अझान सुलक सिवरक्स : (२७ मार्च १९३३). थायलंडमधील सुप्रसिद्ध बौद्ध धर्मीय लेखक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक व आर्थिक स्तरावर चिरस्थायी बदल घडण्याकरिता भगवान बुद्धांच्या उपदेशाचा आध्यात्मिक पाया अत्यावश्यक आहे, असे ते मानतात. सुलक सिवरक्स यांचा जन्म थायलंड येथे झाला. इंग्लंड व वेल्स येथे त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. सयाम (थायलंड) मधील बौद्धविहारातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. शिक्षण पूर्ण केल्यावर १९६१ साली ते सयामला परतले. १९६३ मध्ये त्यांनी संघोम्सात परीतात (Sangkhomsaat Paritat) अर्थात सोशल सायन्स रिव्ह्यू  हे नियतकालिक सुरू केले. काही काळातच ‘थायलंडमधील बुद्धिवाद्यांचा आवाज’ अशी या नियतकालिकाने ख्याती मिळवली. समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवण्याचे महत्त्वाचे कार्य याद्वारे सुरू झाले.

काळाच्या ओघात बौद्ध धर्माच्या बाह्यस्वरूपात अनेक बदल घडत गेले. आध्यात्मिक प्रगतीला विशेष प्राधान्य देणाऱ्या बौद्ध धर्माचे स्वरूप विसाव्या शतकात अधिकच व्यापक बनलेले दिसते. बौद्ध धर्मातील अनेक आध्यात्मिक आचार्यांना सामाजिक प्रश्नांना प्रतिसाद देण्याची निकड जाणवू लागली. आशिया, दक्षिण पूर्व आशिया, व्हिएटनाम, कंबोडिया जेथे जेथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला, तेथे तेथे समाजाला ग्रासणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणविषयक समस्या जाणून त्या कमी करण्यात हातभार लावणे ही काळाची गरज अधोरेखित होत होती. यातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक बौद्ध चळवळी (Socially Engaged Buddhism) उदयास आल्या. या चळवळींतील एक प्रमुख नाव म्हणजे अझान (शिक्षक या अर्थाचे संबोधन) सुलक सिवरक्स होय.

उपेक्षित समाजाच्या समस्या केवळ शाब्दिक मार्गाने न मांडता प्रत्यक्ष त्या समाजात मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेण्यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ते आजही कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून साथिराकोसे‒नागप्रदीप फाउंडेशन (Sathirakoses‒Nagapradipa Foundation) ही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) उभी राहिली. ही संस्था उपेक्षित, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करते. इतर अनेक स्वयंसेवी संस्थांना एकत्र जोडणारी व मार्गदर्शन करणारी छत्र (प्रमुख) संस्था म्हणून ही संस्था कार्य करते. या व्यतिरिक्त ‘इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ एंगेज्ड बुद्धिस्ट्स’ या संस्थेच्या पालक सदस्यांपैकी सुलक सिवरक्स एक आहेत. चौदावे दलाई लामा, थेरवादी भिक्खु महाघोसानंद, व्हिएटनाममधील शांततेचे पुरस्कर्ते व सामाजिक कार्यकर्ते तिख–नाथ–हान (Thich Nath Hanh), आणि सुलक सिवरक्स यांनी एकत्र येऊन १९८७ मध्ये या संस्थेची स्थापना केली. विश्वभरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बौद्ध कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते. इतर सामाजिक उपक्रमांसोबतच पर्यायी शिक्षणव्यवस्था उभी करणे, बौद्ध धर्माचा उपदेश आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्था यांची सांगड घालणारे उपक्रम राबविणे, लेखक व कलाकारांना उत्तेजन देणे ही कार्ये देखील त्यांनी महत्त्वाची मानली.

साथिराकोसे–नागप्रदीप फाउंडेशनशी संबंधित काही महत्त्वाच्या सहसंस्था खालीलप्रमाणे आहेत :

  • थाई इंटर-रिलिजस कमिशन फॉर डेव्हलपमेंट (Thai Inter-religious Commission for Development, TICD) : स्थापना १९८०. आधुनिकता व बौद्ध धर्माचा उपदेश यांची योग्य सांगड घालून बौद्ध भिक्षु-भिक्षुणींना सामाजिक समस्यांविषयी जागरूक करण्याचे कार्य ही संस्था करते.
  • वोम्गसनीत आश्रम (Wongsanit Ashram) : स्थापना १९८५. मानव, निसर्ग व समाज यांचे नाते अधोरेखित करत आध्यात्मिक ध्यानधारणा व सामाजिक कार्य यांचा मेळ साधणारे विविध उपक्रम राबवण्यात पुढाकार.
  • सांति प्राचा धम्म इंन्स्टिट्यूट (Santi Pracha Dhamma Institute, SPDI) : स्थापना १९८६. समाजातील वाढती राजकीय अराजकता, चंगळवाद, आण्विक शस्त्रांस्त्रांचा धोका यांविरोधात चळवळ उभी करणे, पर्यायी शिक्षणव्यवस्था उभी करणे व त्यासाठी साधनसामग्री एकत्र आणणे.
  • स्पिरिट इन एज्युकेशन मुव्हमेंट (Spirit in Education Movement) : स्थापना १९९५. सक्षमीकरण, मानवी हक्कांचे महत्त्व, चिरस्थायी प्रगती, अर्थपूर्ण अस्तित्व अशी ध्येये समोर ठेऊन विविध उपक्रम राबवणे.

