तिखॉनॉव्ह, न्यिकलाय : (२२ नोव्हें १८९६- ८ फेब्रु १९७९). आधुनिक रशियन लेखक. सेंट पीटर्झबर्ग (सध्याचे लेनिनग्राड) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. व्यापारविषयक शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्याने कारकुनाची नोकरी केली. पुढे त्याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला. त्यानंतर तो ‘रेड आर्मी’ मध्ये दाखल झाला व त्याने क्रांतीमध्ये तसेच यादवी युद्धात भाग घेतला. १९२० नंतर तो लेनिनग्राड येथे स्थायिक झाला व ‘सेरेपिअन ब्रदरहूड’ या लेखकसंघटनेचे त्याने सदस्यत्व स्वीकारले. ओर्दा (१९२२, इं. शी. द होर्ड) व ब्रागा (१९२३ इं. शी. कंट्री–बिअर) हे त्याचे सुरवातीचे काव्यसंग्रह होत. त्यांत त्याच्या क्रांतिविषयक अनुभूती तसेच यादवी युद्धातील वीरवृत्ती यांचा स्वच्छंदतावादी दृष्टीकोनातून आविष्कार झालेला आहे. बोल्शेविक क्रांती व अकेमेइझम ह्यांची प्रेरणा असल्याचे त्यांच्या लेखनात दिसून येते.
१९३० च्या दशकात सामाजिक समस्यांवर त्यांनी कविता आणि लघुकथा लिहिल्या. गद्य मात्र स्वछंदतावादी राहिले. आंतरराष्ट्रीयत्व व राष्ट्राराष्ट्रांतील मित्रत्वाचे संबंध हा त्याच्या साहित्यातून प्रामुख्याने आलेला विषय होय. त्याच्या काही प्रख्यात साहित्यकृती पुढीलप्रमाणे होत : कीरव स नामी (दीर्घकाव्य; १९४१, इं. शी. कीरव इज विथ अस), लेनिनग्रादस्किये रासस्काजी (१९४२, इं. शी. स्टोरीज ऑफ लेनिनग्राड), ग्रुजीन्स्काया विस्ना (१९४८–४९, इं. शी. द जॉर्जियन स्प्रिंग), ना व्तरोम व्सिमीरस्कम कंग्रसे स्तरोन्निकव मीरा (१९५१, इं. शी. इन सेकंड यूनिर्वसल काँग्रेस ऑफ सपोर्टर्स ऑफ पीस) इत्यादी. उत्नया निगा (इं. शी. स्पोकन बुक,१९७९) ही त्याची अखेरची साहित्यकृती होय. त्याने कॉकेशस, मध्य आशिया, भारत, पाकिस्तान इ. ठिकाणी प्रवास केला. त्याचे प्रतिबिंब त्याच्या काव्यातून उमटले आहे. भारताविषयी प्रशंसेची भावना त्याच्या अनेक कवितांतून दिसून येते. तो जागतिक शांतता परिषदेचा स्थायी सदस्य होता. त्याला शांततेचे लेनिन पारितोषिक लाभले (१९५७), तसेच अनेक शासकीय पारितोषिकेही लाभली (१९४२, १९४९ व १९५२). त्यांत साहित्यविषयक स्टालिन पारितोषिकाचाही अंतर्भाव आहे.
संदर्भ :