नवी दिल्ली येथील कुतुब संकुलात अनेक स्मारके आहेत. त्यांपैकी ‘कुव्वतुल इस्लाम’ ही मशीद महत्त्वपूर्ण आहे. गेली सोळाशे वर्षे न गंजता उभा असलेला दिल्ली लोहस्तंभ म्हणजे प्राचीन काळात भारतीय कारागिरांनी धातुशास्त्रात बजावलेली अजोड कामगिरी म्हणावी लागेल. लोहस्तंभावरील महत्त्वाची लिपी म्हणजे संस्कृत- ब्राह्मी लिपी आहे. या लिपीचा अभ्यास करून कोणत्या राजवटीत लोहस्तंभाची घडण झाली याचे निश्चित अनुमान काढता येते. गुप्त राज्यकर्त्यांपैकी चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याने  इ.स. ४०२ च्या आसपास खगोलशास्त्रीय अभ्यासाकरिता हा स्तंभ घडविला असावा. या लोहस्तंभाची उंची तेवीस फूट सहा इंच असून जमिनीतील भाग तीन फूट खोल आहे. लोहस्तंभाच्या वरच्या बाजूकडे म्हणजे टोपाकडे व्यास कमी होत गेलेला आहे. आकर्षक कोरीव काम असलेला हा टोप सात वेगवेगळ्या भागापासून एकत्र सांधला आहे.

लोहस्तंभाच्या परीक्षणासाठी घेतलेल्या नमुन्याच्या अंतर्गत संरचनेवरून लोखंड वितळवून थंड केल्याचे (as cast) दिसून येत नाही. लोखंडाच्या तळाकडील भागावर हातोड्याचे घाव स्पष्टपणे दिसून येतात. घडीव लोखंडाचे तुकडे वर्तुळाकार चकतीवर उभ्या रेषेत सांधले असावेत. ठरावीक उंचीनंतर सगळे तुकडे सांधणे शक्य नसल्यामुळे ऐरणीवर (anvil) ठेवण्यात आलेल्या मोठ्या तुकड्यावर एका बाजूस एक असे सांधून आडवे घडाई- जोडकाम (Horizontal forge welding) करून लोहस्तंभ घडविला गेला असावा.

लोहस्तंभाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वपूर्ण म्हणजे गंजप्रतिबंधक क्षमता. लोखंड निर्मितीकरिता प्रचलित असलेल्या प्राचीन भारतात ‘सरळ क्षपण- पद्धती’मध्ये चुनखडीचा वापर होत नव्हता. परिणामी तयार होणाऱ्या लोखंडामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असायचे. भारतीय कारागिरांनी लोहस्तंभाकरिता जाणीवपूर्वक फॉस्फरसयुक्त घडीव लोखंड वापरले आहे.

कार्बन         ०.१५

फॉस्फरस           ०.२५ तांबे         ०.०३

सिलिकॉन    ०.०५

मँगेनीज            ०.०५ निकेल       ०.०५
गंधक        ०.०५ नायट्रोजन           ०.०२

   लोह          उर्वरित

           तक्ता: दिल्ली लोहस्तंभाच्या घडीव लोखंडातील घटकांचे  सरासरी वजनी प्रमाण.

फॉस्फरसमुळे लोहस्तंभावर असणाऱ्या हलक्याशा गंजाच्या आवरणातील अस्थिर ऑक्सिहायड्रॉक्साइडचे रूपांतर स्थिर ऑक्सिहायड्रॉक्साइडमध्ये होते आणि गंजण्याची प्रक्रिया मंदावते. अधिक कालावधीनंतर यापेक्षा जास्त स्थिर असे लोखंडाचे संयुग मॅग्नेटाइट तयार होते. लोखंडामधील फॉस्फरसचा हवेतील बाष्पाशी संपर्क येऊन फॉस्फरिक आम्ल तयार होते. फॉस्फरिक आम्लाची लोखंडावर अभिक्रिया होऊन आयर्न-हायड्रोजन-फॉस्फेट- हायड्रेटचे गंजप्रतिबंधक आवरण तयार होते. हे आवरण अस्फटिकी स्वरूपात असते. लोहस्तंभाचे वजन सहा टन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे सांद्रीकरण आणि निर्जलीभवन या चक्रास चालना मिळते. यामुळे अस्फटिकी आयर्न हायड्रोजन फॉस्फेट हायड्रेटचे रूपांतर स्फटिकी स्वरूपात होते. या स्फटिकांमुळे गंजाच्या आवरणातील छिद्रे आणि भेगा भरून निघतात आणि गंजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते.

संदर्भ :

  • डॉ. देशपांडे, प्रविण प्रल्हाद, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,२०१४.

समीक्षक – बाळ फोंडके

This Post Has 2 Comments

  1. ननवरे प्रतिक अंकुश

    केवळ धातूंच्या अचुक प्रमाणांमुळे गंजप्रतिबंधक क्षमता वाढवली गेली आहे.हे धातूंच्या अचुक प्रमाणांचे केलेले नियोजन म्हणजे एक अविश्वसनीय कामगिरी आहे.

  2. Prachi

    Thank you sir, for the right information.
    Very nice information.

प्रतिक्रिया व्यक्त करा