सहारा वाळवंट हे आफ्रिकेच्या ढालक्षेत्रावर स्थित आहे. या ढालक्षेत्रावर कँबियनपूर्व काळातील घडीचे व उघडे पडलेले खडक आढळतात. हे ढालक्षेत्र स्थिर झाल्यानंतर पुराजीव महाकल्पकालीन मूळ स्थितीतील क्षितिजसमांतर शैलसमूह निर्माण झाले. सहाराच्या बहुतांश भागात मध्यजीव महाकल्पातील शैलसमूहाचे आच्छादन आढळते. उदा., अल्जिरिया, दक्षिण ट्युनिशिया व उत्तर लिबियातील चुनखडक आणि लिबियन वाळवंटातील न्यूबेअन वालुकाश्म खडक. त्यांच्या बरोबरीने प्रमुख प्रादेशिक जलधर आळतात. उत्तर सहारातील पश्चिम ईजिप्तमधील मरूद्यानांपासून ते अल्जिरियातील शॉटपर्यंतच्या भागांत या शैलसमूहांच्या जोडीनेच द्रोणी आणि खळग्यांच्या मालिका आढळतात. दक्षिण सहारामध्ये खालच्या दिशेने वाकलेल्या आफ्रिकन ढालक्षेत्रावर निर्माण झालेल्या मोठ्या द्रोणी प्रदेशांत नूतनजीव युगातील सरोवरे आढळतात. उदा., प्राचीन चॅड सरोवर. मध्य सहारातील सलग मैदानी व पठारी प्रदेश ज्वालामुखी गिरिपिंडांनी खंडित केलेले आहेत. उदा., जेबल ओवेनॅट, तिबेस्ती आणि अहॅग्गर पर्वत. चॅडमधील एनदी पठार, नायजरमधील आयर मासिफ (गिरिपिंड), मालीमधील झीफॉरा मासिफ आणि मॉरिटेनियन आद्रार प्रदेश ही येथील इतर वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे आढळतात.
विस्तृत वालुकामय प्रदेश, तुटलेल्या कड्यांचे पर्वतीय प्रदेश, विस्तीर्ण खडकाळ पठारे (हामाडा) व मैदाने, विस्तीर्ण रेतीयुक्त मैदाने (सेरिर किंवा रेग), स्थलांतरित वालुकागिरी व वाळूचे समुद्र (अर्ग), उथळ व हंगामी जलमय द्रोणी (शॉट व डायस), खोलगट भागातील विस्तृत मरूद्यानाचे द्रोणी प्रदेश ही सहारातील प्रमुख भूरूपे आहेत. वेगवेगळ्या प्रदेशांत सेरिर व रेग यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. गर्द रंगाचा गंज चढल्याप्रमाणे दिसणारे लोह-मँगॅनीजयुक्त खडकाचे आच्छादन अनेक ठिकाणी आढळते. वाळूचे विस्तृत क्षेत्र आणि वालुकागिरींनी सहाराच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २५ टक्के क्षेत्र व्यापले आहे. नाईलच्या खोऱ्यातील कृषिक्षेत्र व मरूद्यानांमुळे हे ओसाड वाळवंट खंडित झालेले आहे. उत्तरेकडील सहारा वाळवंट व दक्षिणेकडील आर्द्र सॅव्हाना प्रदेश यांदरम्यान साहेल या नावाने ओळखला जाणारा निमओसाड व संक्रमणात्मक प्रदेश आहे. संपूर्ण सहाराचा विचार केला, तर बहुतांश भाग कमी उंचीचा पठारी असून मध्यवर्ती भाग पर्वतीय व उंचवट्याचा आहे. सहारा प्रदेशाची सरासरी उंची ३०० ते ४०० मी. दरम्यान आहे. मध्य सहारात अहॅग्गर व तिबेस्ती हे प्रमुख पर्वतीय प्रदेश असून त्यांची निर्मिती ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे. या ओसाड ओबडधोबड पर्वतीय प्रदेशांचे वारा व पाणी यांमुळे बरेच खनन झालेले आहे. यातील काही शिखरांची उंची सस.पासून ३,००० ते ३,५०० मी.पर्यंत आढळते. अहॅग्गर पर्वत अल्जीरियाच्या दक्षिण भागात असून त्यातील तहात शिखराची उंची २,९१८ मी. आहे. अहॅग्गरच्या दक्षिणेस असलेले आयर व आद्रार दे झीफॉरा हे पर्वतीय भाग म्हणजे अहॅग्गरचेच विस्तारित भाग आहेत. आयर पर्वताची उंची एकदम कमी होत जाऊन तो तेनेरे या सपाट व वालुकामय मैदानात विलीन होतो. अहॅग्गरच्या ईशान्येस असलेला उंचवट्यांचा प्रदेश तासिली-एन-अज्जेर नावाने ओळखला जातो. चॅडच्या उत्तर भागात असलेल्या तिबेस्ती पर्वतात उंच शिखरे आहेत. त्यांतील मौंट एमीकूसी (उंची ३,४१५ मी.) हे सहारातील सर्वोच्च शिखर आहे.
