गोस्वामी, किशोरीलाल : (१५ फेब्रुवारी १८६५ – २९ मे १९३३). हिंदी कादंबरीकार. जन्म बनारस येथे. भारतेंदु मंडळाशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते धार्मिक वृत्तीचे व निंबार्क संप्रदायाचे अनुयायी होते. हिंदू धर्माबद्दल त्यांना इतका अभिमान होता, की आर्य समाजाच्या मतांना व त्या काळच्या सुधारणावादी विचारांना त्यांनी खूप विरोध केला. ते मुख्यतः कादंबरीकार होते. त्यांच्या सु. पासष्ट कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. सामाजिक, ऐतिहासिक, रहस्यप्रधान अशा सर्व तऱ्हेच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

१८९८ मध्ये उपन्यास  नावाचे कादंबरी वाङ्‌मय प्रकाराला वाहिलेले स्वतंत्र मासिक त्यांनी सुरू केले. प्रणयिनी परिणय (१८८०), त्रिवेणी (१८८८), स्वर्गीय कुसुम वा कुसुम कुमारी (१८८९), लवंगलता वा आदर्श बाला (१८९०), सुख शर्वरी (१८९१), प्रेममयी (१९०१), लीलावती (१९०१), राजकुमारी (१९०२), तारा (१९०२), चपला वा नव्य समाज चित्र (१९०३), कनककुसुम वा मस्तानी (१९०३), चंद्रावली वा कुलटा, कुतूहल (१९०५), हीराबाई या  बेहयाईका बोरका (१९०५), चंद्रिका वा जडाऊ चंपाकली (१९०५), तरुण तपस्विनी या कुटीरवासिनी (१९०६) इ. कादंबऱ्या त्या काळी विशेष लोकप्रिय होत्या.

प्रेमाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याचे कंकण त्यांनी बांधले होते. याचा परिणाम असा झाला, की एकीकडे सनातन हिंदू धर्माचे कडवे अभिमानी असूनसुद्धा त्यांच्या कादंबऱ्यांतून कामवासनेची चित्रणे खूप आली. विकृत आणि अनैतिक प्रेमाचे चित्रण त्यांनी मोठ्या चवीने तर केलेच परंतु हिंदू धर्माचा उमाळा आल्यावर पाप करणाऱ्या पात्रांना आपल्या कादंबऱ्यांतून त्यांनी शिक्षाही दिल्या. ऐतिहासिक कादंबऱ्यांतूनही त्यांची हिंदुत्व दृष्टी प्रबळ झाल्यामुळे, एकांगीपणा आला आहे. तरीही १८९३–१९१८ या काळात म्हणजे प्रेमचंदपूर्व काळात एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून त्यांनी स्थान मिळविले.

बनारस येथे ते निधन पावले.

संदर्भ :

  • नाग, कृष्णा, किशोरीलाल गोस्वामीके उपन्यासोंका वस्तुगत और स्वरूपगत विवेचन, आग्रा, १९६६.