योगासनाचा एक प्रकार. गोमुख याचा अर्थ गाईचे तोंड. या आसनात साधकाच्या पायांची रचना गाईच्या मुखासारखी, तर पाऊले तिच्या कानांसारखी भासतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात. हठयोगाच्या ग्रंथांमधे या आसनाचे वर्णन आले असले तरी लाभ मात्र सांगितलेले नाहीत. हे आसन संवर्धनात्मक आसनांमध्ये मोडते.

गोमुखासन

कृती :  प्रथम जमिनीवरील मऊ आसनावर दोन्ही पाय सरळ व समोर ठेवून दंडासनात बसावे. उजवा पाय डाव्या मांडीखालून घेऊन टाच डाव्या नितंबास लावून ठेवावी. डावा पाय उजव्या गुडघ्यावरून उजवीकडे नेऊन डावी टाच उजव्या नितंबास खेटून ठेवावी. हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवून गुडघे एकमेकांवर येतील असे ठेवावेत अथवा प्रचलित पद्धतीनुसार डावा हात वर करून पाठीमागे न्यावा. उजवा हात उजव्या बाजूने वळवून पाठीमागे न्यावा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावीत. डावे कोपर मस्तकाच्या मागे ठेवावे. ताठ बसूनसमोर बघावे व डोळे बंद करावेत. श्वास कोंडून ठेवू नये. स्थिर व शांत बसावे. श्वासाकडे साक्षीवृत्तीने पाहावे. हे आसन अर्धा ते एक मिनिट करावे. क्षमतेनुसार व आवश्यकतेनुसार आसनाचा कालावधी वाढवावा. आसनातून बाहेर येताना आधी हात व नंतर पाय पूर्वस्थितीत आणावेत व दंडासनात बसावे. यानंतर डावा पाय खाली व उजवा पाय वर अशी पायांची रचना करावी. गुडघे एकमेकांवर येऊ द्यावेत. उजवा हात वर व डावा हात मागे ठेवावा. बोटे एकमेकांत गुंफावीत किंवा दोन्ही तळहात त्या त्या बाजूच्या पायांच्या तळव्यांवर ठेवून खांदे थोडेसे वर उचलावेत.

लाभ : या आसनाचे पाठीच्या कण्याचा वरचा भाग, फुप्फुसे, कटिप्रदेश व गुडघे यांवर चांगले परिणाम होतात. या आसनामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. मानेच्या मणक्यांचा त्रास व पाठदुखी असल्यास हे आसन उपयोगी ठरते. कुबड असल्यास किंवा येऊ नये म्हणून हे आसन व भुजंगासन लाभकारक ठरते. या आसनामुळे छातीच्या वरचा भाग, मान, खांदे यांच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो. आळस दूर होतो. मनोदौर्बल्य व मरगळ दूर होते. मनाची शांती व एकाग्रता वाढते.

विधिनिषेध : या आसनात एक हात पूर्णत: पिरगळला जातो. खांद्यांची लवचिकता किती आहे याचा अंदाज करूनच हे आसन करावे. साधारणपणे एका बाजूस दोन्ही हात पाठीमागे एकमेकांस लागतात, तर दुसऱ्या बाजूस लागत नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी दोन्ही हात पाठीमागे एकमेकांस लागले पाहिजेत असा दुराग्रह नसावा. कालांतराने हे आसन योग्यरित्या करता येईल. ओढाताण वा जबरदस्ती केल्यास खांद्याला दुखापत होण्याचा संभव असतो. अंतिम स्थितीत पाठीचा कणा ताठ ठेवावा. तरच या आसनाचे लाभ प्राप्त होतील. या आसनात श्वसनाची क्रिया उदराऐवजी छातीपर्यंतच होते. साधकाने हे आसन सहजतेने व सुखद होईल याची काळजी घ्यावी.

समीक्षक : साबिर शेख