संस्कृतीकरण या शब्दाचे मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. या शब्दाचा वापर एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील यूरोपीयन प्राच्यविद्या परंपरेत उच्चभ्रूंच्या संस्कृतीचे वर्णन वेगवेगळ्या अर्थाने करण्यासाठी व त्याचा इतरांवरील परीणाम दर्शविण्यासाठी केला गेला. त्यामुळे संस्कृतीकरण हा शब्द आणि त्याचा समाजशास्त्रीय विश्लेषणासाठीची संकल्पनात्मक चौकट म्हणून केला गेलेला वापर, यांत फरक करणे गरजेचे आहे.
एम. एन. श्रीनिवास यांनी दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यामधील कूर्ग समुदायाच्या धार्मिक व सामाजिक जीवन पद्धतीचा अभ्यास करून संस्कृतीकरणाची संकल्पना आपल्या रिलिजन अँड सोसायटी अमंग द कूर्ग्स इन साउथ इंडिया – १९५२ या ग्रंथात सर्वप्रथम मांडली. कूर्ग समाजाचे अध्ययन करताना निम्न जातीचे लोक आपल्यापेक्षा उच्च जातीतील लोकांचे आचार-विचार, पेहराव, आहारविषयक व कर्मकांड यांचे अनुकरण करून आपला सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशा निम्न जाती उच्चवर्णीयांचे अनुकरण साधारणत: दोन ते तीन पिढ्यांपर्यंत करीत राहिल्यास त्यांना उच्चवर्णीयांप्रमाणे दर्जा, प्रतिष्ठा मिळून जातीय स्तरीकरणात ते वरच्या पदाला पोहचतात. या अनुकरणाच्या सांस्कृतिक परिवर्तनाद्वारे निम्न जाती आपला दर्जा उर्ध्वगामी गतिशीलतेच्या दिशेने उंचाविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे उच्च जातींचे अनुकरण सतत करीत राहिल्यास या निम्न जाती उच्च वर्णाचे असल्याचा दावा करतात.
एम. एन. श्रीनिवास यांनी या संस्कृती गतिशीलतेच्या प्रक्रियेचे वर्णन प्रथमतः ब्राह्मणीकरण या शब्दाचा वापर करून केला होता; मात्र नंतर त्यांच्या निरीक्षणात आढळून आले की, भारतातील विविध प्रदेशांत ब्राह्मण हीच जात प्रभावी स्थान प्राप्त झालेली नसून त्या त्या प्रदेशातील इतरही उच्च जातींचे अनुकरण करण्याचे काम ब्राम्हणेत्तर जाती करतात. त्यामुळे ब्राह्मणीकरण ही संकल्पना संकुचित असून संस्कृतीकरण ही संकल्पना अधिक व्यापक आहे अशी त्यांनी मांडणी केली. भारतीय समाजातील सामाजिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी एम. एन. श्रीनिवास यांनी ही संकल्पना मानवशास्त्र विद्याशाखेमध्ये एक महत्त्वाचा दृष्टीकोन व सिद्धांत म्हणून विकसित केली आहे.
संस्कृतीकरण ही संकल्पना भारतीय समाजातील जातीव्यवस्था वा बंद स्तरिकरणाच्या पद्धतीत होणारे सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. हे परिवर्तन जातीच्या अंतर्गत स्वरूपातील असते. या परिवर्तनाला जातीअंतर्गत घटकच कारणीभूत असतात. संस्कृतीकरण हे जातीमधील परिवर्तनशीलता, गतिशीलता असते. त्यामुळे समग्र जातीव्यवस्थेच्या सोपानक्रमात कोणताच बदल संभवत नाही. संस्कृतीकरण हे स्थितिज (पोझिशनल) परिवर्तन असते ते संरचनात्मक नसते.
संस्कृतीकरण ही प्रक्रिया एकांगी स्वरूपाची नसते. यामध्ये उच्च जातींतील लोकसुद्धा आपल्या पारंपरिक प्रथा, परंपरा, रितीरिवाज यांचा त्याग करून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करीत असतात. याला त्यांनी पाश्चिमात्यिकरण अशी संकल्पना वापरली आहे. संस्कृतीकरणाची ही प्रक्रिया केवळ निम्न हिंदू जातींमध्येच आढळत नसून ती हिंदू नसलेल्या काही आदिवासी जमातींमध्येसुद्धा काळानुरूप थोड्याफार प्रमाणात आढळून येताना दिसून येते. तसेच संस्कृतीकरण ही प्रक्रिया सर्वच प्रदेशांत, जाती व उपजातींमध्ये सुरू आहे. डी. एन. मजूमदार यांनी आपल्या उत्तर प्रदेशातील मोहाना गावाच्या अभ्यासातून दाखवून दिले आहे की, संस्कृतीकरणाची प्रक्रिया ऊर्ध्वगामी झाली नसून ती क्षितिजसमांतरसुद्धा होताना दिसते आणि उच्च जातींतील लोकांनी कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींच्या व्यवसायांचा स्वीकारही करताना दिसतात. तसेच विदेशांतील समाजसुद्धा भारतीय जातींतील व जमातीतील संस्कृतीचे अनुकरण करीत आहेत. या प्रक्रियेस विसंस्कृतीकरण असे म्हणतात. थोडक्यात, विविध प्रदेशांत व जाती-उपजातींमध्ये संस्कृतीकरणाची उलट प्रक्रिया घडतांना दिसून येते. म्हणून भारतीय पारंपरिक समाजातील परिवर्तन संस्कृतीकरण व पाश्चिमात्यिकरण या दोन प्रक्रियेतून झाल्याचे दिसते.
पारंपरिक भारतीय समाजातील निम्न दर्जाच्या जातींमध्ये जी उर्ध्वगामी गतिशीलता घडून येते, त्याची अनेक कारणे आहेत. (१) पारंपरिक भारतात विवाहाचा आदर्श प्रकार म्हणून अनुलोम विवाहाला मान्यता होती. ज्यात उच्च दर्जाचे वर आपल्यापेक्षा निम्न दर्जाच्या वधुशी विवाह करतात. या विवाहाच्या संबंधामुळे वधुपक्षाला उच्च दर्जा मिळाल्यासारखे वाटते. (२) एखादी निम्न जात किंवा आदिवासी जमाती जेव्हा काही ऐतिहासिक कामगिरी करतात, समाजाच्या संरक्षणाच्या दृष्टीने किंवा समाजसेवेच्या रूपात प्रचंड यशस्वी कामगिरी करतात, तेव्हा त्या जातीला किंवा जमातीला समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. ते दर्जा व प्रतिष्ठेच्या सोपानक्रमात उच्च स्थानी विराजमान होतात. (३) एखादी निम्न जात आपल्या स्वप्रयत्नाने शिक्षणात, व्यवसायात, राजकारणात यश प्राप्त करते. अशा जातींचाही समाजात दर्जा उंचावतो; मात्र त्या जातीच्या यशाला उच्च जातींकडून वैधता मिळेलच असे नाही. निम्न जाती जर उच्च जातींप्रमाणे वागू लागले (उदा. कपडे, सोने, पादत्राणे, छत्री, पगडी वापरू लागले), तर त्यांना उच्च जातींकडून अपमानित केले जाऊन प्रसंगी त्यांच्यावर हिंसाही केल्याचे अनेक उदाहरण आहेत.
संस्कृतीकरणातून होणारे सामाजिक परिवर्तन हे संथगतीने सुरू असते. या परिवर्तनाचे उत्तरदायी घटक हे जाती अंतर्गतच असतात. ते बाह्य घटक वा स्रोताद्वारे होत नसते. विशेष म्हणजे संस्कृतीकरण हे जातींच्या लक्षणांमध्ये होणारे परिवर्तन असते. ते जाती सोपानक्रमात कोणतेच फेरबदल करणारे नसतात. उदा., एखाद्या जातीने जर मांसाहार व मद्यपानाचा निषेध केला, तर तिच्या या पवित्रतेच्या अनुकरणामुळे ती उच्च जात होत नसून तिची आहे तीच जात असते.
संस्कृतीकरणाच्या काही मर्यादाही अभ्यासकांनी दाखवून दिल्या आहेत. देशातील प्रादेशिक विविधता लक्षात घेता संस्कृतीकरण ही संकल्पना सरधोपटपणे सामाजिक बदलांचे विश्लेषण करण्यासाठी वापरता येऊ शकते, याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. संस्कृतीकरण ही जाती व्यवस्थेतील अंतर्विरोध व गुंतागुंतीच्या व्यावहारिक पातळीवरील संदर्भांचे आणि प्रक्रियांचे एक प्रकारे सपाटीकरण करते. संस्कृतीकरण या संकल्पनेनुसार सामाजिक बदल हा केवळ निम्न जातींनी उच्च जातींचे अनुकरण केल्याने घडतो, असे मानून दलित बहुजनांचे बौद्धिकत्वच नाकारले आहे.
संस्कृतीकरण ही उगमापासून वादातित राहिली असली, तरी नंतरच्या काळात देशातील उच्च जातींच्या प्रभुत्वाला संस्थात्मक पातळीवर जे आव्हान उभे राहिले, त्यासंदर्भात दलित-बहुजन सिद्धांतकारांनी या संकल्पनेची जोरदार चिकित्सा केली आहे. सामाजिक शास्त्राच्या पाश्चिमात्त्य परंपरांवरील अवाजवी अवलंबित्वाची गेल्या काही काळात जी चिकित्सा उभी राहिली, त्या संदर्भात एतद्देशीय परंपरेतील संकल्पना म्हणून संस्कृतीकरणाला एक वेगळे वलय प्राप्त झाले; परंतु या एतद्देशीय संकल्पनेच्या वैश्विकीकरणाची प्रक्रिया फारशी झालेली दिसत नाही.
संदर्भ :
- Jaffrelot Christophe, Dr. Ambedkar and Untouchability : Analysing and Fighting Caste, UK, 2006.
- Patel, Sujata, Doing Sociology in India : Genealogies, Locations, and Practices, India, 2016.
- Modi, Ishwar, Readings in Indian Sociology : Pioneers of Sociology in India, New Delhi, 2013.
- Ritzer, George, The Blackwell Encyclopedia of Sociology, New York, 2007.
- Singh, Yogendra, Modernization of Indian Tradition, Jaipur, 1996.
- Srinivas, Mysore Narasimhachar, Religion and Society Among the Coorgs of South India, New Delhi, 2003.
- Srinivas, Mysore Narasimhachar, The Cohesive Role of Sanskritization and Other Essays, USA, 1989.
समीक्षक : बालाजी केंद्रे