सतराव्या शतकापासून जवळजवळ दोन शतके पुराणवस्तू जमवण्याच्या छंदासाठी का असेना, अनेक धाडशी प्रवाशांनी, वसाहतवादी युरोपीय सत्तांनी, सैनिकी व मुलकी अधिकाऱ्यांनी जगभरातल्या सांस्कृतिक इतिहासात रस घेतला आणि त्यामधून पुरातत्त्वीय अभ्यासाला प्रारंभ झाला. अठराव्या शतकात काही प्रमाणात पद्धतशीर उत्खनन करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी अद्यापही पुराणवस्तू गोळा करणे हा हेतू होता. पुराणवस्तूंचा अभ्यास करणाऱ्या हौशी संशोधकांची सोसायटी ऑफ ॲन्टीक्वेरीज ही संस्था लंडनमध्ये स्थापन झाली (१७०७). युरोपमध्ये प्राचीन काळासंबंधी केला जाणारा अभ्यास प्रामुख्याने प्राच्यविद्येच्या (Oriental studies) कक्षेत येत असे.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडमध्ये सर कोल्ट होआरे (१७५८–१८३८) या धनिक जमीनदाराने विल्टशायर भागात आढळणाऱ्या प्राचीन दफनांचे वर्गीकरण आणि उत्खनन केले (१८१२–२९). तथापि या काळातील इतर उत्खननांप्रमाणे त्यामधून फारसे नवीन काही मिळाले नाही. याची दोन मुख्य कारणे होती. पहिले कारण म्हणजे बायबलमधील उत्पत्तीच्या कल्पनांचा पगडा मोठा असल्याने पुरातत्त्वीय अवशेषांना अवघ्या पाच हजार वर्षांमध्ये बसवणे भाग होते. दुसरे कारण म्हणजे भूतकाळाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट अद्याप दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी पुराणवस्तू जमवणे हे होते. तसेच प्राचीन काळातले लोक रानटी असल्याने अशा राक्षसांसारख्या लोकांच्या अवशेषांबद्दल विशेष स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असे मत प्रचलित होते.

युरोपात एकोणिसाव्या शतकात पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन प्रामुख्याने प्राचीन संस्कृतींची भव्यदिव्य शहरे शोधण्याच्या हेतूने केले जात होते. इटालियन राजनीतिज्ञ व पुरातत्त्वज्ञ पॉल-एमिल बोटा (१८०२–१८७०) याने मेसोपोटेमियात ॲसिरियन राजवटींचे प्रासाद, शिल्पे व अनेक लेख शोधले (१८४३). याच काळात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ ⇨ सर ऑस्टेन हेन्री लेअर्ड (५ मार्च १८१७–५ जुलै १८९४) याने इराकमध्ये ⇨ निमरूदसह अनेक प्राचीन पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले. ईजिप्तच्या बाबतीत उत्खननाचा मुख्य उद्देश प्राचीन पुराणवस्तू गोळा करून त्या विविध वस्तुसंग्रहालयांना अथवा हौशी धनिकांना विकणे हाच होता. पुरातत्त्वज्ञ ऑग्युस्त मॅरिएट (१८२१-१८८१) यांनी ⇨ सकारा येथे इ. स. १८५० ते १८८१ दरम्यान उत्खनने केली. फ्रान्समधील ⇨ ल हाव्र्ह येथील वस्तुसंग्रहालयाकडे शेकडो वस्तू त्यांनी पाठविल्या होत्या (१८४८-४९). ईजिप्तमधील पुराणवस्तू तेथेच राहाव्यात म्हणून त्यांनी काहिरा येथे वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली व पुरावशेषांचा अभिरक्षक या पदावर काम केले.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस प्राचीन इतिहासात रुची घेऊन भारतात पुरातत्त्वीय संशोधनाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ ⇨ जेम्स प्रिन्सेप (२० ऑगस्ट १७९९–२२ एप्रिल १८४०) यांनी केले. त्यांनी माणिक्याल स्तूपाचे (१८३०) व काश्मीरमध्ये कुषाणकालीन पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले(१८३०; १८३३-३४). प्रिन्सेप यांच्या प्रेरणेने ब्रिटिश सैन्यात अधिकारी असलेल्या ⇨ सर अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४-१८९३) यांनी ⇨ सारनाथ (१८३७) आणि ⇨ सांची (१८५०) येथील स्तूपांचे उत्खनन केले. स्कॉटिश अभ्यासक व कलासमीक्षक ⇨ जेम्स फर्ग्युसन (१८०८-१८८६) यांनी भारतातील प्राचीन मंदिरांचा सखोल अभ्यास करून भारतीय वास्तुशिल्पशैली जगासमोर आणली (१८४५). भारतात एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला कर्नल ⇨ फिलीप मेडोज टेलर (१८०८-१८७६) या ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वतंत्रपणे मोलाचे पुरातत्त्वीय कार्य केले. दक्षिण भारतातील शोरापूर संस्थानात हिरेबेन्कल, जवरगी, राजन कोलूर आणि चिकनहळ्ळी या ठिकाणांचा शोध आणि काही महापाषाणयुगीन (megalithic) स्थळांचे स्वतंत्र प्रज्ञेने पद्धतशीर उत्खनन करण्याचे श्रेय मेडोज टेलर यांना दिले जाते. या ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांखेरीज ⇨ भाऊ दाजी लाड यांचे अवशेष व नाणी यांसंबधीचे कार्य मोलाचे आहे.

