हिंदी महासागराची निर्मिती, भूविज्ञान आणि त्याच्या उत्क्रांतीचा इतिहास हा इतर महासागरांपेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे. ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक एडूआर्ट झ्यूस यांनी दक्षिण गोलार्धातील एका कल्पित खंडाला गोंडवन भूमी हे नाव दिले होते (इ. स. १८८५). झ्यूस यांच्या कल्पनेनुसार दक्षिण गोलार्धाचा बराचसा भाग व्यापणारे गोंडवन भूमी हे एक विस्तीर्ण खंड पूर्वी (पुराजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात) अस्तित्वात होते आणि त्याचा एक फाटा भारताच्या द्वीपकल्पास जोडला गेला होता. पुढे मध्यजीव महाकल्पाच्या उत्तरार्धापासून ते नवजीव महाकल्पाच्या (सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वीपासूनच्या) प्रारंभीच्या काळापर्यंतच्या अवधित गोंडवन भूमी भंग पावली. तिचे काही भाग खचून खाली गेले. खचलेल्या भागात हिंदी महासागर व दक्षिण अटलांटिक हे महासागर तयार झाले. गोंडवन भूमीचे न खचलेले भाग म्हणजे दक्षिणेतील आजची खंडे व भारताचे द्वीपकल्प हे होत; परंतु खंडाचे विस्तीर्ण भाग खचून हिंदी व अटलांटिक महासागरांच्या खळग्यांसारखे खळगे तयार होणे अशक्य आहे, हे लवकरच कळून आले. त्यामुळे आजची खंडे आणि महासागर आहेत त्या जागीच राहिलेली आहेत, ही झ्यूस यांची कल्पना ग्राह्य धरली जात नाही; कारण त्यांची स्थाने पूर्वीच्या जागेपासून सरकलेली आहेत, हे अनेक संशोधनावरून सिद्ध झालेले आहे. त्यातूनच खंडविप्लव सिद्धांत पुढे आला.
जर्मनीतील ॲल्फ्रेड व्हेगेनर (वॅगनर) यांनी इ. स.१९१५ मध्ये खंडविप्लव (खंड वहन) हा सिद्धांत मांडला. खंडविप्लव सिद्धांतानुसार पृथ्वीवर सुरुवातीला पॅन्जिया नावाचे एकच एक महाखंड अस्तित्त्वात होते. पुढे या महाखंडाचे वेगवेगळ्या खंडांमध्ये विभाजन सुरू झाले. अगदी सुरुवातीला या महाखंडाचे उत्तरेकडील लॉरेशिया (यूरेशिया) व दक्षिणेकडील गोंडवन भूमी किंवा गोंडवाना अशा दोन खंडांमध्ये विभाजन झाले. त्यांपैकी गोंडवन भूमी या खंडाच्या विभंगामुळे हिंदी महासागराची निर्मिती झालेली आहे. सुमारे १८ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन भूमी खंड दुभंगण्यास म्हणजेच हिंदी महासागराच्या निर्मितीस सुरुवात झाली. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन भूमी खंड भंग पावले. त्यानंतर सुमारे १३ कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड अंटार्क्टिका-ऑस्ट्रेलियापासून अलग झाले. भारतीय उपखंड सुमारे १२.५ कोटी वर्षांपूर्वी ईशान्येस सरकण्यास सुरुवात झाली. सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड उत्तरेकडील लॉरेशिया खंडावर आपटू लागले. त्याच वेळी आफ्रिका खंड पश्चिमेकडे वाहत गेले. सुमारे ५.३ कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया खंड अंटार्क्टिकापासून अलग झाले. या सर्व हालचाली सुरू असताना मधल्या भागात जो खळगा निर्माण झाला, त्यात पाणी साचून हिंदी महासागराची निर्मिती झाली. हिंदी महासागराची आजची सापेक्ष स्थिती सुमारे ३.६ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली. या महासागरातील बहुतेक सर्व द्रोणी प्रदेश सुमारे ८ कोटी वर्षांपेक्षा अलीकडच्या कालखंडातील आहेत. व्हेगेनर यांची ही खंडविप्लव कल्पना त्या काळातील अनेक वैज्ञानिकांना मान्य झालेली नव्हती; कारण खंडांचे वहन होण्यास कोणत्या अंतर्गत शक्ती कारणीभूत ठरल्या हे व्हेगेनर यांना स्पष्ट करता आलेले नव्हते.
भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार या महासागराच्या निर्मितीची सुरुवात सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी झाली असावी. समुद्रतळावर दोन भूखंडांच्या मध्ये महासागरीय पर्वतरांगा असतात आणि त्यांना लंबरूप (आडवे छेदणारे) विभंग असतात. १९६० – १९७० या काळात अनेक शास्त्रज्ञांनी या गोष्टीचे चिकित्सक विश्लेषण केले आणि या विचारमंथनातूनच भूपट्ट सांरचनिकी सिद्धांत पुढे आला. या सिद्धांतानुसार सर्व भूपट्टांच्या सीमांवर मध्यस्थ महासागरीय पर्वतरांगा, चापाकृती द्वीपसमूह वा महासागरीय खंदक (महासागराच्या तळावरील लांब, अरुंद व खोल घळ) आहेत. भूपट्टांच्या सीमा – मग ते भूपट्ट लहान असोत अथवा मोठे असोत – पृथ्वीवरील ज्वालामुखींचे, भूकंपांचे व निरनिराळ्या सांरचनिक घटकांचे उगमस्थान आहे. ही सर्व वैशिष्ट्ये हिंदी महासागरातही आढळतात.
समीक्षक : माधव चौंडे