सर्वोदय श्रमदान चळवळ, श्रीलंकेतील : सामूहिक श्रमदानातून ग्रामस्वराज्य साकारू शकते यावर विश्वास ठेवणारी चळवळ. महात्मा गांधींचे विचार व बौध्द तत्त्वज्ञान यांची सांगड घालून प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेली संस्था आणि स्वावलंबनातून समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी श्रीलंकेतील एक प्रसिद्ध लोकचळवळ.
कार्य आणि विकास : श्रीलंकेतील सामाजिक कार्यक्षेत्रात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो डॉ. ए. टी. अरियरत्ने यांच्या प्रयत्नातून १९५८ मध्ये उभारल्या गेलेल्या ‘सर्वोदय श्रमदान चळवळी’चा. आधुनिक काळातील समस्यांच्या संदर्भात भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशाचे अधिक अर्थपूर्ण विवेचन देऊ करत आणि सामाजिक बांधिलकी जपत सर्वोदय श्रमदान चळवळीने आपला ठसा उमटवला आहे. महात्मा गांधींनी देऊ केलेल्या ‘सर्वोदय आणि ग्रामविकास’ या संकल्पनांनी डॉ. अरियरत्ने प्रभावित झाले होते. या संकल्पनांची बौद्ध तत्त्वज्ञानाशी सांगड घालत ‘सर्वोदय’ म्हणजे ‘सर्वांचे कल्याण’ (welfare of all) याचे रूपांतर ‘सर्वांचे प्रबोधन’ (awakening of all) असे करण्यात आले. सामाजिक संदर्भात चार आर्यसत्यांचे नवे विवेचन केले गेले. ‘दुःख’ हे प्रथम आर्यसत्य म्हणजे ‘गावकऱ्यांना आपल्या समस्यांची जाणीव होणे’; दुसरे आर्यसत्य ‘दुःख समुदय’ म्हणजे ‘या समस्यांची कारणे निश्चित करणे’; तिसरे आर्यसत्य ‘दुःख निरोध’ म्हणजे ‘विधायक कार्याद्वारे या समस्यांचे निराकरण करणे’, तर चौथे आर्यसत्य ‘मार्ग’ म्हणजेच ‘सर्वोदयाचा मार्ग’.
या चळवळीचा आरंभ कोलंबो येथील नालंदा माध्यमिक शाळेच्या श्रमदान शिबिरामधून झाला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांना ग्रामीण जीवनाची, तेथील समस्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने सुरू झालेल्या या शालेय शिबिरांनी हळूहळू चळवळीचे रूप घेतले. शालेय श्रमदान शिबिरात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांच्या विचारसरणीतील उल्लेखनीय बदल जाणवल्यामुळे सर्वोदय श्रमदान चळवळीने आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले. श्रम, कौशल्य, धन, जमीन अशा कोणत्याही स्वरूपात या चळवळीत आपला हातभार लावणे म्हणजेच ‘दान पारमीचे’ पालन करणे यावर भर दिला गेला. चळवळ योग्य दिशेने पुढे जावी यासाठी तिला आखीव रूप देण्यात आले व ध्येय-धोरणे निश्चित करण्यात आली.
समष्टीच्या पातळीवर या चळवळीने डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय म्हणजे सर्व स्तरांवर आध्यात्मिक, नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रबोधन घडवून आणणे. या ध्येयाप्रत जाण्यासाठी मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या चार ब्रह्मविहारांचा पाया आवश्यक मानलेला आहे. व्यष्टीच्या पातळीवर आरंभ करताना पुढील दहा मूलभूत गरजांचा विकास आवश्यक मानलेला आहे. १. शुद्ध व स्वच्छ पर्यावरण, २. शुद्ध पेय जल, ३. पर्याप्त वस्त्र, ४. पुरेसा व पौष्टिक आहार, ५. निवारा, ६. पर्याप्त आरोग्य सुविधा, ७. दळणवळणाची पुरेशी साधने, ८. आवश्यक वीज पुरवठा, ९. सर्वंकष शिक्षण आणि १०. आध्यात्मिक व सांस्कृतिक गरजांचे समाधान व शांतता.
‘ग्रामोदय’ हे या चळवळीचे एक प्रमुख अंग आहे. आजच्या घडीला श्रीलंकेतील विविध गावांत जवळपास तीन हजार सर्वोदय श्रमदान संस्थांची स्थापना झाली आहे. ही चळवळ खालील पाच स्तरांवर कार्य करते :
- पहिला स्तर : सर्वप्रथम एखाद्या गावाकडून विचारणा झाल्यावर तेथील गरजा लक्षात घेऊन श्रमदान शिबिर आयोजित केले जाते.
