प्रेन्टिस, रॉस एल्. :   (१६ ऑक्टोबर १९४६). रॉस एल. प्रेन्टिस यांनी वॉटर्लू विद्यापीठातून पदवी मिळवली. नंतर त्यांनी टोरंटो विद्यापीठातून पदव्युत्तर आणि पीएच्.डी. पदवी मिळवली. त्यांचे मार्गदर्शक होते डोनाल्ड ए. एस्. फ्रेझर. प्रेन्टिस १९७४पासून फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये (एफ्.एच्.सी.आर्.सी.) काम करू लागले. तिथे वीस वर्षाहून जास्त काळ त्यांनी नोकरी केली आणि त्यादरम्यान ते या केंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि निदेशक होते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमेरिकेतील क्लिनिकल कोऑर्डीनेटिंग सेंटर फॉर विमेन’स हेल्थ इनिशिएटिव्हचे (डब्लू.एच्.आय.) मुख्य अन्वेषक तसेच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये जैवसंख्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.

उत्तरजीवित्व विश्लेषण (survival analysis) म्हणजे घटना घडल्यावर जीवित राहाण्याबाबतच्या काळाचे  संख्याशास्त्रीय पद्धतीने केलेले विश्लेषण. जेव्हा उत्तरजीवित्व-काळ भिन्न प्रकारचा असतो आणि त्याची कारणेही अनेक असतात, तेव्हा जोखमीही भिन्न प्रकारच्या असतात. त्यांच्या शोधलेखात प्रेन्टिस यांनी याबाबत कारण-विशिष्ट जोखीम फलाचा वापर करावा असे सुचवले. केवळ काही कारणे वगळून केलेल्या अपयशाच्या वेगाचे (failure rate) आकलन उपयोगी नाही. कारण वगळण्याची प्रक्रिया स्पष्ट करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. हा शोधलेख या विषयावरील एक प्रमाणित संदर्भ ठरला.

ऐंशीच्या दशकाच्या अंती वैद्यकीय चाचणीतील बदली अंतबिंदुंचा (surrogate end-points) उपयोग करण्यात प्रेन्टिस यांनी संशोधन केले. एडस् या रोगावर परिणामकारक उपचार शोधण्यात त्यांनी ‘प्रेन्टिस निकष’ मांडला. या निकषासाठी बदली चलाने उपचार आणि वास्तव अंतबिंदू यातील संबंध मिळवणे आवश्यक आहे. स्टॅटिस्टिक्स इन मेडिसिन या जर्नलमधील त्यांच्या शोधलेखात बदली अंतबिंदुंच्या वापराबद्दल महत्त्वाचे विवेचन आहे.

बहुचल प्रतिसादांच्या समाश्रयणाच्या विश्लेषणाबाबत (regression analysis of multivariate responses) प्रकाशित झालेल्या शोधलेखांच्या मालिकेत प्रेन्टिस यांनी मांडलेल्या दृष्टिकोनाला जी.इ.इ.२ (Generalized Estimating Equations 2) या नावाने संबोधले जाते. या संदर्भात प्रेन्टिस यांनी द्विघाती घातांकी प्रतिकृतींच्या वर्गाचा उपयोग मध्य आणि सहप्रचरण प्राचलांसाठी असलेल्या संयुक्त आकलन समीकरणे विकसित करण्यासाठी केला.

आहार आणि पोषण या विषयातील संशोधनामुळे दोषांच्या मोजणीसाठी प्रेन्टिस यांनी प्रमाणात असलेल्या घातक समाश्रयणातील दोषांच्या मोजणीचा अभ्यास केला (Proportional hazards regression). नंतरच्या एका शोधलेखात त्यांनी सहचलाच्या मोजणीत दोष असल्याने आलेल्या अपयश कालाचे सशर्त घातक फल मांडले. हा शोधलेख समाश्रयण कॅलिब्रेशन पद्धतीच्या उपयोजनात मैलाचा दगड मानला जातो.

