खोराना, हरगोबिंद :  (९ जानेवारी, १९२२ – ९ नोव्हेंबर २०११) हरगोबिंद खोराना यांचा जन्म ब्रिटिश भारतात मुलतान-पंजाबमधील रायपूर (सध्या पाकिस्तान) झाला. झाडाखाली भरणाऱ्या शाळेत त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते मुलतानमधील दयानंद आर्य समाज माध्यमिक शाळेत (सध्याची मुस्लिम माध्यमिक शाळा) गेले. त्यानंतर शिष्यवृत्त्यांच्या आधारे त्यांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

पदव्युत्तर शिक्षणानंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडच्या लिव्हरपूल युनिव्हर्सिटीत सेंद्रिय रसायनशास्त्रातील पीएच्. डी. च्या अभ्यासासाठी गेले. तेथे त्यांना रॉजर बीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्. डी. मिळाली. त्यानंतर एक वर्ष ते स्वित्झर्लंड येथील झुरिकच्या इटीएच संस्थेत व्लादिमिर प्रेलॉग यांच्यासोबत क्षारीय रसायनशास्त्र या विषयावर काम करत होते.

नंतर ते थोड्या काळासाठी भारतात परत आले परंतु मनासारखे काम न मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडमधील केंब्रिजला ते परत गेले. तेथे त्यांनी जॉर्ज केन्नर आणि अलेक्झांडर टॉड यांच्यासोबत पेप्टाईड आणि न्यूक्लियोटाइड यावर दोन वर्षे काम केले.

त्यांनी १९५२ मध्ये ब्रिटिश कोलंबियातील व्हॅन्कुव्हर येथे मुक्काम हलविला. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ब्रिटिश कोलंबिया रिसर्च कौन्सिलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. स्वतःची प्रयोगशाळा सुरू करण्याच्या कल्पनेने ते खूप उत्साहित झाले होते. या ठिकाणी फारशा  सोयी नसल्या तरी त्यांना कामामध्ये पूर्ण स्वातंत्र्य होते. येथे त्यांनी केंद्रकाम्ले आणि अनेक महत्त्वाच्या जैवरेणूंचे संश्लेषणावर संशोधन केले.

खोराना यांनी १९६० मध्ये विस्कॉन्सिन, मॅडिसन येथील इन्स्टिट्यूट फॉर एन्झाइम रिसर्च केंद्राच्या सह-संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. नंतर ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्यांच्या या पदाला कॉनरॅड ए एल्वेजेम जीवनविज्ञानाचे प्राध्यापक असे नाव देण्यात आले. या ठिकाणी त्यांनी आरएनए आणि प्रथिनांच्या संश्लेषण यंत्रणेचा अभ्यास केला. याच कामाबद्दल त्यांना १९६८ साली विभागून नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या कामामधील त्यांचा सहभाग म्हणजे त्यांनी विकरांच्या मदतीने आरएनए साखळ्या तयार केल्या. या बनवलेल्या आरएनएच्या सहाय्याने बहुपेप्टायडे संश्लेषित केली. बहुपेप्टायडातील अमिनो आम्ल क्रमाच्या अभ्यासामुळे अनेक कोडी सुटली.

खोराना १९७० च्या सुरुवातीला मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे आल्फ्रेड स्लोन प्राध्यापक झाले. नंतर स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक राज्यपाल मंडळाचे सदस्य बनले. २००७ मध्ये ते मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून  निवृत्त झाले.

आरएनएमध्ये दोन घटक पुन्हा पुन्हा येऊन [UCUCUCU…….- CUC, UCU, CUC] परत परत येणारी दोन अमिनो ॲसिड तयार होतात. ह्या शोधासोबत नीरेनबर्गच्या प्रयोगातून असे सिद्ध झाले की, CUC ल्युसीन अमिनो ॲसिडचा संकेत आहे आणि UCU सेरीन अमिनो ॲसिडचा. तीन युनिट्सचे पुनरावर्तन असणाऱ्या आरएनएपासून तीन अमिनो ॲसिडची मालिका बनते. [UACUACUAC ….. – UACUAC किंवा ACUACU किंवा CUACUA] UAG, UAA किंवा UGA सहित चार पुनरावर्तित युनिट्स असणारे आरएनए फक्त डायपेप्टाईड आणि ट्रायपेप्टाईडच तयार करतात. यावरून हे लक्षात आले की UAG, UAA आणि UGA हे प्रथिन संश्लेषण थांबवण्याचे संकेत आहेत. (STOP CODON). रासायनिक पद्धतीने ऑलिगोन्यूक्लिओटाईड तयार करणारे खोराना हे पहिले शास्त्रज्ञ होते.

वरील पद्धतीचा अवलंब करून खोरानांनी पहिले कृत्रिम जनुक (gene) तयार केले. पॉलिमरेझ आणि लायपेझ या विकरांचा उपयोग करून डीएनएचे तुकडे एकमेकांशी जोडून दाखवले. याच्यावरूनच नंतर पॉलिमरेझ चेन रिॲक्शनचा  शोध  लागला. या कृत्रिम जनुकांचा उपयोग जीवशास्त्रामध्ये नवीन वनस्पती आणि प्राण्यांमध्ये क्लोनिंग, सीक्वेन्सिंग इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मानवी उत्क्रांती आणि माणसांमध्ये होणाऱ्या अनुवांशिक आजारांच्या अभ्यासासाठीही याचा खूप उपयोग होतो. आता खोरानाच्या संशोधनाच्या आधारे अनेक कंपन्या स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने व्यावसायिक स्तरावर कृत्रिम जनुके व ऑलिगोन्यूक्लिओटाईड आवश्यकतेनुसार तयार करून देतात.

त्यांच्या प्रयोगशाळेत १९७० मध्ये  पेशींच्या पटलामध्ये असणाऱ्या बॅक्टेरीयो रॉडॉप्सीन या प्रथिनाचा जैवरासायनिक अभ्यास झाला. हे प्रथिन प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करते. याच्याच आधारे नंतर डोळ्यामध्ये असणाऱ्या रॉडॉप्सीन या रंगद्रव्याचाही अभ्यास केला गेला.

त्यांच्या कार्याचा आढावा घेताना विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील त्यांचे माजी सहकारी त्यांना रासायनिक जीवशास्त्राचे जनक असे गौरवितात.

नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त खोरानांना इतर अनेक पुरस्कार मिळाले.

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ आणि भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खोराना प्रोग्राम राबवला जातो. याचा उद्देश भारत आणि अमेरिका या देशांमध्ये वैज्ञानिक, उद्योजक आणि सामाजिक उद्योजक यांची एक अखंड साखळी तयार व्हावी हा आहे.

हरगोबिंद खोराना यांचा  मृत्यू काँकॉर्ड मॅसाच्युसेट्स येथे झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा