राजकीय संस्कृतीचा नागरिकांशी संबधित असणारा प्रकार. गॅब्रिएल आमंड आणि सिडने व्हर्बा यांनी हा प्रकार सांगितला आहे. राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय व्यवस्थेबद्दल आणि राजकीय विषयांबद्दल समाजातील घटकांच्या मनाचा कल,त्यांच्या श्रद्धा, भावना व मूल्यप्रधान दृष्टीकोन होय तर लोकशाही व्यवस्थांच्या स्थैर्यासाठी आवश्यक असलेली राजकीय संस्कृती म्हणजे नागरी संस्कृती होय. आमंड आणि व्हर्बा यांनी तीन प्रकारच्या राजकीय संस्कृतींचा उल्लेख Civic Culture : Political Attitudes and Democracy in Five Nations (1963) या पुस्तकामध्ये केला आहे. राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण त्यांनी समुचित, आज्ञांकित आणि सहभागप्रधान अशा प्रकारांमध्ये केले.आज्ञांकित राजकीय संस्कृतीमध्ये नागरिक शासनाच्या आज्ञांचे पालन करतात. त्यामुळे राज्यकर्त्यांना शासन करणे शक्य होते.

सहभागप्रधान राजकीय संस्कृतीमध्ये नागरिक राज्यकर्त्यांविषयी जागरुक असतात. ते शासन कारभाराबाबत सचेत असतात. त्यामुळे या प्रकारात राज्यकर्त्यांवर नागरिकांचे नियंत्रण राहते. नागरी संस्कृतीमध्ये सहभागप्रधान राजकीय संस्कृती आणि आज्ञांकित राजकीय संस्कृती या दोन्हींचा संगम वा समन्वय असतो, असे आमंड आणि व्हर्बा यांचे या संस्कृतीसंदर्भातील स्पष्टीकरण आहे. नागरी संस्कृतीतील नागरिकांच्या सहभागाला अनुकूल अशा प्रवृत्ती असतात. त्यांचा राजकारणाबाबत चिकित्सक दृष्टीकोन असतो.

आमंड आणि व्हर्बा यांना इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये नागरी संस्कृती आढळली. तिची वैशिष्ट्ये त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. नागरिकांमध्ये राजकीय व्यवस्थेची शासनाच्या विविध अंगांबाबत जाणीव असते. स्वत:च्या राष्ट्रबाबत नागरिकांमध्ये अभिमान असतो. शासकनाकडून योग्य आणि न्याय वागणूक मिळेल अशी अपेक्षा असते. राजकारणाबाबत खुलेपणाने आणि सातत्याने बोलण्याची मुभा असते.निवडणूक प्रक्रिया राजकीय जीवनाचा भावनात्मक भाग बनलेली असते.विरोधी पक्षांबाबत सहिष्णुतेची भूमिका असते. स्थानिक शासनाच्या कारभारामध्ये, राजकीय पक्षांच्या किंवा संघटनांच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याबाबत स्वत:बद्दल विश्वास असतो. नागरिकांमध्ये सहकार्य आणि विश्वासाची भावना असते. राजकीय संघटनांमध्ये सदस्यत्व असते.

थोडक्यात नागरी संस्कृती ही अशा प्रकारची राजकीय संस्कृती आहे जिच्यामध्ये लोकशाहीला पोषक अशी मूल्ये नागरिकांमध्ये रुजलेली असतात. या संस्कृतीतील शासनदेखील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारे आणि त्यांच्या राजकीय सहभागाला प्रेरणा देणारे असते. नागरी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय सहभागाची संधी आणि समानता या संस्कृतीमध्ये आढळते. नागरिकांमध्येही कर्तव्यांबाबत जागरुकता असते तसेच राज्यकर्त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बळकट अशी संस्थात्मक यंत्रणा उभी करण्याचा सामूहिक प्रयत्न या राजकीय संस्कृतीमध्ये होत असतो. राजकीय व्यवस्थेबद्दल आणि समस्यांबद्दल लोकांची निश्चित मते असतील व लोकांचा राजकीय सहभाग असेल तर त्यांची राजकीय संस्कृती सहभागदर्शक असते. लोक आपले प्रश्न सरकारकडे नेतात व सोडवून घेतात. नागरी संस्कृती असलेल्या राजकीय संस्कृतीमध्ये नागरिक आणि शासन यांच्यामध्ये सुसंवाद असतो. लोकशाही व्यवस्थांच्या स्थैर्यासाठी नागरी संस्कृती निर्माण होणे आवश्यक आहे, असे आमंड आणि व्हर्बा यांना वाटते. नागरी संस्कृतीतील राजकीय संस्कृती ही संवादावर आधारलेली असते. तिच्यामध्ये चर्चा, वादविवाद यांच्या माध्यमातून सहमती निर्माण केली जाते. या संस्कृतीत मार्यादित स्वरुपाच्या परिवर्तनाला मान्यता असते. तसेच समाजातील विविधतेचा स्वीकार सहजरित्या केला जातो.

संदर्भ :

  • Gabriel A. Almond ,Sidney Verba,The Civic Culture. Political Attitudes and Democracy in Five Nations, 1963.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा