रोहिणी नक्षत्र : रोहिणी हे आयनिकवृत्तावरील एकूण २७ नक्षत्रचक्रातील चौथे नक्षत्र आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात रोहिणी (Aldebaran; Alpha Taurii) तारा हेच नक्षत्र मानतात. यालाच या नक्षत्राचा ‘योगतारा’ असेही संबोधले जाते. रोहिणी नक्षत्राचे चारही चरण हे पूर्णपणे वृषभ राशीत येतात. वृषभ राशीत विशेष दृष्टीत भरणारा पाच ताऱ्यांचा त्रिकोणी आकार आहे. पाश्चात्य लोक रोहिणी जवळच्या त्रिकोणाकृतीत असणाऱ्या या ताऱ्यांना ‘हायडेझ क्‍लस्‍टर’ (Hyades cluster) म्हणतात आणि त्याची ‘खुला तारकागुच्‍छ’ (Open cluster) म्हणून नोंद होते. रोहिणी जवळचे पाच तारे कल्‍पनेने जोडले तर एक समद्विभुज त्रिकोणी आकार तयार होतो. त्यात रोहिणी ही त्या त्रिकोणाच्या पायाच्या एका कोनाशी, तर गामा हा तारा त्रिकोणाच्या शिरोभागी आहे. या त्रिकोणाकृतीला वृषभातील बैलाचे मुख असे ओळखले जाते, तर रोहिणी तारा हा त्याचा डोळा मानले जाते. या त्रिकोणाकृतीला ‘शकटाकृतीही’ म्हणतात. या शकटाकृतीमध्ये म्हणजे त्रिकोणाच्या पायात रोहिणी जवळ जर शनी किंवा मंगळ आले, तर त्याला ‘रोहिणी शकट भेद’ झाला असे म्हणतात. असे झाल्यास त्या वेळी पृथ्वीवर मोठे उत्पात होतात असा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये येतो. यावर पुण्याच्या भांडारकर इंस्टिट्यूटच्या बोरीच्या अंकात संशोधनपर निबंध आहे.

रोहिणी (अल्देबारान; Aldebaran) हा १.६ दृश्‍यप्रत असलेला तारा असून तो आपल्यापासून सुमारे ६५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. रोहिणी हा एक लाल महाकाय तारा आहे. आकाशातील सर्वात तेजस्वी ताऱ्यांच्‍या यादीमध्ये त्याचा १४ वा क्रमांक लागतो. आपल्या सूर्यापेक्षा याचा पृष्ठभाग तुलनेने थंड आहे. रोहिणीच्‍या पृष्ठभागाचे तापमान साधारण ३,९०० केल्विन आहे. पण रोहिणीची त्रिज्या सूर्याच्या ४४ पट मोठी आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा सुमारे ४०० पट तेजस्वी आहे. रोहिणीचा परिवलन-काल  ५२० दिवसांचा आहे.

रोहिणी नक्षत्राच्या एकूण क्षेत्रामध्ये साधारण १५० च्या वर तारे आहेत. ख्रिस्तपूर्व ३,००० सालाच्या आधीच्या काळात वसंत संपात रोहिणीत होत असे.

रोहिणी ताऱ्याला विविध साहित्‍यात चंद्राच्‍या पत्‍नीची उपमा दिलेली आढळते. रोहिणीच्‍या जवळून महिन्‍यातून एकदाच चंद्र जातो, त्‍यावरून तो महिन्‍यातून एकदाच तिला भेटण्‍यासाठी स्‍वगृही येतो असेही अनेक कथांमधून पाहायला मिळते.

संदर्भ :

  • हा तारा कोणता ? गो. रा. परांजपे, मराठी साहित्‍य संस्‍कृती मंडळ, महाराष्‍ट्र राज्‍य शासन.

समीक्षक : आनंद घैसास