ढब्रल्यूबॉव्ह, न्यिकलाय : ( ५ फेब्रुवारी १८३६ – २९ नोव्हेंबर १८६१). रशियन मूलगामी उपयुक्ततावादी टीकाकार. त्यांनी पारंपरिक व स्वच्छंदतावादी साहित्य नाकारले. त्यांच्यावर पाश्चात्य विज्ञानाचा प्रभाव होता. विसरियन बिलिन्स्की नंतर मूलगामी बुद्धिमत्तेचे सर्वात प्रभावी मानले जाणारे टीकाकार. त्यांना साहित्यापेक्षा जीवनावरची टीका महत्त्वाची वाटायची. ढब्रल्यूबॉव्ह ह्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी कविता लिहिण्यास व रोमन कवितांचा अनुवाद करायला सुरुवात केली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या भावंडांसाठी आणि आपल्या शिक्षणासाठी खाजगी शिक्षक व अनुवादक म्हणून काम केले. सेंटपीटर्झबर्ग विद्यापीठात त्यांनी एक भूमिगत लोकशाहीवादी संघटना स्थापित केली, एक हस्तलिखित वर्तमानपत्राची सुरुवात केली व विद्यापीठ शासनाविरुद्ध विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या ऑन द फिफ्टीयत बर्थडे ऑफ एन.आय.ग्रेच (१८५४) व ऑन द डेथ ऑफ निकोलस फर्स्ट (१८५५) ह्या कविता त्यांचे हुकूमशाही विरोधी विचार दर्शवतात. १८५६ मध्ये विद्यार्थी असताना त्यांनी सौरेमेनिक ह्या प्रसिद्ध उदारमतवादी नियतकालिकामध्ये लिहायला सुरुवात केली; नंतर ह्याच नियतकालिकाच्या कार्यालयात चिकित्सक कर्मचारी प्रमुख म्हणून जीवनाच्या अखेरपर्यंत नोकरी केली.

व्हॉट इस ऑबलॉमोव्हिझम्? (१८५९-६०) हा ढब्रल्यूबॉव्ह ह्यांचा सर्वात प्रसिद्ध निबंध आहे. त्यात इवान गोंचारोव्हच्या ऑबलॉमोव्ह (१८५९) ह्या प्रसिद्ध कादंबरीत असलेल्या ऑबलाॅमोव्ह नावाच्या पात्रावर आधारित प्रत्यय निर्माण केला आहे. ह्यावर ऑबलॉमोव्हिझम् ही संज्ञा रशियन जीवनात व साहित्यात रुजू झाली. त्यामध्येच द सुपरफ्लुअस मॅन (अनावश्यक माणूस म्हणजेच निर्णय न घेऊ शकणाऱ्या व लक्षणीय कार्य करू न शकणाऱ्या कुलीन व्यक्तीची व्याख्या) ही संज्ञाही अंतर्भूत आहे.

संदर्भ :