हिंदी महासागरातून आणि परिसरातून मिळणारी विविध प्रकारची खनिज व जैविक संसाधने, त्यामुळे वाढलेला व्यापार, वाहतूक, पर्यटन इत्यादींमुळे गेल्या काही दशकांपासून आर्थिक दृष्ट्या हिंदी महासागराचे महत्त्व खूपच वाढलेले आहे.

खनिज संसाधने : खनिज तेल हे या महासागराच्या तळाखालून मिळणारे सर्वाधिक महत्त्वाचे संसाधन आहे. पर्शियन आखात प्रदेशात जगातील सर्वाधिक खनिज तेल साठे आहेत. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांच्या किनाऱ्यांच्या अपतट भागांत खनिज तेल व नैसर्गिक वायू साठ्यांच्या समन्वेषणाचे काम चालू आहे. दोन्ही प्रदेशांत या दोन्ही संसाधनांचे फार मोठे साठे असावेत, असा अंदाज आहे. यांशिवाय ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनाऱ्यावरील अपतट प्रदेश, अंदमान समुद्र, विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील आफ्रिकेचा अपतट सागरी प्रदेश व मादागास्करच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील अपतट प्रदेशांत खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे चालू आहे. पर्शियन आखातावरील देश वगळता भारत हा अपतट सागरी प्रदेशातून खनिज तेलाचे व्यापारी तत्त्वावर सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे. त्यापैकी मुंबई हाय या तेलक्षेत्रातून भारत सर्वाधिक खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतो. ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनाऱ्यावरील अपतट प्रदेशातून काही प्रमाणात नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले जाते.

हिंदी महासागरातून मिळणारे दुसरे महत्त्वाचे खनिज संसाधन म्हणजे ग्रंथिल मँगॅनीज (मँगॅनिजाचे गोटे). या महासागराच्या दक्षिणेकडील मध्य भागात, साधारणपणे पश्चिमेस, दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून पूर्वेस दक्षिण ऑस्ट्रेलियन द्रोणीपर्यंतच्या सागरी प्रदेशात मँगॅनिजाचे गोटे आढळतात. पूर्व भागातील या खनिजात मँगॅनिजाचा अंश सर्वाधिक, तर वायव्य भागातील खनिजात तो सर्वांत कमी आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला, तरी या खनिजाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेणे, त्यावर प्रक्रिया करणे जिकिरीचे ठरते. यांशिवाय इल्मेनाइट, कथिल, टिटॅनियम, फॉस्फराइट, मोनॅझाइट, झिर्कॉन आणि क्रोमाइट ही खनिजे सागरी किनाऱ्याजवळील वालुकामय भागांत मोठ्या प्रमाणात आढळतात.

जैविक संसाधने : हिंदी महासागराच्या सर्वच भागांत विशेषत: तांबडा समुद्र, पर्शियन आखात आणि किनारी पाण्याच्या भागांत विविध प्रकारचे प्राणिजीवन आढळते. हिंदी महासागराचा विस्तार उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यात आहे. उष्णकटिबंधीय पट्ट्यांतील उथळ सागरी भागांत मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या प्रवाळ आणि इतर जीवांमुळे कॅल्शियमयुक्त तांबडे शैवल आणि प्रवाळद्वीपे निर्माण झाली आहेत. अशा प्रवाळ खडकांच्या रचना या स्पंजप्राणी, कृमी, खेकडे, मृदु शरीराचे प्राणी, सागरी अर्चिन, भंगुरतारा, चक्राकार मासा, लहान परंतु रंगीबेरंगी मासे इत्यादी प्राण्यांची आश्रयस्थाने आहेत. अशा खडकांच्या निवाऱ्यात या प्राण्यांची पैदास चांगली होते.

