स्प्रिंग अँड ऑटम अँनल्स : (छुन छिऊ). अभिजात चिनी साहित्यातील महात्मा कन्फ्यूशसच्या पाच महान अभिजात ग्रंथांपैकी एक ग्रंथ. या ग्रंथाला चिनी भाषेत छुन छिऊ असे म्हणतात. याचे स्वरूप बखरीसारखे आहे. या ग्रंथाचे लेखन इसवी सन पूर्व पाचव्या शतकात झाले आहे. या ग्रंथात लू राज्याच्या कालानुरूप इतिहासाचे महात्मा कन्फ्यूशस यांनी पुनर्लेखन केले आहे. महात्मा कन्फ्यूशस पण लू प्रांतातले होते. छुन छिऊ  हा महत्त्वपूर्ण प्राचीन ग्रंथ असून, चिनी अभ्यासकांवर २५०० वर्ष याचा प्रचंड प्रभाव होता.

प्राचीन काळी ऋतूंनुसार घटनाक्रम लक्षात ठेवत किंवा त्यानुसारच तो लिहून ठेवला जात असे. त्याप्रमाणे या ग्रंथाचे नावही वसंत, ग्रीष्म, शरद आणि शिशिर या ऋतूंनुसार आहे. ‘छुन’ या चिनी शब्दाचा अर्थ वसंत ऋतू असा आहे. तर छिऊ या शब्दाचा अर्थ शरद ऋतू असा आहे. यावरून स्प्रिंग अँड ऑटम अँनल्स हे इंग्रजी नांव पडले आहे. मराठीत ह्यास वसंत आणि शरद ऋतूची बखर असे म्हणता येईल. महात्मा कन्फ्यूशसनी प्राचीन काळी लू राज्याच्या इतिहासाचे पुनर्लेखन करताना या ग्रंथाचे पुनर्लेखन केले असे मानले जाते. ज्यावेळी हान साम्राज्याचे सिद्धांत  किंवा doctrineofhan या ग्रंथाची निर्मिती झाली त्यावेळी छुन छिऊ  या ग्रंथ निर्मितीचे श्रेय महात्मा कन्फ्यूशसना देण्यात आले. महात्मा कन्फ्यूशस यांनी सहाव्या शतकापासून छुन छिऊ ही संज्ञा वापरायला सुरुवात केली. हीच संज्ञा पुढे प्रचलित झाली.

लू राज्यात घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद यामध्ये करण्यात आली आहे. इसवी सन पूर्व ७२२ ते ४८१ या २४१ वर्षाच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना यामध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. हा ग्रंथ म्हणजे चिनी इतिहासाचा सर्वात पहिला दस्तऐवज असे म्हणायला हरकत नाही. अनेक राजांचे राज्याभिषेक, विवाह, राजांचे मृत्यू आणि अंत्यसंस्कार, युद्ध, महत्त्वाचे समारंभ, नैसर्गिक संकट या बाबत नोंदी लिहून ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोंद ही साधारण १० शब्दांची आहे. सगळ्यात मोठी जी नोंद आहे ती ४७ शब्दांची आहे. प्रत्येक घटनेबाबत कोणतीही अधिक माहिती यामध्ये दिली गेलेली नाही. हा ग्रंथ साेळा हजार शब्दांचा आहे.

या ग्रंथातील नोंदी या संक्षिप्त स्वरूपात असल्याने, या नोंदीचे अर्थ समजण्यासाठी अनेक स्पष्टीकरणात्मक विवेचने पण लिहिण्यात आली. या ग्रंथाचे लेखन त्या त्या कालखंडातील इतिहासकारांनी केले, पण ग्रंथाचे अंतिम (सर्वसमावेशक) संकलन आणि संपादन महात्मा कन्फ्यूशसनी केले आहे. महात्मा कन्फ्युशस यांना जाणीव होती की लू साम्राज्याचा इतिहास महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने नैतिक असणाऱ्या राजनीतीतल्या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिल्याचे दिसते. राज्यकारभार करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि उत्तम राज्यकारभार कसा करावा याचा उल्लेख त्यांनी यामधे केलेला आहे. या ग्रंथाची भाषा पण संक्षिप्त आहे. लू साम्राज्यातील महत्त्वपूर्ण घटनांची नोंद यामध्ये आहे, त्याचबरोबर लू प्रांत आणि इतर राज्यांचे संबंध, याबाबतही सगळे तपशील यामध्ये आहेत. छुन छिऊ  हा ग्रंथ म्हणजे चौ साम्राज्याच्या सुरूवातीच्या काळातील अहवाल आहे असे म्हणायला हरकत नाही. लू साम्राज्याच्या इतिहासात लष्कर, परराष्ट्र संबंध, बंडखोर, नैसर्गिक आपत्ती, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांबाबत इत्यंभूत माहिती संकलित करण्यात आली आहे. प्राचीन काळी चीनी दिनदर्शिका अचूक होती याची माहिती या ग्रंथातून मिळते.

छिन छिऊ  या ग्रंथावर केलेली Mr.Gongyang’s Aannals (GongyanZhuan) Mr. Guliang’s Annals (GuliangZhuan), Mr. Zuo Shi ‘s Annals ( ZuoZhuan) ही काही विवेचने उपलब्ध आहेत. चुओ चुआन कोंगयांग चुआन आणि कुलीआंग चुआन  यांमध्ये छिन छिऊ  ग्रंथाचे विवेचन आहे. चीनी इतिहासानुसार चुओ छिऊमिंग याने छिन छिऊ  ग्रंथातील अस्पष्ट मुद्द्यांचे विवेचन चुओ चुआन  यामध्ये केले आहे. या ग्रंथाचे एकत्रीकरण  इ.स. पूर्व पाचव्या शतकात झाले.

संदर्भ : 

समीक्षक : चंदा कानेटकर