बहुचल उत्तरजीवित्व फलाच्या आकलनाची (estimation of the multivariate survival function) समस्या सोडवून बहुचल अपयश काल आधारसामग्रीच्या समाश्रयण विश्लेषणासाठी कार्यक्षम आकलक मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. वर्जित आधारसामग्री असलेल्या अर्धप्राचली समाश्रयण प्रतिकृतींसाठी कार्यक्षम आकलक विकसित करणे असे अतिशय आव्हानात्मक कार्यदेखील त्यांनी हाती घेतले. जी.इ.इ.२ प्रमाणेच प्रेन्टिस यांनी जोखीम गुणोत्तर आणि सहसंबंध प्राचलींसाठी संयुक्त आकलन समीकरणे विकसित केली.

वैद्यकीय आणि लोकसंख्येच्या अभ्यासाचे विश्लेषण आणि संख्याशास्त्रीय संकल्पनांवर पद्धती विकसित करण्यावर प्रेन्टिस कार्य करत आलेले आहेत. त्यात त्यांनी आहार, पोषण आणि जुनाट व्याधी यांच्या अभ्यासासाठी रणनीती आणि संशोधन संकल्पना यावर भर दिला. जुनाट व्याधींवरील प्रतिबंध या विषयावरील संशोधनाकडे त्यांचा विशेष कल राहिलेला आहे. पूर्वी कर्करोग, हृदय आणि रक्तवाहिनी संबंधित व्याधींचा धोका कमी करू शकतील अशा आहारातील आणि संप्रेरकांच्या बदलावर भर दिला जात होता. प्रेन्टिस आणि त्यांच्या एफ्.एच्.सी.आर्.सी. मधील सहकाऱ्यांनी वैद्यकीय समन्वय केंद्रामध्ये त्यासंबंधी एक राष्ट्रीय कार्यक्रम राबवला होता. त्यावरून आणि डब्लू.एच्.आय. मधील अभ्यासामुळे पुढे आले की संयुक्त संप्रेरक बदलाच्या उपचारामुळे (combined hormone replacement therapy) स्तनाच्या कर्करोगाचा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. या निष्पत्तीमुळे या उपचाराचा वापर कमी झाला आणि अमेरिकेत प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगरूग्णांमध्ये वीस हजाराने घट झाली. डब्लू.एच्.आय. मधील अहवालावर आधारित संप्रेरक उपचार पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्या या विषयावर लिहिलेल्या त्यांच्या शोधलेखांमुळे अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्यसेवेवर चांगला प्रभाव पडला. त्यांच्या काही नव्या संख्याशास्त्रीय संकल्पनांचा आणि पद्धतींचा वैद्यकीय आणि साथीच्या रोगांच्या अभ्यासावर तात्काळ परिणाम दिसून आला. या कार्यासाठी प्रेन्टिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अमेरिकन असोसिएशन ऑफ कॅन्सर रिसर्च या संस्थेकडून ‘टिम सायन्स अवॉर्ड’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रेन्टिस यांनी वस्तुनिष्ठपणे मोजलेल्या शारीरिक क्रियाकलापांच्या आधारसामग्रीच्या विश्लेषणासाठी (analysis of physical activity data) संख्याशास्त्रीय पद्धती विकसित केल्या. त्यामुळे व्यायाम आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम (उदा., हृदयरोग प्रतिबंध) यातील संबंधाची समज सुधारण्यासाठी मदत झाली आहे. म्हणजेच संख्याशास्त्रात प्रेन्टिस यांचे योगदान केवळ शोधलेखांपुरते मर्यादित नसून उपयोजनाला पूरक असल्यामुळे ते एकूण संख्याशास्त्राला पुढे नेत आहे.

आपल्या अभ्यासावर आधारीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी दि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ फेल्युअर टाईम डेटा आणि दि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ मल्टिव्हेरिएट फेल्युअर टाईम डेटा अ मार्जिनल मॉडेलिंग ॲप्रोच ही पुस्तके अधिक लोकप्रिय आहेत.

प्रेन्टिस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनचे सदस्य आहेत. त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीतर्फे मार्विन झेलेन लिडरशिप अवॉर्ड, अमेरिकन असोसिएशन ऑफ कॅन्सर रिसर्चतर्फे रिसर्च एक्सलन्स इन एपिडेमिऑलॉजी अँड प्रिव्हेंशन अवॉर्ड, COPSS अवॉर्ड आणि संख्याशास्त्रीय विज्ञानाच्या सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष मूलभूत योगदानासाठी आर्. ए. फिशर लेक्चरशिप अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला आहे.

संदर्भ:

 समीक्षक : विवेक पाटकर