सामाजिक व राजकीय भूमिका : थायलंडमधील ढासळत्या समाजव्यस्थेवर सुलक सिवरक्स यांनी कायम परखड मते व्यक्त केली आहेत. त्यांनी स्थापन केलेली प्रकाशनसंस्था व ग्रंथभांडार ही बुद्धिवादी नेत्यांच्या बैठकीचे केंद्रस्थाने बनली. आपल्या व्याख्यानातून व लिखाणातून त्यांनी राजेशाहीवर परखड टीका केली आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. १९७६ मध्ये झालेल्या लष्करी उठावात शेकडो विद्यार्थी मारले गेले, तर अनेकांना जेरबंद करण्यात आले. याच काळात सिवरक्स यांचे ग्रंथभांडार जाळण्यात आले व त्यांच्या विरोधात अटकेचा आदेश काढण्यात आला. या परिस्थितीमुळे त्यांना दोन वर्षे थायलंडबाहेर काढावी लागली. त्या काळातही कॅलिफोर्निया विद्यापीठ; तसेच बर्कली, कोर्नेल, टोरोंटो इत्यादी विद्यापीठांमध्ये आपले अध्यापनाचे कार्य त्यांनी सुरू ठेवले.

त्यानंतर १९८४ मध्ये राजेशाहीवर टीका केल्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. परंतु जगभरातून उठलेल्या टीकेच्या आवाजाने त्यांना मुक्त करण्यात आले. १९९१ मध्ये पुन्हा एकदा राजेशाहीवर टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यावेळेस ते भूमिगत झाले. १९९२ मध्ये आपल्यावरील आरोपांच्या विरोधात त्यांनी फिर्याद दाखल केली व १९९५ मध्ये हा न्यायालयीन लढा जिंकला.

या सर्व कार्यकाळात त्यांचे सामाजिक कार्यही अविरत सुरू होते. १९७६च्या लष्करी उठावानंतर त्यांनी निकोलस बेनेट यांच्या साहाय्याने थायलंडमधील पहिली ‘मानवी हक्क समिती’ स्थापन केली. पुढील तीन वर्षांत ११००० कैद्यांना मुक्त करण्यात या समितीने यश मिळवले.

आपल्या व्याख्यानांतून तसेच ग्रंथांमधून जागतिकीकरण, वाढता उपभोक्तावाद आणि त्या अनुषंगाने नीतिमत्तेचा होणारा ऱ्हास यांविषयी चिंता व्यक्त करत बौद्ध धर्मातील नैतिक मूल्यांचे अधिष्ठान या परिस्थितीत कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकते हे त्यांनी वारंवार अधोरेखित केले. त्यांच्या विचारांवर काही वेळेस आदर्शवादी विचारसरणी म्हणून टीकाही झाली.

सुलक सिवरक्स यांना प्राप्त प्रमुख मान-सन्मान :

राईट लाइव्ह्लीहुड अवार्ड (१९९५)
गांधी मिलेनियम अवार्ड (२००१)
सामाजिक न्याय व शांततेसाठी कार्यरत उत्कृष्ट बौद्ध उपासक म्हणून श्रीलंकेतर्फे सन्मानित (२००९)

सुलक सिवरक्स लिखित प्रमुख ग्रंथसंपदा : 

अ सोशली एंगेज्ड बुद्धिझम (१९७५)
सियाम इन क्रायसिस (१९९०)
सीड्स ऑफ पीस : अ बुद्धिस्ट विजन फॉर रिन्यूइंग सोसायटी (१९९२)
मॉडर्न थाई मोनार्ची अँड कल्चरल पॉलिटिक्स (१९९६)
लोयाल्टी डिमांड्स डिसेंट : ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन एंगेज्ड बुद्धिस्ट (१९९८)
कॉन्फ्लीक्ट, कल्चर, चेंज : एंगेज्ड बुद्धिझम इन अ ग्लोबलायझिंग वर्ल्ड (२००५)
द विझडम ऑफ सस्टेनॅबिलिटी : बुद्धिस्ट इकॉनॉमिक्स फॉर द ट्वेन्टी फर्स्ट सेन्च्युरी (२०१०)

संदर्भ :

  • Sivaraksa, Suluk, Socially Engaged Buddhism, New Delhi, 2005.
  • Sivaraksa, Suluk, The Wisdom of Sustainability : Buddhist Economics for the 21st Century, Hawai, 2009.

समीक्षक – प्राची मोघे

प्रतिक्रिया व्यक्त करा