मध्य आफ्रिकेतील चॅड देशाची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ७,२१,०८१ (२०१८). हे देशाच्या नैर्ऋत्य भागात, चॅड-कॅमेरून सरहद्दीवर, शारी व लोगोन या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. फ्रेंचांनी इ. स. १९०० मध्ये लष्करी तळ म्हणून वसविलेल्या या ठिकाणास, फ्रेंच लष्करी अधिकारी मेजर एल. जे. एम. लामी यांच्या नावावरून फॉर्लामी असे नाव देण्यात आले. लामी यांचा या युद्धात मृत्यू झाला होता. पुढे १९७३ मध्ये या ठिकाणाला अन्जामेना हे नवीन नाव देण्यात आले. १९६० च्या मध्यात येथे यादवी युद्ध सुरू झाले होते, तर १९८०-८१ मध्ये हे शहर लिबियन लष्कराच्या ताब्यात होते.
आधुनिक नगररचना असलेले हे शहर आहे. अनेक शासकीय व खाजगी कंपन्यांची प्रधान कार्यालये येथे आहेत. शहराचा परिसर गाळाच्या मैदानाचा असून, पावसाळ्यात (जुलै ते सप्टेंबर) तो भाग पूरमय असतो. शहराच्या परिसरात प्रामुख्याने कापसाची शेती, गुरेढोरे पाळणे आणि मासेमारी हे व्यवसाय केले जातात. शहरात अनेक वित्तीय संस्था आणि लघुउद्योग आहेत. येथे प्रशीतनयुक्त कत्तलखाना असून मांस-प्रक्रिया, हस्तव्यवसाय, कापडनिर्मिती, भात सडणे इत्यादी अनेक व्यवसाय चालतात. नायजेरिया, सूदान, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक व चॅड या देशांतील मुख्य शहरांशी हे रस्त्यानी जोडलेले आहे. ते चांगले नदीबंदरही आहे. या शहराच्या बरोबर समोरच नदीच्या दुसऱ्या काठावर कुसेरी (कॅमेरून) हे नगर असून ते अन्जामेनशी पुलाने जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. व्यापारी दृष्ट्या हे शहर महत्त्वाचे असून येथून कापूस, मीठ, द्विदल धान्ये, खजूर, मांस, जनावरे इत्यादींची निर्यात होते.
शहरात मत्स्यसंशोधन केंद्र, कापूस व कापड अभ्यास केंद्र, अन्जामेना (चॅड) विद्यापीठ (१९७१), राष्ट्रीय प्रशासकीय शिक्षणसंस्था (१९६३), पशुवैद्यक महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था आहेत. हे व्यापार केंद्र असून पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्धीस येत आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सायन्सेस’ (स्था. १९६१) या संस्थेशी संलग्न असलेले ‘नॅशनल म्यूझीयम’ (स्था.१९६३) येथे आहे. त्या वस्तुसंग्रहालयात अश्मीभूत अवशेषांचा अभ्यास, प्रागितिहास आणि मानवजातिवर्णन या विषयांसंबंधीचा विशेष संग्रह आहे. ‘लेक चॅड बेसिन कमिशन’चे प्रादेशिक प्रधान केंद्र या शहरात आहे.
समीक्षक : वसंत चौधरी