- दुसरा स्तर : श्रमदानाचे कार्य अखंड सुरू ठेवतील असे स्वयंसेवक निवडून त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. युवक, स्त्रिया, शेतकरी असे निरनिराळे गट केले जातात, बालवाडी व शालेय शिक्षणावर भर दिला जातो.
- तिसरा स्तर : सर्वोदय श्रमदान संस्थेची स्थापना केली जाते. गावातील प्रमुख गरजांचे सर्वेक्षण करून त्यानुसार धोरण ठरवणे, उपाययोजना करणे, आर्थिक मदत मिळवणे इत्यादी कार्ये निशित केली जातात.
- चौथा स्तर : आर्थिक सबलीकरणावर तसेच स्वावलंबन, ग्रामपातळीवरील अर्थव्यवस्थापन यांवर भर दिला जातो.
- पाचवा स्तर : ‘ग्रामस्वराज’ स्थापन करून पौष्टिक आहार, मूलभूत आरोग्य सुविधा, ग्रंथालये, आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादी बाबतींत गावाला स्वावलंबी बनवले जाते.
या पाचव्या पातळीवर पोहचलेली गावे नजीकच्या इतर गावांना त्यांच्या समस्या सोडवण्यास साहाय्य करतात. श्रीलंकेतील अनेक गावात निर्माण झालेले सर्वोदय श्रमदान संस्थेचे जाळे व या चळवळीचा वाढता प्रभाव हा ग्रामोदयाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. अनेक गावात सिंहली व तमिळ भाषिक नागरिक परस्पर सहकार्याने चळवळीत सहभागी होताना दिसतात, हे या चळवळीचे मोठे श्रेय म्हणावे लागेल. डॉ. अरियरत्ने यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. २००७ मध्ये त्यांना श्रीलंकेतील सर्वोच्च ‘श्रीलंकाभिमान्य’ पुरस्कार तेथील राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्रामपातळीवर आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून १९८६ साली सर्वोदय इकनॉमिक एन्टरप्राईझ डेव्हलपमेंट सर्विसेस (SEEDS) या संस्थेची स्थापना करण्यात आली. याशिवाय सुवसेथ सेवा सोसायटी (Suwasetha Sewa Society), शान्ती सेना (Shanthi Sena), विश्वनिकेतन (Vishva Niketan), सर्वोदय वुमेन्स मुव्हमेंट (Sarvodaya Womens Movement) या काही साहाय्यक संघटनांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशा विविध माध्यमातून सर्वोदय श्रमदान चळवळ ही श्रीलंकेतील एक महत्त्वाची व सर्वदूर पोहचलेली स्वयंसेवी चळवळ बनली आहे. १९७२ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची चळवळ म्हणून संसदेच्या कायद्यांतर्गत तिचा समावेश करण्यात आला.
असे असले तरी संस्थेच्या व्यवस्थापन प्रणालीत नोकरशाही मानसिकतेचा शिरकाव होत असल्याचीही टीका केली जाते. त्याचा परिणाम कमीतकमी राहावा याकरिता या चळवळीने विकेंद्रीकरणावर अधिकाधिक भर दिला आहे. स्वावलंबनाचा पुरस्कार करणाऱ्या या स्वयंसेवी चळवळीला विदेशातून मिळणाऱ्या देणग्यांविषयीही नाराजीचा सूर काढला जातो. सरकारी संस्था, अधिकारी वर्ग, प्रसारमाध्यमे या सर्वांशी सामंजस्याचे संबंध प्रस्थापित करत स्वतःची स्वतंत्र ओळख जपणे, हे या चळवळीपुढील एक महत्त्वाचे आव्हान आहे.
संदर्भ :
- Bond, George, The Buddhist Revival in Sri Lanka, Religious Tradition, Reinterpretation and Response, Delhi, 1992.
- Harvey, Peter, Introduction to Buddhist Ethics, United Kingdom, 2000.
- Jones, Ken, The Social Face of Buddhism, An Approach to Political and Social activism, London, 1989.
संकेतस्थळे :
http://epublications.bond.edu.au/cgi/viewcontent.cgi?article=1095&context=cm
समीक्षक – प्राची मोघे