उष्णकटिबंधीय किनाऱ्यांचा बराचसा भाग घनदाट कच्छ वनश्रीने व्यापलेला असून त्याला अनुसरून तेथील प्राणिजीवन आढळते. सागरी लाटांमुळे किनारी भागाची होणारी धूप नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कच्छ वनश्रीला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे विविध जलचरांची ही प्रमुख पैदास केंद्रे आहेत. या महासागरी भागात शंभरावर जातीचे लहान मोठे कवचधारी तसेच मृदु शरीराचे असंख्य प्राणी आढळतात. विविध जातीचे उडणारे मासे, तेजस्वी अँकोव्ही, लॅन्टर्न, लहान मोठे ट्यूना, सेलफिश, विविध प्रकारचे शार्क इत्यादी मत्स्यप्रकार; टूथहेड व बलीन प्रकारचे देवमासे; डॉल्फिन, सील यांसारखे मोठे सस्तन प्राणी आणि सागरी कासव इत्यादी या महासागरात आढळतात. अ‍ॅल्बट्रॉस व फ्रिगेट पक्षी सर्वत्र आढळतात. महासागराच्या समशीतोष्ण भागातील बेटांवर आणि अंटार्क्टिकाच्या किनारी प्रदेशात विविध प्रकारांचे पेंग्विन पुष्कळ आढळतात.

मासेमारी : हिंदी महासागरातील प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्र, दक्षिण आफ्रिकेचा किनारा व इतरत्र आढळणाऱ्या ऊर्ध्वगामी सागरी प्रवाहांमुळे पृष्ठीय पाण्यात मोठ्या प्रमाणावर पोषकद्रव्ये आढळतात. त्यामुळे मुबलक प्रमाणात प्लवक जीवांची निर्मिती होते. त्यांवरच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या सागरी जलचरांची मोठ्या प्रमाणावर पैदास झाल्यामुळे मासेमारीची संभाव्यता येथे अधिक आहे; परंतु खोल सागरातील व्यापारी तत्त्वावरील मासेमारी अल्प प्रमाणात केली जाते. मासेमारीच्या बाबतीत बराचसा भाग अविकसितच राहिला आहे. येथील मासेमारी प्रामुख्याने उथळ सागरी भागात, मोठ्या प्रमाणावरील छोट्या मच्छिमारांकडून केली जाते. उष्णकटिबंधीय हवामान हा येथील व्यापारी मासेमारीतील प्रमुख अडथळा ठरला आहे; कारण अशा हवामानात मर्यादित प्लवकांमुळे माशांची पैदास कमी होते; तसेच अशा हवामानात पकडलेले मासे त्वरित शीतगृहांमध्ये ठेवले नाहीत किंवा त्यांवर प्रक्रिया केली नाही, तर ते खराब होतात.

या महासागराच्या किनाऱ्यालगतचे देश किनारी मासेमारी करतात. यांमध्ये मुख्यतः कोळंबी, सार्डिन, मॅकरेल, अँकोव्ही, क्रोकर, तांबुसा (स्नॅपर), स्केट, ग्रंट इत्यादी जातींचे मासे पकडले जातात. किनारी मासेमारीत कोळंबीचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर घेतले जात असून भारत कोळंबीची सर्वाधिक पकड करतो. खोल महासागरी मासेमारी करणाऱ्या देशांपैकी जपान, दक्षिण कोरिया, तैवान, रशिया हे प्रमुख आहेत. अशा मासेमारीत ट्यूना व ट्यूनासारख्या जातीचे मासे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात पकडले जातात. किनारी देशांनी त्यांच्या किनाऱ्यापासून ३७० किमी. अंतरापर्यंतच्या आर्थिक पट्ट्यातील सागरी संसाधनांवर आपला हक्क सांगितला, तेव्हापासून मालदीवसारख्या लहान देशांना आपले राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या सागरी प्रदेशात मासेमारी करण्याचे हक्क इतर प्रमुख देशांना देण्यात आलेले आहेत. अशा प्रमुख देशांकडे खोल महासागरी मासेमारीसाठी मोठे भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असते. या महासागरातून प्रतिवर्षी सुमारे १०.२ द. ल. मे. टन (जगाच्या सुमारे ८.६%) मासे पकडले जातात.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम