आफ्रिकेतील साउथ सूदान या देशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ५,२५,९५३ (२०१७). साऊथ सूदान – युगांडा या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या उत्तरेस सुमारे १२७ किमी., बाहर एल्-जेबेल (श्वेत नाईल) नदीच्या डाव्या (पश्चिम) तीरावर वसलेले आहे.

प्रारंभी हे आदिवासी लोकांचे लहानसे खेडे होते. इ. स. १९२०-२१ मध्ये येथे ‘चर्च मिशनरी सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. तेव्हा ते जूबा नावानेच ओळखले जाई. इ. स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस ती माँगॅला प्रांताची राजधानी करण्यात आली. तेव्हापासून येथे नव्या इमारतींच्या बांधकामास सुरुवात झाली. साउथ सूदानच्या स्वातंत्र्यापूर्वी (२०११ पूर्वी) साउथ सूदान हा सूदानचा एक भाग होता. त्या वेळी सूदान हा ब्रिटन आणि ईजिप्त या देशांच्या संयुक्त प्रशासनाखाली होता. इ. स. १९४७ मध्ये जूबा येथे सूदानच्या उत्तर आणि दक्षिण विभागांच्या प्रतिनिधींची ‘जूबा कॉन्फरन्स’ झाली. दक्षिण सूदान युगांडाशी जोडले जावे, अशी ब्रिटिशांची अपेक्षा होती (इ. स. १९४७); परंतु जूबा कॉन्फरन्सने हे धोरण मोडीत काढून दोन्ही सूदान एकत्रित ठेवण्याच्या बाजूने कौल दिला. सूदानमधील राजकीय, धार्मिक, वांशिक आणि आर्थिक मुद्यांवरून १९५५ ते १९७२ आणि १९८२ मध्ये यादवी झाली. या घडामोडींदरम्यान जूबा हे ठिकाण मोक्याचे ठरले होते. २००५ मध्ये झालेल्या सर्वसमावेशक शांतता करारानुसार दक्षिण सूदानला ‘ऑटॉनॉमस गव्हर्नमेंट ऑफ सदर्न सूदान’ या नावाने स्वायत्तता देण्यात आल्यामुळे यादवी संपुष्टात आली. त्या वेळी जूबाला प्रादेशिक राजधानीचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून जूबाच्या विकासास वेगाने सुरुवात झाली. साउथ सूदानच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत जूबा महत्त्वाचे होते.

९ जुलै २०११ रोजी साउथ सूदान या नवीन देशाची निर्मिती झाली आणि त्याची जूबा ही राजधानी ठेवण्यात आली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजधानीचे ठिकाण देशाच्या साधारण मध्यवर्ती असलेल्या राम्सीएल येथे हलविण्याची योजना होती; परंतु ती फलद्रुप झाली नाही. परिसरातून उत्पादित होणाऱ्या तंबाखू, कॉफी, मिरची इत्यादी शेतमालाच्या व्यापाराचे केंद्र म्हणून जूबा प्रसिद्ध आहे. हे महत्त्वाचे नदीबंदर असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे राष्ट्रीय महामार्गाचे केंद्र असून युगांडा, केन्या, काँगो प्रजासत्तक या देशांशी महामार्गाने जोडलेले आहे. येथे जूबा विद्यापीठ आहे (१९७५).

समीक्षक : वसंत चौधरी