उत्तर अमेरिकेत अमेरिकन पुरातत्त्वज्ञ इफ्राइम स्क्वायर (१८२१–१८८८)  आणि एडविन डेव्हिस यांनी मिसिसिपी खोऱ्यातील सुमारे २०० दफन-टेकाडांचे उत्खनन केले (१८४५-४७). ही टेकाडे स्थानिक इंडियन लोकांच्या नाही, तर ‘माउंडबिल्डरʼ वंशातील लोकांच्याच दफनभूमी आहेत, असे त्यांचे प्रतिपादन होते.

एकोणिसाव्या शतकात पुरातत्त्वविद्येला आधुनिक स्वरूप येण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील प्रगती उपयोगी ठरली. स्कॉटिश भूवैज्ञानिक ⇨ जेम्स हटन (१७२६–१७९७) यांनी निरनिराळ्या कालखंडांतील दगडांचे विविध थर पाहून त्यांच्यातील क्रमाची संकल्पना मांडली होती. ब्रिटिश भूवैज्ञानिक ⇨ सर चार्ल्स लायेल (१७९७–१८७५) यांच्या द प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी (१८३०-३३) या ग्रंथात प्राचीन काळातील भूवैज्ञानिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती यांच्यात सारखेपणा असतो, हे तत्त्व मांडले होते. भूवैज्ञानिकांच्या या योगदानामुळे पुरातत्त्वविद्येत स्तरविज्ञानाचा पाया घातला गेला.

जाक बुशे डी पार्थे (१७८८–१८६८) या फ्रेंच सीमाशुल्क अधिकाऱ्याला सोमे नदीच्या खोऱ्यात ॲबेव्हिले येथे दगडाची अवजारे (हातकुऱ्हाड) आणि नामशेष झालेल्या प्राण्यांची हाडे मिळाली (१८३७). बायबलमध्ये वर्णन केलेल्या महापुराच्या कितीतरी आधी (ॲन्टीडिलुविअन) मानवाचे अस्तित्व असल्याचे यातून सिद्ध होते, असे प्रतिपादन बुशे डी पार्थेने केले. मानवी संस्कृतीला केवळ काही हजार वर्षांचा नाही, तर त्यापेक्षाही जुना इतिहास आहे, हा विचार पुरातत्त्वविद्येला कलाटणी देणारा ठरला.

डॅनिश पुरातत्त्वज्ञ ⇨ सी.जे. थॉमसन (१७८०–१८६५) यांच्या १८३६ मधील त्रियुग सिद्धांतामुळे पुरातत्त्वीय अवशेषांच्या वर्गीकरणाचे आणि सांस्कृतिक कालखंडांचे नाते असते, ही संकल्पना पुढे आली. डॅनिश पुरातत्त्वज्ञ जे. जे. ए. वोरसे (१८२१–८५) यांनी प्रागैतिहासिक काळातील अवशेषांचा काटेकोरपणे अभ्यास करून मानवी अस्तित्व गेल्या दहा हजार वर्षांपेक्षा अगोदरपासून आहे, हे सप्रमाण सिद्ध केले (१८४३). प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ ⇨ चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज  (१८५९) या ग्रंथाच्या प्रकाशनाने मानवी इतिहासाला आणि पर्यायाने पुरातत्त्वविद्येला कलाटणी मिळाली. पुरातत्त्वीय अवशेषांच्या वर्गीकरणाची चौकट विकसित करणाऱ्या ⇨ आर्थर जॉन एव्हान्झ (१८५१–१९४१) व ⇨ ऑगस्टस हेन्री पिट-रिव्हर्स (१८२७–१९००) अशा पुरातत्त्वज्ञांवर उत्क्रांतीच्या सिद्धांताचा परिणाम झाला.

अशा प्रकारे मानवी अस्तित्व खूप प्राचीन आहे. तीन युगांची कल्पना आणि उत्क्रांतिसिद्धांत यांच्या आधारावर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आधुनिक पुरातत्त्वविद्येची पायाभरणी झाली.

संदर्भ :

  •   Bonomi, J. Nineveh and its Palaces : The Discoveries of Botta and Layard applied to the Elucidation of Holy Writ, Adamant Media Corporation, 2001.
  •   Daniel, Glyn A Hundred and Fifty Years of Archaeology, Cambridge, 1976.
  •   Fagan, Brian The Oxford Companion to Archaeology, Oxford, 1996.
  •   Guha, Sudeshna Artefacts of History : Archaeology, Historiography and Indian Pasts, New Delhi, 2015.
  •   Lloyd, Seton Foundations in the Dust : The Story of Mesopotamian Exploration, New York, 1981.
  •   Renfrew, C. and Bahn, P.G. Eds., Key Concepts in Archaeology, New York. 2004.
  •   Ridley, Ronald T. Auguste Mariette : One Hundred Years After, 1984.

समीक्षक : शरद राजगुरू