दक्षिण मोरोक्को ते ईजिप्त यांदरम्यानच्या उत्तर सहारा प्रदेशात स्थलांतरित वालुकागिरी (अर्ग), रेतियुक्त मैदाने (रेग) व वाऱ्याच्या झीज कार्यामुळे उघड्या पडलेल्या तलशिलांचा प्रदेश (हामाडा) आढळतो. अर्ग हा सहारामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळणारा भूविशेष आहे. सहाराच्या एकूण क्षेत्रफळाच्या एक दशांशपेक्षा अधिक क्षेत्र अर्गने व्यापले आहे. काही ठिकाणी अर्गची उंची १८० मी.पर्यंत आढळते. केशाकर्षण व बाष्पीभवन क्रियेमुळे भूपृष्ठावर क्षार जमा होतात. वारा व रेती यांच्या घर्षण कार्यामुळे या क्षारयुक्त भागावर गिलावा केल्यासारखे वाळवंटी किंवा खडकाळ मैदान दिसते, त्याला ‘रेग’ म्हणतात. वाऱ्यामुळे यातील वाळू व बारीक घटक वाहून गेलेले असतात. रेगने सहाराचे बरेच क्षेत्र व्यापले आहे. दक्षिण सहाराचा प्रदेश कमी उंचीच्या पठारांनी व विस्तृत मैदानांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात अतिशय तुरळक प्रमाणात खजुराचे वृक्ष आढळतात.
पश्चिम सहारा सखल, मंद उताराचा, वालुकागिरी व रेतीयुक्त मैदानांचा असून अधूनमधून त्यात कमी उंचीचे हामाडा व टेकड्या आढळतात. तानेझ्रूफ्त हा त्यातील सर्वांत विस्तृत व भूरूपविरहित प्रदेश असून तो सहारातील सर्वांत निर्जन व ओसाड भागांपैकी एक आहे. एल् जाऊफ, अर्ग शेष व अर्ग ईगिडी ही पश्चिम भागातील वाळवंटे आहेत. पश्चिम सहारातील फारच थोडा भाग सस.पासून ३०० मी.पेक्षा अधिक उंचीचा आहे. अगदी पश्चिमेचा भाग तर १५० मी.पेक्षाही कमी उंचीचा आहे. उत्तर सहारामध्ये ग्रेट ईस्टर्न व ग्रेट वेस्टर्न अर्ग हे अतिशय ओसाड वालुकामय भाग आहेत. पूर्व सहाराचा बहुतांश भाग लिबिया वाळवंटाने (१३,००,००० चौ. किमी.) व्यापलेला आहे. त्यात वालुकागिरी व उघडे पडलेले खडक ही भूरूपे आढळतात. अगदी ईशान्य भागात ईजिप्तमध्ये ‘कटारा डिप्रेशन’ हा सस.पासून १३३ मी. खोलीचा प्रदेश आहे. आफ्रिका खंडातील हा दुसरा सर्वाधिक खोलीचा भाग आहे.
नाईल व नायजर वगळता सहारातून वाहणाऱ्या अन्य मोठ्या व कायमस्वरूपी नद्या नाहीत. नाईल नदीचे मुख्य शीर्षप्रवाह दक्षिणेत अधिक पाऊस असणाऱ्या उष्णकटिबंधीय उच्चभूमी प्रदेशात उगम पावतात. सहाराच्या पूर्व भागातून ती उत्तरेस भूमध्य समुद्राकडे वाहत जाते. दक्षिण भागातील अनेक नद्या चॅड सरोवराला मिळतात. त्यांच्यामुळे सभोवतालच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता होते. नायजर नदी नैर्ऋत्य सहारातून वाहते. ॲटलास पर्वताच्या पूर्व पायथ्याजवळ सस.पेक्षाही खोल असलेल्या द्रोणींमध्ये अधूनमधून वाहणारी खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत, त्यांना ‘शॉट’ म्हणतात. ॲटलास पर्वताकडून सहारा प्रदेशाकडे वाहत येणाऱ्या खंडित प्रवाह भागात आर्टेशियन विहिरी व झऱ्यांच्या प्रदेशात मरूद्याने आढळतात. विहिरी किंवा झरे हे या प्रदेशातील पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. मोठ्या पावसानंतर अल्पकाळ वाहणाऱ्या येथील नद्यांना ‘वाडी’ म्हणतात. त्यांची संख्या पुष्कळ आहे. सौरा व द्रा या प्रमुख वाडी आहेत. काही हंगामी वाडी या प्राचीन आर्द्र हवामानकाळातील नद्यांचे शेष प्रवाह आहेत. वाडीप्रवाह पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.
समीक्षक : माधव चौंडे