जटामांसी (नार्डोस्टॅकिस जटामांसी)

व्हॅलेरिएनेसी कुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव नार्डोस्टॅकिस जटामांसी किंवा नार्डोस्टॅकिस ग्रँडिफ्लोरा आहे. ती एक सुगंधी वनस्पती आहे. हिमालयाच्या चीनकडील भागात सस.पासून ३,३००—५,००० मी. उंचीवरील पर्वतीय प्रदेशात ती सामान्यपणे आढळते. तसेच ती भारत व नेपाळच्या उत्तरेकडील भागांतदेखील वाढते.

जटामांसीचे झुडूप बहुवर्षायू,१०—६० सेंमी. उंच असून भूमिगत बळकट खोडामुळे ते ताठ वाढते. भूमिगत खोड सर्व बाजूंनी तपकिरी रंगाच्या तंतूंसारख्या केसांनी वेढलेले असते. यांनाच ‘जटा’ म्हणतात. खोड वास्तव नसल्यामुळे भूमिगत खोडातून पाने उगम पावतात. मुळापासून उद्गम असल्यामुळे या पानांना मूलज म्हणतात. पाने लांबट, सपाट व चमच्यासारख्या आकाराची, देठविरहीत व केशहीन असतात. क्वचित त्यांच्यावर लव असते. वरची पाने आयत-अंडाकार असतात. फुले गुलाबी, फिकट तांबूस किंवा निळी असून दाट वल्लरीत येतात. वल्लरी एक, तीन किंवा पाच असतात. फळे आरोही व पांढरट केसांनी वेढलेली असतात. बी एकच असते.

बाजारात मिळणारी औषधी मुळी जटामांसीचे भूमिगत खोड आहे. ते सर्व बाजूंनी तंतूंनी वेढलेले असते. त्यांतून बाष्पनशील तेल मिळते. या तेलाला स्पाईकनार्ड तेल म्हणतात. प्राचीन काळापासून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींत हे तेल सुगंधी द्रव्य तसेच जखमा भरून येण्यासाठी वापरात आहे. केसांच्या वाढीला आणि केस काळे होण्यास उपयुक्त ठरत असल्यामुळे या वनस्पतीला जटामांसी म्हणतात. मुळांमध्ये सुगंधी, उत्तेजक व कडू चवीची संयुगे असतात. पेटके व आचके यांवर ती गुणकारी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा