा येथील चर्चमध्ये नेऊन त्यांचे दफन केले. ज्या अर्थी सोपारा येथील चर्चच्या दफनभूमीत त्या धर्मप्रचारकांना पुरण्यात आले, त्या अर्थी पोर्तुगीज या किनाऱ्यावर येण्यापूर्वी वसई परिसरात ख्रिस्ती लोकांचा वावर होता, असे दिसून येते. पुढे १९ ऑगस्ट १३२९ रोजी फा. जॉर्देनस यांची केरळमधील क्विलॉन येथे लॅटिन भाषेचे पहिले बिशप म्हणून नेमणूकही झाली.

चौदाव्या शतकाच्या अखेरीस यूरोपियन राष्ट्रांनी मसाल्याच्या पदार्थांसाठी भारतात येण्याचा जलमार्ग शोधून काढल्यामुळे यूरोपियन राष्ट्रांची वर्दळ भारतात सुरू झाली. त्यांपैकी पोर्तुगीजांनी मिशनरी लोकांच्या तुकड्या भारताकडे पाठविण्यासही सुरुवात केली. या पोर्तुगीज प्रवाशांनी इ. स. १५१० मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून जो गोवा प्रांत काबीज केला होता, त्या गोव्यात ख्रिस्ती धर्मप्रसाराची कार्यवाही मोठ्या जोमाने सुरू झाली व त्यातून पुढे भारताच्या किनारपट्टीवर ख्रिस्ती धर्माची एक लाट येऊन थडकली. गोव्याच्या उत्तरेस चौल-रेवदंडा येथे इ. स. १५२१ या वर्षी एक भक्कम भुईकोट त्यांनी बांधला व तेथे पुढे वेगवेगळ्या संघांची आठ ख्रिस्तमंदिरे उभारली गेली.

त्याच्याही उत्तरेस वसई येथे २० जानेवारी १५३३ रोजी नू द कून्या ह्या पोर्तुगीज सरसेनापतीने वसईचा तत्कालिन सुभेदार मलिक तोकन याच्याकडून नव्याने बांधलेली तेथील मुस्लिम धाटणीची गढी ताब्यात घेतली व पोर्तुगीज धाटणीचा जंजिरा किल्ला उल्हास नदीच्या मुखावर वसलेल्या व्यापारी बंदरावर उभा केला. वसई नगरीचा कब्जा मिळताच वसईच्या उत्तरेकडील नगरीत व पलीकडे दमण विभागात मिशनरी धर्मगुरूंची कार्यालये उघडली गेली. त्या केंद्रांतून वेगवेगळ्या संघांचे धर्मगुरू धर्मप्रचार करीत राहिले व स्थानिक लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देत गेले़ त्यांतून एका दृष्यमान ख्रिस्ती समाजाची निर्मिती झाली. दिल्लीचा मुघल बादशहा हुमायून याच्याशी दोन हात करण्यात गुजरातच्या बहादूर शहाला साहाय्य केल्यामुळे त्याने पोर्तुगीजांना जी ठाणी आंदण म्हणून बहाल केली, ती पोर्तुगीजांना भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपला पाय खंबीरपणे रोवण्यास साहाय्यभूत ठरली.

वैश्विक ख्रिस्ती धर्मपरंपरेला जितकी शतके झाली, तितकीच शतके भारतीय ख्रिस्ती परंपरेला झाली आहेत.

संदर्भ :

  • Baptista, Elsie, The East Indians, Mumbai, 1967.
  • George V. C. Apostolate & Martydrom of St. Thomas, California, 1969.
  • Mundadan, A. M. The History of Christanity in India Vol. I, Cambridge, 1982.
  • Thekkedath, Joseph, The History of Christanity in India Vol. II, Cambridge, 1984.
  • कोरिया, फादर फ्रान्सिस, सामवेदी ख्रिस्ती समाज, मुंबई, १९९८.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो