सहारा वाळवंटातील मानवी व्यवसाय काही अपवाद वगळता पूर्णपणे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. केवळ जेथे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठालगत पाणी उपलब्ध आहे, अशा मरूद्यानांतच कायमस्वरूपी मानवी वस्ती आढळते. अशी मरूद्याने सहाराच्या बहुतांश भागात विखुरलेली आहेत. पैकी बरीचशी वाडीच्या काठावर किंवा इतर वाळवंटी प्रदेशापेक्षा थोड्या अधिक पाऊस पडणाऱ्या उंचवट्याच्या भागात आढळतात. सहारात एकूण सुमारे ९० मोठी आणि अनेक लहानलहान मरूद्याने आहेत. काही मरूद्यानांवर केवळ एक किंवा दोन कुटुंबांचाच उदरनिर्वाह होतो. सहारातील मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. वाळवंटाच्या सीमावर्ती भागात मात्र सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण पुष्कळ असते. खोलगट भागात क्षारयुक्त मृदा आढळतात. त्यामुळे शेती व्यवसायावर मर्यादा पडतात. काही मरूद्यानांत ताड वृक्षांच्या छोट्या राई आढळतात, तर इतर मरूद्याने शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. सहारातील बरेच लोक शेती करतात. खजूर, अंजीर व इतर फळे येथील प्रमुख व्यापारी पिके आहेत. गहू, बार्ली व विविध प्रकारचा भाजीपाला स्थानिक वापरासाठी पिकविला जातो. प्रामुख्याने जलसिंचनाच्या साहाय्याने पिके घेतली जातात.

इसवी सन दहाव्या दशकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत उंटांच्या तांड्यांमार्फत येथील व्यापार चालत असे. या तांड्यांमार्फत माराकेश, कॉन्स्टंटीन व ट्रिपोली या बर्बरी शहरांकडून तिंबक्तू, कानो या सूदानी केंद्रांकडे कापड, मीठ, काचेचे मणी व अन्य उत्पादित वस्तू विक्रीसाठी आणल्या जात. त्यांच्या बदल्यात सोने, चामडी वस्तू, मिरी, कोलानट फळे ही उत्पादने व गुलाम विक्रीसाठी उत्तरेकडे पाठविले जात. अजूनही स्थानिक व्यापार व प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात उंटांचा वापर केला जातो; परंतु दूरवरील वाहतुकीसाठी ट्रक व विमानांचा वापर केला जातो. काही प्रदेशांतील फरसबंदी रस्ते प्रमुख मरूद्यानांना जोडतात. कच्च्या रस्त्यांवरून मोटारी चालविल्या जात असल्या, तरी ते जिकीरीचे असते. सहारातील मुख्य वाहतूक मार्ग पश्चिम-पूर्व गेलेले असून त्यांना महत्त्वाचे मार्ग येऊन मिळतात.

सुमारे ७,००० वर्षांपूर्वी येथे गुरचराई व पशुसंवर्धन केले जात असल्याचे पुरावे मिळतात. सहारातील  बहुतांश पशुपालक वर्षातील काही काळ वाळवंटात घालवितात, तर उर्वरित काळ पर्वतीय प्रदेशात किंवा मरूद्यानात घालवितात. शेळ्या, मेंढ्या व उंटांचे कळप पाळून तसेच वेगवेगळ्या मरूद्यानांदरम्यान आणि वाळवंटाच्या सरहद्द भागातील शहरांदरम्यान व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १९६० च्या दशकापासून वाळवंटातील तसेच सरहद्द प्रदेशातील शुष्कता वाढत गेल्याने येथील रहिवाशांची संख्या बरीच घटली आहे.

खनिज संपत्तीच्या बाबतीत सहारा समृद्ध आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध धातू खनिजांचा प्रमुख उत्पादक म्हणून सहाराचा विकास होत आहे. अल्जीरिया, लिबिया व ट्युनिशियात खनिज तेल व नैसर्गिक वायूची प्रमुख क्षेत्रे असून ती नळमार्गांनी भूमध्य समुद्रावरील वेगवेगळ्या बंदरांशी जोडलेली आहेत. यांशिवाय येथे लोहखनिज, मँगॅनीज, तांबे, युरेनियम, प्लॅटिनम, क्रोमियम, थोरियम, फॉस्फेट, कथिल, निकेल, जस्त, शिसे, कोबाल्ट, सोने, चांदी यांचे साठे आहेत; परंतु प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे यातील काही खनिजांचे विशेष उत्पादन घेतले जात नाही. लोहखनिज उत्पादनासाठी मॉरिटेनिया महत्त्वाचा आहे. मोरोक्कोतून मोठ्या प्रमाणात फॉस्फेटची निर्यात केली जाते. मीठ ही येथील एक महत्त्वाची संपदा आहे. ताउदेनी व बिल्मा मरूद्यान येथून मिठाचे मोठे उत्पादन घेतले जाते.

समीक्षक : नामदेव गाडे