तांबे आणि जस्त यांचे मिश्रधातू म्हणजे पितळ (Brass). इ. स. पू. १५०० च्या सुमारास वापरात असलेल्या पितळी वस्तू हडप्पा संस्कृतीतील लोथल येथे केलेल्या उत्खननात मिळालेल्या आहेत. या वस्तूंमधील जस्ताचे प्रमाण ६.०४% इतकेच आढळून आले. याचाच अर्थ असा : जस्ताचे स्वतंत्र रीत्या क्षपण न करता तांबे आणि जस्ताच्या खनिजांचे एकत्रितपणे क्षपण करून पितळेचे उत्पादन करण्यात येत असे. याचे कारण म्हणजे जस्ताचे स्वतंत्रपणे उत्पादन तत्कालीन तंत्रज्ञान वापरून शक्य नव्हते. जस्ताचे क्षपण तापमान ९१३° से. आणि वितळबिंदू ४२०º से. असल्यामुळे जस्ताचे त्या काळी प्रचलित असलेल्या उंच भट्टीमध्ये क्षपण केल्यास ९१३° से. तापमानावर जस्ताची वाफ तयार होत असे. ही वाफ द्रव तांब्यामध्ये मिसळून (Cementation) पितळेच्या वस्तू तयार करीत. त्यामुळेच या पद्धतीमध्ये तयार होणाऱ्या पितळी वस्तूंमधील जस्ताचे प्रमाण २८% पेक्षा कमीच आढळून येते. पण तक्षशिला (सध्या पाकिस्तानातील रावळपिंडीजवळ असलेल्या) येथील उत्खननातील पितळी वस्तूंमध्ये यापेक्षा जास्त प्रमाणात जस्त आढळून आले आहे.
झवार येथील कारागीरांनी इ. स. पू. ५०० च्या सुमारास जस्ताचे क्षपण स्वतंत्र रीत्या शक्य करून दाखविले होते. हिंदुस्थान झिंक लिमिटेड, ब्रिटीश म्युझियम आणि बडोद्याचे विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९८० साली राजस्थान येथील झवार येथे केलेल्या उत्खननात याचा पुरावा मिळाला. जस्ताचे १.५ किग्रॅ. वजनाचे खनिज आणि इतर रसायने उच्च तापमानावर टिकू शकणाऱ्या बकपात्रांमध्ये (Retort) भरण्यात येत. ही बकपात्रे १२५०° से. पर्यंत ६ तास गरम करण्यात येत असत. ३० ते ३५ सेमी. लांबीच्या आणि १० ते १५ सेमी. व्यासाची ३६ बकपात्रे भट्टीत उभ्या रचलेल्या असत. सछिद्र विटा वापरून या बकपात्रांना आधार दिलेला असे. बकपात्रांना जोडलेल्या टाकीमध्ये जस्ताची वाफ थंड होऊन प्रत्येकी २०० ते ५०० ग्रॅम द्रवरूप जस्त जमा होत असे.सोळाव्या शतकापर्यंत येथे १ लाख टन जस्त तयार केले गेले होते.
जस्ताच्या उत्पादनाची प्राचीन भारतीय पद्धत
बिदर हे शहर हैदराबादपासून ८३ किमी. वर आहे. येथील कारागिरांनी ‘बीद्री’ – जस्त ७६-९८%, तांबे २-१०%, शिसे १-८%, कथिल आणि अल्प प्रमाणात लोह १.५% – हे मिश्रधातू शोधून त्यावर आधारित दागिने तयार करण्याचा व्यवसाय उभारून भरभराटीस आणला. अलीकडे हा व्यवसाय चालू आहे. १८ व्या शतकात भारताची आर्थिकस्थिती अतिशय खालावली, तसेच राजकीय परिस्थिती अस्थिर होऊन कालांतराने झवार येथील जस्तनिर्मितीचे तंत्रज्ञान संपुष्टात आले. भारतीय कारागिरांनी ऊर्ध्वपातन (Downward Distillation) पद्धतीवर आधारलेले हे तंत्रज्ञान पद्धतशीरपणे गुप्त ठेवलेले आढळते. तरीसुद्धा १६ व्या शतकामध्ये ही युक्ती चीनमध्ये पोहोचली होती. हेच तंत्रज्ञान वापरून १७३६ मध्ये विल्यम चॅम्पीयन याने इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे जस्ताचे औद्यागिक उत्पादन सुरू केले. तोपर्यंत पाश्चिमात्यांना जस्ताची ओळखदेखील नव्हती. १९८९ मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स (ASM)ने जस्ताच्या शोधाचे श्रेय निर्विवादपणे भारतास दिल्यामुळे धातुशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा भारतीय कारागिरांनी गाठला.
संदर्भ :
- डॉ. देशपांडे, प्रविण प्रल्हाद, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, २०१४.
समीक्षक – बाळ फोंडके