एक आसनप्रकार. व्याघ्र म्हणजेच वाघ. वाघाने शरीराला ताण दिल्यावर जशी शरीराची स्थिती दिसते तशीच या आसनातही दिसते, म्हणून या आसनाला व्याघ्रासन असे म्हणतात.

व्याघ्रासन

कृती : प्रथम जमिनीवरील आसनावर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून बसावे. दोन्ही हात मागच्या बाजूला ठेवून हाताची बोटे बाहेरील बाजूस ठेवून मान शिथिल सोडावी. त्यानंतर श्वासाची गती नैसर्गिक ठेवून सर्वप्रथम मार्जरी आसनात यावे. थोडक्यात दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर व त्याचबरोबर दोन्ही पायांचे गुडघे जमिनीवर असतील. म्हणजेच दोन हात व दोन गुडघे यांवर पाठ जमिनीला समांतर ठेवून स्थिर बसावे. नंतर सावकाश उजवा पाय गुडघ्यात सरळ करत जमिनीवरून वरील बाजूस सरळ करावा, त्याबरोबर मानही वरच्या बाजूला करावी. यानंतर पाय गुडघ्यात दुमडून खाली डोक्याच्या दिशेने आणावा, सोबतच डोकेही खाली वाकवावे आणि प्रयत्न करावा की उजव्या पायाचा गुडघा हा डोक्याला स्पर्श करेल. पुन्हा तसेच पायाला मागे आणि मानेला वरच्या दिशेने न्यावे. तीन ते चार आवर्तने उजव्या पायाने झाल्यावर हीच कृती डाव्या पायाने करावी. हे आसन करत असताना श्वास नैसर्गिक असावा. नंतर आपोआपच पाय व डोके खाली येताना श्वास सोडला जातो. आपल्या क्षमतेनुसार आसनाचा अभ्यास करावा.

दोन्ही पायांची समान आवर्तने करून झाल्यावर पुन्हा दोन्ही गुडघे व दोन्ही हातांवर मार्जरी आसनात यावे. सावकाश दोन्ही पाय मागील बाजूस एकमेकांवर ठेवून बसू शकतो किंवा वज्रासनातून खाली बसून दोन्ही पाय पुढे अंतर ठेवत शिथिल सोडावेत. दोन्ही हात मागील बाजूस ठेवत मान शिथिल सोडवी.

लाभ : या आसनाने पायाच्या नसा, मांडीच्या शिरांना आराम मिळतो. पाठीचा कणा लवचिक बनतो. पचनसंस्था आणि श्वसनसंस्था यांना चालना मिळते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित विकार बरे होण्यास मदत मिळते. पायाचा आणि मानेचा सतत समन्वय साधावा लागतो, त्यामुळे चेतास्नायूंचा समन्वय साधला जातो. या आसनामुळे एकाग्रता व शांतता लाभते.

पूर्वाभ्यास : मार्जारासन या आसनाचा सराव करावा.

विविध प्रकार : पाठीवर झोपून एक पाय मानेवर घेणे, ही पद्धत सिंहासनासारखी आहे. यात दोन्ही पाऊले घोट्यात एकमेकांवर ठेवून टाचांवर बसावे. दोन्ही हातांच्या बोटांना ताण देत गुडघ्याच्या बाजूला जमिनीवर ठेवावीत. थोडेसे पुढे झुकत तोंड उघडून जीभ बाहेरील बाजूस ढकलावी व डोळे मोठे करावे. नैसर्गिक श्वास नाकाने घ्यावा.

विधिनिषेध : मानेचा तसेच मणक्याचा त्रास असल्यास त्याचप्रमाणे संधिवात, गुडघेदुखी, खांदेदुखी असल्यास हे आसन टाळावे. तसेच ज्यांना मान वर-खाली केल्याने भोवळ येते, त्यांनी हे आसन टाळावे. शक्यतो योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या आसनाचा अभ्यास करावा.

संदर्भ :

  • Gharote M. L. (Ed.), Encyclopedia of Traditional Asanas, The Lonavla Yoga Institute, Lonavla, 2006.
  • Gharote M. L, Devnath Parimal, Jha Vijay Kant(Ed.), Hatharatnavali, The Lonavla Yoga Institute, Lonavla, 2014.

समीक्षक : विनोद जोशी